भारतातील इंग्रजांच्या उदयास आणि विस्तारास कारणीभूत पेशवा
post by : अमित बाबाजी ठोसर - शिवरायांचा एक मावळा
भाग १
कान्होजीं आंग्रेच्या कोकणातील कार्यास सन १६८१ च्या दरम्यान सुरुवात झाली. सन १६९४ ते १७०४ पर्यंत कान्होजींनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून घेतले. छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांना ‘सरखेल’ हा किताब दिला व मराठ्यांच्या आरमाराचे मुख्याधिकारी केले. सन १६९६ मध्ये कान्होजींनी कुलाबा किल्ला जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले.छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर (तारीख २ मार्च १७००) त्यांच्या पत्नी ताराबाईंनी स्वराज्याचा कारभार आपल्या हाती घेऊन मोगलांविरुध्द आघाडी उघडली. कान्होजींनी सन १७०० ते १७१० मध्ये अनेक विजय मिळविले. औरंगजेबच्या मृत्युनंतर मोगलांनी शाहूंची सुटका केली. शाहूंनी सन १७०७ साली स्वतःस राज्याभिषेक केला. त्या दरम्यान ताराबाई व संभाजीराजेंचे पुत्र शाहू यांच्यामध्ये गादीबद्दल तंटा सुरू झाला. ताराबाईंनी सावंतवाडी ते मुंबईपर्यंतच्या किनाऱ्याच्या संरक्षणार्थ मराठी आरमाराचे प्रमुख म्हणून कान्होजींना नेमले आणि इंग्रजांच्या मदतीने शाहूंनी कोणतीही हालचाल करू नये, या हेतूने राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास कान्होजींना सांगितले. सन १७१३ साली शाहूंनी कान्होजींविरुद्ध बहिरोपंत पिंगळे ह्यास धाडले. कान्होजींनी त्यांचा पराभव करून त्यास कैद केले. त्यामुळे छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ या पेशव्यास कान्होजींवर धाडले. बाळाजीने कान्होजींबरोबर सलोखा करून तह केला. त्यात कान्होजींस कोकणकिनारपट्टीचे सर्व किल्ले मिळाले व त्यांनी छत्रपती शाहूंचे अंकित बनून सालाना १२,००० रु. त्यास देण्याचे ठरले. त्यांची सरखेली कायम ठेवण्यात आली. तसेच मराठी आरमाराचे सर्व आधिपत्य त्यास दिले. अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले (फेब्रुवारी १७१४) व अखेरपर्यंत छत्रपती शाहूंकडे निष्ठेने राहिले.
No comments:
Post a Comment