विनोद जाधव एक संग्राहक

Monday 16 December 2019

क्रूरकर्मा अहमदशहा अब्दाली

क्रूरकर्मा अहमदशहा अब्दाली.
महत्वाचे: मराठ्यांच्या शौर्याच्या महानतेला सीमा नाही. अखंड हिंदुस्थानात असे कोणीही नाही ज्यांचे कर्तृत्व आणि शौर्य मराठ्यांच्या तोडीचे आहे.
मराठ्यांनी जितक्या शत्रूंशी मुकाबला केला तितका ह्या हिंदुस्थानात कोणीही केला नाही.
तुमचे शौर्य तुमच्या शत्रु पेक्षा जास्त तेजोमय कधी दिसून येते?
जेंव्हा तुम्हाला तुमच्या शत्रूची नीट ओळख असते तेंव्हा.
आपल्याला अहमदशहा अब्दालीची किती माहिती आहे?
मराठ्यांचा पानिपतातील शत्रू असलेल्या अहमदशहा अब्दालीची माहिती करून घेणे आवश्यक आहे.
अब्दाली केवळ शत्रुपक्षातील म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे ऐतिहासिक सत्य लपविण्यासारखे आहे.
पानिपतातातील दीड लाख लोकांच्या हत्येस जबाबदार असलेल्या क्रूरकर्मा अब्दालीची हि संक्षिप्त माहिती आहे.
लेख सुरु:
हिंदुस्थानच्या इतिहासात मुख्यतः दोन व्यक्तींना क्रूरकर्मा म्हणून ओळखले जाते.
पहिला औरंगजेब आणी दुसरा अहमदशहा अब्दाली.
औरंगजेबाला छळणारे कोणी जन्माला आलेले नव्हते त्यामुळे औरंगजेबाने संपूर्ण हिंदुस्थानला अतोनात छळले.
सौभाग्य न सब दिन सोता है,
देख, आगे क्या होता है।
औरंगजेबाच्या दुर्दैवाने आणी हिंदुस्थानच्या सौभाग्याने मराठ्यांच्या शौर्याचा उदय झाला आणी लवकरच अखंड हिंदुस्थानातून फक्त मराठ्यांनी ह्या औरंगजेबाला छळायला सुरवात केली. इतके छळले कि मुघल सल्तनतीचा सगळा खजिना रिकामा करून औरंगजेबाला रिकामे हात हलवत महाराष्ट्र मातीतच मरावे लागले.
महत्वाचे:
औरंगजेब काय.. आणी अहमदशहा अब्दाली काय..
मराठ्यांशी जे जे म्हणून लढले त्या त्या सगळ्यांना मराठ्यांनी एक तर यमसदनी तरी धाडले आहे किंवा पूर्ण कंगाल तरी केलेले आहे. विशेषतः वर्तमानातही ह्यात फरक पडलेला नाही. जे मराठ्यांच्या विरोधात गेले त्यांना मराठ्यांनी हाती भिकेचे पात्र घ्यायला लावलेले आहे.
मराठ्यांच्या ह्या यशाचे गुप्त रहस्य मला माहित आहे. पण ते सांगणे इथे अपेक्षित नाही. रहस्य हे रहस्यच असले पाहिजे.
असो.
पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी आणि अब्दालीच्या हिंदुस्थानवरील पाचव्या स्वारीच्या वेळी खास करून मराठ्यांचा आणी अहमदशहा अब्दालीचा एकमेकांशी संबंध आला.
अहमदशहा अब्दालीला समजून घेण्याआधी आपल्याला अफगाणिस्तानची काही माहिती समजून घेणे आवश्यक आहे.
भारत देशात जश्या वेग-वेगळ्या जाती-जमाती आहेत तश्याच अफगाणिस्तानमध्येही आहेत.
अफगाणिस्तानमध्ये साधारण १५ मुख्य जमाती आहेत. पश्तुन, सर्बानी-पश्तुन दुर्रानी, ताजिक, हजारा, उझबेक, आयमक, तुर्कमेन, बलोच, पाशाही, नुरिस्तानी, गुज्जर, अरब, ब्राहुई आणी पामिरी.
ह्याशिवाय अजूनही काही छोट्या जमाती आहेत.
सन १७२४ मध्ये अहमदशहा अब्दाली उर्फ अहमदखान अब्दालीचा जन्म अफगाणिस्थानातल्या 'हेरात' ह्या ठिकाणी सद्दोसाई जातीमध्ये झाला. काही ठिकाणी ह्याला अब्दाली कबिला असेही म्हणतात.
अब्दालीच्या बापाचे नाव सम्मौनखानआणि आईचे नाव झर्रघुना अलकोझी असे होते.
अब्दालीचा बाप सम्मौनखान हा अब्दाली टोळीचा वंश परंपरेने मुख्य होता. लहान असताना कबिलाई लढायांत अचानक अहमदशहा अब्दाली हा 'बिलझाईस' या शत्रु टोळीच्या हाती सापडला.
या शत्रु टोळीच्या लोकांनी अहमदशहा अब्दालीला कंदाहार येथे कैदेत ठेवले. अब्दालीचा भाऊ झुल्फिकार ह्यालाही बरेच दिवस असेच कैदेत ठेवले होते. अब्दालीच्या बापालाही कैद झाली होती.
पर्शियाच्या (इराणच्या) नादिरशहाने कबिलाई जमातींमध्ये विभागलेल्या अफगाणिस्तानवर हल्ले केले आणि संपूर्ण अफगाणिस्तान जिंकून घेतले.
पुढे इराणच्या नादिरशहाने अहमदशहा अब्दालीची १७३८ त सुटका केली. सुरवातीस नादीरशहाने त्याच्या अंगरक्षक टोळीचा मुख्य म्हणून अब्दालीची नियुक्ती केली आणी एका घोडदळाचाअब्दालीला प्रमुख केले.
अब्दाली हा इराणच्या नादीरशहाच्याच तालमीत तयार झाला होता.
अब्दाली फार शूर आणि महत्वाकांक्षी आहे आणि अब्दाली पुढे जाऊन नक्की सुलतान बनेल असे इराणच्या नादीरशहास नेहमी वाटत असे.
नादीरशहाने आपला खंजर काढून अब्दालीच्या कानाखाली एक घाव करून अब्दालीस सांगितले होते कि, "माझ्या मृत्यूनंतर तू अफगाणिस्थानचा शासक बनणार आहेस. मी हे तुला बोललो हे तू विसरू नये म्हणून मी तुझ्या कानाखाली माझ्या खंजरने घाव केलेला आहे."
पुढे नादीरशहाची हीच भविष्यवाणी खरी झाली.
नादिरशहाच्या खुनानंतर म्हणजे सन १७४७ मध्ये अहमदशहा अब्दाली स्वतंत्र झाला व त्याने नादिरशहाची तीन लक्ष रुपयांची ठेव आणि नादिरशहाच्या ताब्यातील अफगाणिस्तानातील कंदाहार काबिज केले.
अफगाणिस्तानवर होत असलेले पर्शियन साम्राज्याचे म्हणजे आजच्या इराणचे सततचे हल्ले आणी इतर आक्रमणांचा धोका पाहून कधी नव्हे ते एकमेकांतील वैर विसरून १७४७ साली अफगाणी कबिले-जमाती कंदहार येथे एकत्र आल्या.
कंदहार येथे पंचायत बोलावून सर्वानुमते एक नेता निवडावे असे ठरले. सर्व जमातींच्या संमतीने पश्तुन जमातींतील केवळ २५ वर्ष वयाच्या अहमदशहा अब्दालीला अफगाणिस्तानचा नेता निवडण्यात आले.
अहमदशहा अब्दालीला अजून एका नावाने ओळखतात आणी ते म्हणजे अहमदशहा अब्दाली दुर्रानी.
दुर्रानी हे अब्दालीने त्याच्या पश्तुन जमातीचे नवीन ठेवलेले नाव.
पश्तुन जमातींमध्येही शिनवारी, अल्कोझाई, बरकाझाई, सदोझाई असे ६० मुख्य समूह असून साधारण ४०० उप-समूह आहेत. पश्तुन अफगाणिस्तानातील हि मोठी जमात आहे.
(खरं तर हि सगळी नावे मी टाईप करणार होतो. पण नाही केली. )
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
जितक्या जाती तितकी भांडणे.
अब्दालीला जसे अफगाणिस्तानच्या कबिलाई जमातींचा मुख्य नेता घोषित केले गेले तसे अब्दालीने सगळ्यात पहिल्यांदा ह्या सर्व पश्तुन जमातींना एक करून 'दुर्रानी' असे नवीन नाव ठेवले.
अब्दालीने ह्या सर्वांना एक करून दुर्रानी असे नवीन नाव ठेवल्याने आपसूकच पश्तुन जमातींमधील एकमेकांतील जातीय तेढ नष्ट झाली आणी सगळे पश्तुन दुर्रानी म्हणून ओळखले जाऊ लागले.
महत्वाचे: केवळ २५ वर्ष वयाच्या पोरावर देशाची जबाबदारी टाकणे कितपत योग्य?
अब्दालीच्या स्वभावात काही गुण असे होते कि त्यामुळे सगळे अब्दालीस संमोहित झाले.
सगळ्यात पहिला गुण म्हणजे अब्दालीचे आपुलकीचे बोलणे. कोणासही न दुखविता अब्दाली मधाचे बोट तोंडात न घालता अक्खा पिंपच समोरच्या व्यक्तीच्या तोंडात कोंबत असे.
अब्दाली शब्दाला जागणारा होता. त्यामुळे इतर कबिल्यांचे नेते त्यावर विश्वास ठेवत.
फक्त सदगुण असून उपयोग नाही. राज्यकर्त्यास काही कारणास्तव एखाद्यास कडक शासन करता आलेच पाहिजे. तरच शिस्त राहते. पण ह्या शिस्तीत दुर्गुण असता कामा नये.
अब्दालीच्या स्वभावात शिस्तीच्या पलीकडे असणारा क्रूरतेचा दुर्गुण लपलेला होता. वेळप्रसंगी अब्दालीचा हा क्रूरतेचा दुर्गुण दिसून येत असे.
अब्दालीत संघटन कौशल्य गुण फार चांगला होता. अत्यंत शुल्लक कारणास्तव प्रचंड जनसंहार करणाऱ्या अफगाणी कबिल्यांवर संघटनात्मक वचक ठेवणे सोपे नाही. हे अब्दालीने करून दाखविले. आणी ह्याचेच फळ म्हणजे आजचा अफगाणिस्तान.
जेंव्हा अब्दालीला अफगाणिस्तानचा शासक म्हणून निवडले गेले तेंव्हा
राज्याभिषेकाच्या वेळी 'साबीर शहा' नावाच्या एका अवलियाने अब्दालीला 'दुर-ए-दुर्रान' हि पदवी बहाल केली.
'दुर-ए-दुर्रान' ह्याचा अर्थ होतो मोत्यांमधील सर्वात उत्तम मोती.
अब्दालीला हा शब्द फारच आवडला आणी तेंव्हापासून अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या कबिल्याला दुर्रानी या नावाने ओळखले जाऊ लागले.
कबिल्यांमध्ये विभागलेल्या अफगाणिस्तानची एकसंध अफगाण राष्ट्र म्हणून नवीन ओळख अब्दालीने करून दिली.
पूर्वेकडील अटकपासून पश्चिमकडील इराणपर्यंत आणी उत्तरेकडील मध्य आशियाच्या अमू दरिया नदीच्या किनाऱ्यापासून दक्षिणेकडील हिंद महासागरापर्यंत अब्दालीचे दुर्रानी साम्राज्य पसरलेल होते. साधारण १५ लाख चौरस किलोमीटर इतकं मोठं हे साम्राज्य पसरलेले होते.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
अब्दालीच्या हिंदुस्थानवरील स्वाऱ्यांची संक्षिप्त माहिती
अब्दालीची पहिली स्वारी.
सन १७४८ मध्ये अब्दालीने हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. यावेळी अब्दाली हा सरहिंदपर्यंत आला होता. परंतु सरहिंद येथे त्याची व दिल्लीच्या फौजेची गाठ पडून दिल्लीचा युवराज अहमद याकडून अब्दालीचा पराजय झाला.
(लाहोर ओलांडले कि पंजाबमधील पहिले लुधियाना लागते. लुधियानाच्या पुढे हे सरहिंद आहे. ज्याला आज आपण फतेहगड असेही म्हणतो. लुधियानापासून ६२ किलोमीटर अंतरावर हे सरहिंद आहे. )
अब्दालीची दुसरी स्वारी.
यानंतर सन १७४८ च्याच हिवाळ्यात अब्दालीने दुसरी स्वारी केली. मुख्यतः पंजाब प्रांतावर अब्दालीने हि स्वारी केली होती.
अब्दालीची तिसरी स्वारी.
यावेळी अबदालीचा मुक्काम रावी नदीच्या पलीकडील तीरावर असून लाहोरचा सुभा मुघलांचा सुभेदार मीरमन्नुअली कडे होता. ह्याच लढाईला लाहोरची लढाई असेही म्हणतात.
पुढे लवकरच दोन्ही सैन्ये समोरासमोर येऊन त्यांची लढाई झाली. ह्या लढाईत मुघलांचा सुभेदार मीरमन्नु मागे सरकला आणी मीरमन्नुने लाहोरचा आश्रय घेतला.
अबदालीने मुघल सुभेदार मीरमन्नुची रसद बंद केली. तेंव्हा मीरमन्नूच्या फौजेची उपासमार सुरू झाली. शेवटी तारीख १२ एप्रिल १७५२ रोजी मीरमन्नूनें आपल्या सैन्यासह अब्दालीवर चाल केली. अब्दालीशी त्याने भयंकर लढाई केली. लढाई ऐन रंगात आली व मीरमन्नूचा जय होईल असे अब्दालीसही वाटू लागले इतक्यांत मीरमन्नूचा सेनापति कौरामल्ल हा हत्तीवर बसून लढत असता त्याच्या हत्तीचा एक पाय खळग्यांत गेला व ते जनावर एकदम खाली बसले.
इतक्यांत अब्दालीच्या फौजेतील एकाने कौरामल्लाचे डोके कापून नेले.
सेनापतीची ही अवस्था होतांच सैन्यांत एकदम हाहाकार उडाला व जो तो जीव बचावासाठी पळू लागला, व याप्रमाणे मीरमन्नूचा पराजय झाला.
अब्दालीची चौथी स्वारी.
यानंतर इ. स. १७५५-५६ मध्ये अहमदशहा अब्दालीने हिंदुस्थानवर चौथी स्वारी केली. यावेळी मोगल बादशहाचा वजीर मीर शहाबुद्दीन याने मुलतान व काबूल प्रांत परत घेऊन तेथे आपला सुभेदार नेमल्याचे अब्दालीस कळल्याने त्याने हिंदुस्थानात स्वारी केली व हे प्रांत पुन्हां १७५५ साली हस्तगत केले.
यानंतर अब्दालीने दिल्ली व मथुरा ही शहरे लुटली.
तेथील लोकांची कत्तल करून स्रिया भ्रष्ट केल्या. अगदी लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांची अब्दालीने क्रूर कत्तल केली. रक्ताचे पाट वाहिले. चिखल मांस एक झाले. मथुरेतील हिंदूंच्या छाटलेल्या मुंडक्यांच्या राशींचे डोंगरच अब्दालीने उभे केले. तीन दिवस अब्दाली मथुरेत तळ ठोकून होता. महिलांवरील बलात्काराला तर सीमाच राहिली नाही.
येथे त्याच्या छावणीत साथीचे रोग पसरले. साथीचा उद्भव झाल्यामुळे अब्दालीस परत फिरावे लागले.
इ. स. १७५६ च्या आरंभी अहमदशहा अब्दाली काबूल शहरी जाऊन पोहचला. दिल्लीहून निघण्यापूर्वी त्याने आपला मुलगा तैमूरशहा दुर्रानी याकडे लाहोर मुलतान आदिकरून सर्व पंजाब प्रांताच्या सुभेदारीचे काम सांगून त्यास तिकडे रवाना केले होते.
अत्यंत महत्वाचे: अजूनपर्यंत अब्दालीचा मराठ्यांशी संबंध आलेला नव्हता.
अब्दालीची पाचवी स्वारी.
इ. स. १७५८ साली मराठ्यांनी अहमदशहा अब्दालीच्या सरहिंदच्या सुभेदाराचा पूर्ण पराजय करून थेट अटक पर्यंत धडक मारली आणि मराठ्यांनी अटक जिंकून घेतले.
शांत झोपलेल्या अब्दालीच्या कानामागे अचानक बंदुकीचा बार उडवावा तसे मराठ्यांनी अटक जिंकून घेतल्यावर एकदम अब्दालीच्या बाबतीत झाले.
पुढे मराठ्यांनी लाहोर व मुलतान या प्रांतांवर 'अदीनाबेग' यास आपल्या वतीने सुभेदार नेमले.
इथून अब्दाली आणी मराठ्यांचा सबंध सुरु झाला.
शूर मराठा अफगाणिस्तानच्या दारातच येऊन उभे राहिले आहेत हे चाणाक्ष अब्दालीच्या लक्षात आले आणि आता जर आपण वेळ दवडला तर मराठे अफगाणिस्तानलाही घशात घालतील ह्याची त्रीव्र जाणीव अब्दालीस झाली.
मराठ्यांनी जिंकलेले हे प्रांत परत घेण्याकरिता अहमदशहा अब्दालीने हिंदुस्थानांत पांचव्यादा स्वारी केली. १७५९ अखेर किंवा १७६० च्या आरंभी.
वायव्य सरहद्दीवरील अटक आणि परिसरातील मराठ्यांच्या फौजेवर अब्दालीने अचानक हल्ला केला. मराठ्यांची संख्या कमी असल्याने मराठ्यांनी तात्पुरती माघार घेतली.
अब्दाली यमुना नदी ओलांडून अलीकडे आला. नजीबउद्दौला रोहिल्याने त्याला हिंदुस्थानात स्वारी करण्याकरिता आमंत्रण दिलेच होते व दुसऱ्या मुघल आलमगीर बादशहाचाही अब्दालीशी काही पत्रव्यवहार झाला होता.
अहमदशहा अब्दाली हिंदुस्थानात येताच नजीब उद्दौला त्यास जाऊन मिळाला व नंतर सुजाउद्दौल्यासही त्याने आपल्याकडे वळवून घेतले.
उत्तर हिंदुस्तानांतील इतर मुसुलमान सरदारहि पुढे अब्दालीस येऊन मिळाले. या सर्वांच्या मदतीने अब्दालीने पानिपतच्या युद्धांत मराठ्यांचा सामना केला.
अब्दालीस, सुजा व नजीब यांनी मराठयांवर एकदम चढाई करण्यास आग्रह केला.
अत्यंत महत्वाचे: पण अब्दालीने अन्नाच्या टंचाईने मराठे पूर्ण अशक्त बनल्यावरच चढाई करण्याचे ठरविले.
पुष्कळ दिवस उपवास काढून मराठे कंटाळले व अखेर भाऊसाहेबांनीं १४ जानेवारी १७६१ रोजी पहाटे अब्दालीवर सर्व सैन्यानिशी चाल केली.
प्रथम तोफांची सरबत्ती होऊन मग हातघाईची लढाई सुरू झाली. दुपारपर्यंत मराठ्यांकडील इब्राहिमखानाच्या अर्ध्या पलटणी मारल्या गेल्या, पण मराठ्यांकडील इब्राहिमखानाने समारेच्या अब्दालीच्या फौजेतील ८ हजार रोहिल्यांस कापून आपल्या बाजूला लढाई जिंकली.
भाऊसाहेब, विश्वासराव व पवार हे मध्ये होते. त्यांनी अब्दालीच्या करमण्यांतील वजीराची फळी फोडली. तेंव्हा अब्दालीने (हा मागें राहून युद्धाचें निरीक्षण करीत होता) दहा हजार स्वार वजीराच्या मदतीस धाडले.
अब्दालीच्या डाव्या (नजीब व सुजा यांच्या) बगलेने समोर होळकर व समशेर-बहाद्दरावर हल्ले केले. परंतु त्यांनी ते परतविले. मराठयांची सर्व फौज जिवावर उदार होऊन लढली.
आतांपर्यंत मराठयांचाच जय होता.
सूर्याचे दक्षिणायन सुरु असल्यामुळे सूर्याचा प्रकाश दुपारनंतर सरळ मराठ्यांच्या चेहऱ्यावर पडू लागला. आधीच सहा दिवसांच्या भुकेने मराठे अत्यंत अशक्त झाले होते आणि त्यात डोळ्यावर प्रखर सूर्यप्रकाश पडू लागल्याने मराठ्यांच्या डोळ्यावर अंधाऱ्या येऊ लागल्या.
तरीही मराठे आपल्या तलवारी फिरवतच होते.
इतक्यांत सायंकाळच्या सुमारास दुर्दैवाने विश्वासरावांना गोळी लागली व ते ठार झाले. ते पाहून मल्हारजीस बायकामुलांनां परत नेण्याचें काम सांगून भाऊसाहेब हत्तीवरून उतरून घोडयावर बसून गर्दीत शिरले. घनघोर पानिपतचे रण झाले. मराठा अब्दालीच्या फौजेशी प्राणपणाने आणि शूरपणाने लढले.
अब्दालीने एकदम हल्ले करून मराठयांचा नाश केला. जनकोजी शिंदे, समशेरबहाद्दर व इब्राहिमखान हे जखमी होऊन हाती लागल्यावर गिलच्यांनी त्यांचा खून केला. यशवंतराव पवार व भाऊसाहेब हे रणांगणांत पडले.
मराठयांपैकी फक्त १/४ लोक परत आले.
अब्दाली पानिपतची लढाई लढला त्यावेळी अब्दालीचे वय ३८ वर्ष होते.
सदाशिवभाऊ ३२ वर्षांचा होता आणि शिंदे मंडळींचे वय तर फक्त १६ ते १७ च्या आसपास होते. केवळ १५-१६ वर्षांची मुलेसुद्धा पानिपतच्या लढाईला गेलेली होती. मल्हाररराव होळकर आणि काही जेष्ठ वयाची मंडळी होती.
मराठे आणि अब्दाली यांच्यातील ह्या पानिपतच्या लढाईनंतर अब्दालीने दिल्लीचे तख्त शहाअलम बादशहास देऊन सुजाउद्दौला यास त्याचा वजीर केले व नजीब उद्दौल्यास त्याच्या अमीर उल्-उमराच्या हुद्यावर पुन्हा बसवून अब्दाली अफगाणिस्थानास १७६१ साली स्वदेशी कायमचा परत गेला.
अब्दालीने मुघल सुभेदार मीरमन्नू बरोबर केलेल्या तिसऱ्या लढाईत आणि मराठ्यांच्या बरोबरीला पाचव्या लढाईत बरेच साम्य आहे. पण इथे महत्वाचा फरक आहे.
मीरमन्नू अब्दालीला शरण गेला आणि मराठे शरण न जाता प्राणपणाने लढले.
अब्दालीची सहावी स्वारी.
अफगाणिस्थान आणि हिंदुस्थानच्या सरहद्दीवरील कबिलाई फौजा सरहद्दीच्या फायदा घेऊन अब्दालीच्या सुभेदारांस हुसकावून लावत.
शिवाय अफगाणिस्तानच्या सीमेवरील पंजाब प्रांतातील शीखांनीही अब्दाली विरुद्ध आघाडी उघडली. शिखांनी लाहोरचा अफगाण गव्हर्नर ख्वाजा आबिद ह्याची हत्या केली.
त्यामुळे सन १७६२ मध्ये अब्दालीने सहाव्यांदा पंजाब सरहद्दीवर स्वारी केली.
अब्दालीची सातवी स्वारी.
पुढे सन १७६४ मध्ये परत अब्दालीने शिखांवर सातवी स्वारी केली. पण ह्या स्वारीत अब्दालीचा दारुण पराभव झाला.
ह्या मधल्या काळात मराठ्यांचे उत्तर भारतात अत्यंत वेगाने साम्राज्य विस्तारत होते. उत्तरेतील एकामागून एक प्रदेश मराठे जिंकून घेत होते.
महाराष्ट्र धर्म समूहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
पूर्वेपासून थेट अफगाण सीमेपर्यंत परत मराठ्यांचे घोडेस्वार जेंव्हा विजयी भगवे झेंडे हातात घेऊन धावू लागले तेंव्हा मात्र अब्दालीने सर्व आशा सोडली.
पानिपतातील मराठयांचा पराक्रम अब्दालीने रणांत उभा राहून पाहिलेला होता.
मराठ्यांच्या धामधुमीमुळे थोड्याच दिवसांत अखंड हिंदुस्थानवर मराठ्यांचा भगवा ध्वज फडकणार हे सत्य अब्दालीपासून सर्व उत्तर भारतातील राजे राजवाड्यांना कळून चुकलेले होते.
मराठ्यांनी हे 'सत्य' कर्तृत्वाने सत्य करून दाखविले.
उत्तर भारतातील ज्या राजे-रजवाड्यांनी गद्दारी करून अब्दालीला साथ दिली ते आता त्यांचे शेवटचे दिवस मोजू लागले होते.
मराठयांचा धाक किती असावा?
केवळ मराठे जयपुरवर चालून येत आहेत हे ऐकूनच घाबरून जाऊन जयपूरच्या राजाने विषारी नाग डसवून घेऊन आत्महत्या केलेली आहे.
पानिपत नंतरच्या मराठ्यांच्या उत्तरेतील विजयी घोड-दौडीवर मी भविष्यात लिहिणार आहे.
मराठ्यांच्या धाकामुळे अब्दाली परत कधीही हिंदुस्थानात आला नाही.
अब्दालीचे मराठ्यांच्या बरोबरील या पानिपतच्या मोहिमेत इतके नुकसान झाले की त्यानंतर तो ११ वर्षे जगला असतानाही त्याने पुन्हा हिंदुस्थानास फारसा त्रास दिला नाही.
अब्दाली १६ आक्टोबर १७७२ रोजी काळपुळीच्या संसर्गजन्य विकाराने (Anthrax) अफगाणिस्थानातील मरुफ येथे मेला. कंदहार येथे अब्दालीचे थडगे आहे.
(बॅसिलस अँथ्रॅसिस या सूक्ष्मजंतूच्या संसर्गामुळे होणाऱ्या रोगाला संसर्गजन्य काळपुळी (Anthrax) असे म्हणतात. मेंढी, शेळी, डुक्कर,घोडा, गाय वगैरे पाळीव जनावरांचा हा रोग आहे; परंतु रोगी जनावरांशी संपर्क येणाऱ्या मनुष्यांसही हा रोग होऊ शकतो.)
लेख आवडल्यास लाईक करून शेअर करा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना इन्व्हाईट करा.
समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...