विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 23 April 2020

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’ भाग १

‘मराठा मरता नहीं, वो मारता है!’
postsaambhar:अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक
भाग १
‘मराठा..., मराठा मरता नहीं, वो मारता है।’ ‘तिरंगा’ या हिंदी चित्रपटामधील नाना पाटेकरच्या डॉयलॉगवर अख्खं सिनेमा थिएटर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. टाळ्या आणि शिट्ट्यांनी थिएटर दुमदुमून गेलं. ही घटना कुठली महाराष्ट्रामधील नाही, तर हिंदुस्थानचा जानी दुश्मन पाकिस्तानमधील आहे... हे वाचून बर्‍याच जणांना धक्का बसला असेल, भुवया उंचावल्या असतील, साहजिकच आहे. सहजासहजी विश्वास बसणार नाही; परंतु हे सत्य आहे... यासाठी आपल्याला थोडं इतिहासात डोकावावं लागेल.
सन 1761... या सनाला मराठ्यांच्या म्हणजे महाराष्ट्रामधील तमाम मराठीजनांच्या अस्मितेत, परंपरेत, संस्कृतीत खूपच महत्त्व आहे... बर्‍याच वेळा आपल्या बोलीभाषेत बोलले जाते ‘काय सांगू मित्रा, एक का दोन, सतराशे साठ भानगडी आहेत...’ ‘काय विश्वास ठेवा म्हणतोस. विश्वास गेला पानिपतच्या युद्धात.’ ‘क्यूं पाटील और भी लडोगे?’ अब्दालीने पानिपतावर महापराक्रम गाजवून मरणासन्न अवस्थेत रक्तबंबाळ हाऊन रणांगणावर शेवटच्या घटका मोजत पडलेल्या सरदार दत्ताजी शिंदे यांना कुचेष्टेने विचारले, तेव्हा ते बाणेदार इतिहास प्रसिद्ध शब्द बाहेर पडले... ‘हां, बचेंगे तो और भी लडेंगे...’
सातार्‍याच्या गादीवर शाहू महाराज विराजमान झाल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखालील पेशव्यांनी शिंदे, होळकर, भोसले अशा पराक्रमी व मातब्बर सेनानींच्या मदतीने सारा हिंदुस्थान स्वराज्याच्या अंमलाखाली आणायला सुरुवात केली होती... मराठ्यांशी लढता-लढता औरंगजेबला महाराष्ट्रातच प्राण सोडावे लागले. मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेबची कबर या मुलुखात बांधली गेली. त्यानंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. पठाण, रोहिले, निजाम, राजपूत, शिखांची छोटी राज्ये प्रबळ झाली; पण पराक्रमी मराठ्यांचा विस्तार व दरारा सार्‍या हिंदुस्थानभर होता. दरम्यान, उत्तरेत इंदुरच्या मल्हारराव होळकरांचा मानसपुत्र असलेल्या नजीब खानने हिंदुस्थानवर हुकूमत गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी अफगाणी सुलतान अहमदशहा अब्दालीला हिंदुस्थानवर आक्रमण करायला भाग पाडले. बलाढ्य अफगाणी अब्दालीचा मुकाबला करायची हिंमत कुठल्याही हिंदुस्थानी शासकामध्ये नव्हती. अशा बिकट प्रसंगी त्याच्याविरुद्ध समशेरी उपसल्या त्या मराठ्यांनी... सातार्‍याच्या छत्रपती शाहू महाराजांचा आदेश घेऊन नानासाहेब पेशव्यांनी सर्व मराठी सरदारांना एकत्र आणले आणि अहमदशहा अब्दालीला आव्हान दिले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...