▶दिवस उजाडला होता ५ जून १६७४.
रायगड तर जणू हर्षाने उल्हसित झाला होता.
नगारखाना सजला होता, मनोरे फुलांनी सजले होते.
पाहुण्यालोकांसाठी राहुट्या, मंडप सजलेले.
नौबती झडत होत्या. गंगासागर तुडुंब भरलेला होता, कुशावर्तात सुद्धा भरपूर पाणी होते.
नगारखान्याचा तो भव्य असा दरवाजा अंबारीतून भगवा ध्वज असलेला हत्ती सहज आत जाऊ शकेल असा तो दरवाजा. भगवा डौलाने फडकत होता. रायगडाचा प्रत्येक चिरा अन बुरुज जणू आनंदाने नाचत होता. त्या सुवर्ण सोहळ्यासाठी आतुर झाला होता. महादरवाजपाशी मावळे उभे होते.
रायगड सगळे बघत होता, डोळे भरून, कडा न कडा, दगड, माती, झाडेझुडपे, हरखून गेली होती.
सगळ्यांच्या मनात स्वातंत्र्याचे हुंकार उठत होते. नगारखाना तर जणू स्वतःलाच विसरला असेल.
जणू राजांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला,
माझा धनी येणार, माझा राजा येणार.
ते बत्तीस मण मराठी दौलतीचे सोनेरी सिंहासन आपल्या धन्याच्या स्पर्शासाठी व्याकुळ झाले होते
त्यावेळी हेन्री ओक्सेंडन नावाचा इंग्रज वकील रायगडावर हजर होता.
त्यादिवशी निराजीपंतांनी त्याला सांगितले की उद्या सिंहासनारोहण होईल अन दरबार भरेल. त्यावेळी शिवाजी राजांना मुजरा करण्यास व नजराणा अर्पण करण्यास तुला जावयाला हवे.
▶अन ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो सुवर्णदिन उजाडला.
त्यावेळी रायगडावर काय लगबग असेल ती शब्दांत मांडताच येत नाही.
या सुवर्णक्षणाचे वर्णन करताना सभासद लिहतो-
‘तक्त सुवर्णाचे बत्तीस मणाचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक रत्ने तक्तास जडाव केली. सप्त महानदियाची उदके व थोर थोर नदीयांची उदके व समुद्राची तीर्थक्षेत्र नामांकित, तेथील तिर्थोदकें आणिली. सुवर्णाचे कलश अन तांबे केले. आठ कलश अन आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियास अभिषेक करावा असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पाहिला…
सिंहासनावर बसले. सिंहसनास अष्ट खांब जडीत केले. त्या पद्धतीप्रमाणे शास्त्रोक्त सर्वाही साहित्य सिद्ध केले. संपूर्ण खर्चाची संख्या एक क्रोड बेचाळीस लक्ष होन जालें. अष्टप्रधानास लक्ष लक्ष होन बक्षीस दर आसामीस त्याखेरीज एक हत्ती, एक घोडा, वस्त्रे, अलंकार असे देणे दिले. येणेप्रमाणे सिंहासनारूढ जालें. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.“
No comments:
Post a Comment