विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 10 July 2020

१२ मे आग्रा भेट....!!


१२ मे आग्रा भेट....!!

पुरंदरच्या तहाच्या कलमाची पूर्तता करण्यास शिवछत्रपती आलमगिरा पुढे उभे .आलमगिर हा तोच ज्याच्यापुढे प्रत्यक्ष बापाने हार मानली.भावांच्या कत्तली झाल्या.स्वतःची सावली सुद्धा औरंगजेबावर विश्वास ठेवत नव्हती तो गाझी आलमगिर.आलम हिंदोस्तां च्या चढेल रियासती जिथे कुर्निसात करत होत्या.क्षुल्लक अब्रूखातर जिथे आपल्याच लोकांच्या माना कापल्या जायच्या त्या मानाही तिथेच झुकल्या होत्या.आणि त्याच दरबारात दख्खन च्या मातीचा स्वाभिमान सर्जा शिवाजी पंचहजारी रांगेत उभा करण्यात आला.आणि सह्याद्रीची काळी कातळी वज्रमूठ उत्तरेतल्या पठारी मैदानावर पडली.आरक्त नेत्राने शिवसूर्य आग ओकत होता.त्याच्या हाताला प्रतिसूर्यगोल सर्जा शंभू होता त्याच्या भविष्यातल्या बाणेदार मरणाची बीजे त्याच घटनेत पेरली.जगदंबेच्या परडीतला पोत फरारला.विठूरायाच्या कटेवरचे हात घट्ट झाले.रत्नागिरीच्या पहाडावरच्या ज्योतिबाने आपल्या रांगड्या मिशीला भारदस्त पीळ दिला.सह्याद्रीच्या देवतामंडळाचा जीव कळसुबाईच्या डोळ्याने उत्तरेत पाहता झाला...!!

आणि कडाडला..शिवध्वनी....!!

आलमगिराच्याच दरबारात ...साक्षात मृत्युच्याच पुढे..!!

औरंग्याला आणि गुलामीच्या इतिहासाला कळेल अशा उत्तरी बोलीत...!!

"तुम देखो , तुम्हारा बाप देख्या , तुम्हारा पातशाही देख्या !
मै ऐसा आदमी हो जू मुझे गौर करने खडा रखो मैं तुम्हारा मानसिब छोड्या ! मुझे खडा तो करीना सीर रख्या होता ! मै सिरपाव न लो! मुझे पातशाह जी जसवंतसिंह सों तलो खडा गौर खडा करो ! सो मै ऐसा आदमी हो जू मुझे असौ गौर करीने खडा करो ! मै पातशाहजी का मनसब नही लेता ! चाकर नही लेता ! मुझे मारना चाहो तो मारो ! कैद मे किया चाहो कैद में करो सरपाव न पहरौ !

निद्रिस्त ज्वालामुखीतून लाव्हा फुटावा तसे हे शिवबोल औरंगजेबाच्या दरबारात उमटत होते.किती तरी शतके प्रचंड दडपलेला स्वाभिमान जागृत झाला....!!औरंगजेबाच्या सोनेरी पिंजर्यातले जसवंतसिंह,रामसिंह असले आयाळ भादरलेले "सिंह" नखशिखान्त थरारले...!!सह्याद्रिचा शिवाजी भोसला नावाचा नरसिंह...गुरकावत होता,डरकाळत होता...त्याचा आवेश,त्याची नजर ,त्याचा बाणेदार पणा मान मोडून आणि हात बांधून उभ्या असलेल्या हिंदुस्थानच्या गुलामपुत्रांना गरजून सांगता झाला" मराठे, मेलेल्या आईचे दूध पिलेले नाहीत...!!
आज थरारली हिंदूभू.!! त्रिसमुद्राचे पाणी लाटा उन्मत होत उठले..सप्तनद्या खळाळत्या झाल्या....काशीच्या विश्वेश्वराचा आणि दाक्षिणेतल्या रामेश्वराचा कळस मोहरला...आणि शहारलेल्या शुभ्र धवल हिमाद्री ला काळ्या अंगाचा आणि रांगड्या ढंगाचा सह्याद्री सांगत होता.....कि तुझा भाग्यविधाता
"शिवाजी " म्हणून जन्माला आला आहे.....!!

सचिन शिवाजीराव खोपडे-देशमुख.
#बारामावळपरिवार.

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...