नावजी लखमाजी बलकवडे (इनामदार) :-


उत्तर शिवकालात सिंहगड, राजगड, पुरंदर रायगड यासारखे बुलंद किल्ले मोगलांच्या ताब्यात गेल्याने मराठ्यांना देशावर प्रभावी हालचाली करणे अवघड जात होते. त्याच बरोबर कोकणात देखील प्रतिकारात अडथळे निर्माण होऊ लागले होते. अशा बिकट परिस्थितिवर मात करण्यासाठी, हे बलदंड किल्ले परत जिंकणे आवश्यक होते.
या सर्व गोष्टींचा विचार करुन इ.स.१६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव यांनी धाडसी लोकांच्या सहाय्याने किल्ले जिंकण्याचे विचार सुरु केला. या काळात अनेक शुरवीरांचा उदय झाला, त्यापैकीच एक नाव सरदार नावजी लखमाजी बलकवडे, नावजी हे सचिवांच्या पायदळात पदाती सप्तसहस्त्री होते. त्यांनी सिंहगड जिंकुन देण्याचे कबुल केले. त्या बदल्यात शंकराजी पंतानी त्यांना पवन मावळातील सावरगाव इनाम द्यायचे असे ठरले.
शंकराजी पंताना सिंहगडाच्या भौगोलिक परिस्थितिचा चांगला अंदाज होत. हे काम नावजीसारख्या एकट्या दुकट्याचे नाही हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे नावजी बरोबर सरदार विठोजी कारके याना मदतनीस म्हणुन दिले. त्यानुसार प्रथम विठोजींनी एकट्याने आणि नंतर विठोजी आणि नावजी दोघांनी मिळून सिंहगडाच्या घेराची तपासणी केली. त्यांना असे आढळले की सिंहगड आधीच कठीण, त्यात मोगलांनी सावध होउन काही ठिकाणी किल्ल्याची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती करुन तेथे चौक्या, पहारे आणि रात्रीच्या गस्ती वाढवलेल्या होत्या. शिवाय जास्तीचे सैन्य देखिल या काळात किल्ल्यावर तैनात होते. दगा फटका करुन किल्ला घेण्याची सोय राहिली नव्हती. त्यामुळे सुभेदार मालुसरेनां जेवढ्या अडचणी आल्या तेवढ्याच आता पण असणार याचे जाण पंतसचीव, नावजी आणि विठोजी यांना होती.
दि. २५ जून १६९३ रोजी नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले. पावसाळ्याचे दिवस त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत सिंहगड नजीकच्या जंगलात येउन पोहोचले आणि योग्य संधीची वाट पाहत ५ दिवस दबा धरुन बसले.
दि. ३० जूनच्या मध्यरात्री नावजी बलकवडे शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढू लागले. अवघड मार्गांनी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यावर मोगलांची गस्त सुरु होती आणि पहारेकरी सावध होते त्यामुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला तेव्हा किल्ल्यावरच्या गस्तवाल्यांची वेळ संपून नवे लोक गस्तीसाठी येत होते. पावसाळ्यातल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते. या लवचिक संधीचा फायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले. मराठे सैनिकांनी पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फार हानी झाली होती. मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला असता आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या सैन्यावर हल्ला चढवला असता. पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते.
नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले, आता मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते. हर हर महादेवच्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला.

कुवारीगडाच्या पराभवाच्या बातमी सचिवांच्या कानावर येऊन पोहोचली. त्यावेळी ते राजगडावर होते. मोगलांनी किल्ला भेद करून घेतल्याच्या बातमीने ते दु:खी झाले पण खचले नाहीत, त्यांनी कुवारीगड परत जिंकून घेण्याचा निश्चय केला. त्यांनी ही कामगिरी नावजी बलकवडे या शूर मर्दमराठ्यावर सोपवली. सुमारे दोन वर्षांपूर्वीच त्याने सिंहगड मोठ्या हिंमतीने जिंकून घेतला होता आणि आता ते पौड मावळातच सचिवांच्या आज्ञोवरून धामधूम करत होते. नावजींनी किल्ल्याच्या घेऱ्यात आपली माणसं पसरवून किल्ल्याचा राबता तोडला. नंतर किल्ल्याच्या दिशेने येणारी रसद मारण्याचा जोरदार उद्योग सुरू केले. अशाच एका उद्योगात नावजी आणि बाळोजी नाईक ढमाले यांनी जुन्नरवरून किल्ल्याकडे रसद घेऊन येणाऱ्या सैन्यावर छापा घातला, जुन्नरचा फौजदार मन्सूर खानाच्या सैन्यात घोडदळ होते आणि जड तोफाही होत्या. पण नावजीने गनिमी काव्याच्या युद्धतंत्राचा असा काही वापर केला की मोगल सैन्याची पार दाणादाण उडाली आणि पाहता पाहता खानाचे सैन्य विखुरलं गेलं. मराठ्यांनी मोगलांचे शेकडो घोडे ताब्यात घेऊन रसद मारली, मराठ्यांचा मोठा विजय झाला. पण आपल्या प्राणाची पर्वा न करता शौर्याने लढणारा बाळोजी नाईक ढमाले या लढाईत धारातीर्थी पडले. मोगल किल्लेदाराची चिंता दिवसेंदिवस वाढतच होती, कुवारीगड त्यांनी भेद करून जिंकला खरा पण तो त्यांना किती काळ टिकवता येईल याबद्दल शंकाच होती. पौड मावळातल्या मराठ्यांच्या वाढत्या लष्करी कारवाया, मराठ्यांनी कुवारीगडाची केलेली नाकेबंदी शिवाय किल्ल्याला बाहेरून मदतही येण्याची आशा नव्हती. इकडे नावजी एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन किल्ल्यावर हल्ले करत होते. मोगलही प्रत्युत्तर देत होते पण हल्ल्यागणिक मोगलांचं सैन्यबळ कमी होऊ लागलं तेव्हा मात्र मोगल किल्लेदाराला आपलं भवितव्य स्पष्ट दिसू लागलं. इतक्यात राजगडावरून सचिवांनी पंताजी शिवदेव, चापाजी कदम भोरपकर आणि दमाजी नारायण यांच्या हाताखाली मोठे सैन्य देऊन नावाजींच्या मदतीला पाठवून दिलं. किल्लेदार एक एक दिवस मोठ्या कष्टाने काढत होता किल्ल्यावरून त्याने मराठ्यांच्या मदतीला आलेली फौज पाहिली आणि त्याचं अवसानच गळालं. शत्रूशी लढत लढत मरणं किंवा सरळ त्याला शरण जाणं हेच दोन पर्याय आता शिल्लक होते. त्याने दुसरा पर्याय निवडला आणि नावजींशी बोलणी लावून कुवारीगड सोडला, मराठ्यांचं सैन्य भगवा झेंडा घेऊन किल्ला चढू लागले, नावजी बलकवडे किल्ल्यावर आले, त्यांनी त्र्यंबक शिवदेव आणि मोरो नारायण यांना कैदेतून सोडवले. त्यांच्या कुटुंबियांचीही सुटका केली आणि सदरेवर जाऊन भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फडकवला.
कुवारीगडासारखा महत्वाचा किल्ला ज्या फितुरांमुळे मोगलांच्या ताब्यात गेला होता, त्या रायजी बाहुलकरला नावजींच्या सैनिकांनी पकडून सचिवांसमोर हजर केलं. त्यांनी रायजीला चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावली, अखेर चाबकाचा मार सहन न झाल्यामुळे रायाजी बेशुद्ध पडला. नंतर त्याची रवानगी राजगडाच्या बालेकिल्ल्यावरील कैदेत करण्यात आली. नावजींच्या पराक्रमावर सचिव बेहद्द खुश झाले आणि त्याला मुलखेड हे गाव इनाम करून दिलं. अशा प्रकारे १६९५ च्या डिसेंबर महिन्यात आंबाघाटाचा संरक्षक कुवारीगड पुन्हा एकदा स्वराज्यात दाखल झाला तो कायमचा.
No comments:
Post a Comment