विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 February 2021

संत नरहरि सोना

 


संत नरहरि सोनार यांची समाधि !
शके १२३५ च्या माघ व. १ या दिवशी पंढरपूरचे प्रसिद्ध भगवद्भक्त नरहरि सोनार यांनी समाधि घेतली.
प्रारंभीच्या आयुष्यांत नरहरि सोनार हे एकांतिक शिवभक्त होते. इतर कोणत्याहि देवाचे दर्शन घ्यावयाचे नाही असा यांचा बाणा होता. पंढरपूरला राहूनहि यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. एकदा एका विठ्ठलभक्त सावकाराने विठोबाच्या कमरेस येईल असा सोन्याचा करगोटा करण्याचे काम नरहरि सोनारांना सांगितले. परंतु माप घेऊनहि करगोटा लांब तरी होत असे किंवा आंखूड तरी होत असे. असें चारपांच वेळां घडले. शेवटी डोळे बांधून नरहरि सोनार देवळांत गेले, आणि विठ्ठलास चांचपूं लागले. तो त्यांच्या हातांना पांच मुखें, सर्पालंकार, मस्तकी जटा, व त्यांत गंगा अशी शंकराची मूर्ति लागली. तेव्हां त्यांनी डोळे उघडले ; तो पुढे विठ्ठलाची मूर्ति! पुनः डोळे झांकले तो शंकराची मूर्ति ! असा प्रकार पाहिल्यावर हरिहर हे एकरूपच आहेत याचा बोध त्यांना झाला. नरहरि सोनार वारकरी मंडळांत येऊन मिळाले. याबद्दलचा त्यांचा अभंग प्रसिद्ध आहे
“शिव आणि विष्णु एकचि प्रतिमा। ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित ॥१॥
धन्य ते संसारी नर आणि नारी। वाचे हरि हरि उच्चारिती ॥२॥
नाही पै तो भेद। द्वेषाद्वेष संबंधा उरी नुरे ॥३॥
सोनार नरहरि न देखे पै द्वैत । अवघा मूर्तिमंत एकरूप"
शिव आणि विष्णु यांच्यांत भेद नाही असा प्रचार फक्त महाराष्ट्रांतच वारकरी सांप्रदायाने जोराने केला ; त्यामुळे शैव-वैष्णवांचे वाद तेथे मुळींच माजले नाहीत. नरहरि सोनारांच्या जीवितांत याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसते. ज्ञानदेवांच्या तीर्थयात्रेत हे होतेच. ज्ञानदेवादि भावंडांवर त्यांची फारच भक्ति बसली.
माघ व. १ ला नरहरि सोनार समाधिस्थ झाले, " शककर्ता शालिवाहन । बारा शतें पस्तीस जाण । प्रमादीनामें संवत्सर पूर्ण । माघ कृष्ण प्रतिपदा । भूवैकुंठ पंढरी क्षेत्र । नरहरि सोनार परम पवित्र । मध्यान्हि येतां कुमुदिनी मित्र । देह, अर्पिला तयानें"
-२ फेब्रुवारी १३१४

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...