खंडेराव दाभाड्यांचा पराक्रम !
शके १६३९ च्या वैशाख व. ९ रोजी प्रसिद्ध वीर खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोंगलांचा पराभव केला.
दोन वर्षांपूर्वी दक्षिणच्या सुभ्यावर देखरेख करण्यासाठी म्हणून सय्यद हुसेन याची नेमणूक दिल्लीहून झाली होती. सन १७१५ च्या ५ एप्रिल रोजी तो दिल्ली सोडून दक्षिणेत येण्यास निघाला. परंतु, बादशहाचा डाव वेगळाच होता. सय्यदास कारभार न देतां त्यास मारून टाकावे म्हणून बादशहाने अगोदरच दाऊदखान पन्नीस हुकूम दिला होता. नर्मदा नदीतीरी सय्यद आल्यावर त्याला समजून आले की, दाऊदखान पन्नी हा बऱ्हाणपूरपर्यंत आपणावर चाल करून येत आहे. दोघांच्यांत सलोखा होणे अर्थातच शक्य नव्हते. याच वेळी शाहू महाराजांचे सेनापति नेमाजी शिंदे हे मोठ्या फौजेस बरोबर होऊन बऱ्हाणपूर येथे राहिले होते. दाऊदखान व सय्यद हुसेन यांचा बनाव कसा काय होतो याकडे त्यांचे लक्ष होते.
थोड्याच दिवसांत बऱ्हाणपूर येथे लालबागच्या मैदानांत हुसेनअल्ली व पन्नी यांजमध्ये लढाई होऊन तीत दाऊदखानच मरण पावला. अशा रीतीने बादशहाचा हेतु पूर्णपणे फसला. तरी बादशहाने हुसेनचा पाडाव करण्यासाठी मराठ्यांना पुढे केले. मराठ्यांनी मोंगलांच्या मुलखांवर हल्ले करण्यास सुरुवातहि केली. खंडेराव दाभाडे यांनी खानदेश व गुजरात या देशांवर स्वाऱ्या करून त्या दोन प्रांतांमधील दळण वळणाचा मार्ग आपल्या स्वाधीन आणला. तेव्हां हुसेनअल्लीकडून झुल्फिकारबेग नांवाचा सरदार खंडेरावांचे पारिपत्य करण्यास आला. खंडेराव यांनी मोठ्या युक्तीने सर्व सैन्याचा पाडाव करून झुल्फिकारबेग यासहि ठार केले. त्यानंतर मनसूरखान, ऐवजखान, करीमबेग वगैरे सरदार मराठ्यांचा पराभव करण्यास तयार झाले. अहमदनगरशेजारी दोनहि सैन्यांची गांठ पडून निकराची लढाई झाली व वैशाख व. ९ रोजी खंडेराव दाभाडे व सुलतानजी निंबाळकर यांनी मोंगलांचा पुरा मोड केला.
-२४ एप्रिल १७१७
No comments:
Post a Comment