विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 13 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग ३५

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग ३५
आतापर्यंत पवार घराण्यातील पुरुषांनी मराठा साम्राज्यासाठी बजावलेल्या कामगिर्यांचा शक्य होईल तितका सालावार माहिती आपणास देण्याचा प्रयत्न केला.
पवार घराण्याचा मराठा साम्राज्य विस्तार करण्यासाठी कशा प्रकारे कामगिऱ्या बजावल्या हे आपण आतापर्यंत पाहिले. आता साम्राज्याचे घटक या नात्याने मराठा साम्राज्यात या घराण्यातील पुरुषांचा दर्जा कशा प्रकारचा होता हे थोडक्यात पाहू !!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कृष्णाची व त्यांचे पुत्र बुबाजी,रायाजी व केरोजी यांची नामांकित सरदारांमध्ये गणना केली जात होती.
छत्रपती राजाराम महाराजांच्या वेळी बुबाजी, रायाजी व केरोजी या त्रिवर्ग बंधूंना मोठमोठी विश्वासाची व पराक्रमांची अनेक कामे करून; "विश्वासराव" " सेना बाराहजारी " वगैरे सन्माननीय पदव्या व विश्वासराईचा मोठा सरंजाम मिळविला.
याच वेळी बुबाजींचे पुत्र संभाजी पवार हेही चांगल्या योग्यतेस चढले.
छत्रपती शाहू महाराजांच्या वेळी संभाजी पवारांचे पुत्र उदाजीराव व आनंदराव व नातू यशवंतराव हे अत्यंत प्रमुख व प्रबल सरदार गणले जात होते.
यशवंतरावांना तर " राजा " हा बहुमानाचा किताब ही मिळाला होता. दिल्ली येथील बादशहाशी व अन्य राज्यांशी बाजीराव व बाळाजी बाजीराव यांनी चालवलेल्या राजकारणात यशवंतराव दोन्ही पक्षात मध्यस्थ किंवा जामीनदार समजले गेल्याची दोन-तीन उदाहरणे वर आपल्या वाचनात आलीच आहेत. यावरून यशवंतरावांचे वजन व दर्जा किती वरिष्ठ प्रतीचा मानला जात होता ही गोष्ट स्पष्ट होते. शिवाय पानिपत येथील प्रसिद्ध रणसंग्रामात युद्धाचे मुख्य नेते सदाशिवराव भाऊ यांनी यशवंतरावांना युद्धात जे स्थान दिले होते, त्यावरून ते यशवंतरावांना किती मानीत होते हे ध्यानात येते.
यशवंतरावांप्रमाणेच त्यांचे बंधू रायाजी पवार (अमदाबादकर ) यांनाही " राव " ही सन्मानाची पदवी मिळाली होती व ती ते स्वतास लावीत असत.
इसवीसन सतराशे 1668-69 सालाचा एक महत्वाचा कागद" झाडा महाल हिंदुस्तान " (खांडेकर संग्रह) यामध्ये यावर्षी कोणकोणत्या सरदारांकडे उत्तर हिंदुस्थानातील कोणकोणते महाल सरंजामसाठी वहिवाटीस होते ,याबद्दलची नोंद आहे . त्यात होळकरांकडे सव्वा चौदा महाल दाखविले असून शिंद्यां पावणे एकोणावीस महाल असल्याचे म्हटले आहे. व पवारांकडे साडेसत्तावीस महाल असल्याचे म्हटले आहे ; त्यापैकी धारकर पवारांकडे सव्वा अठरा ; देवासकर पवारांकडे सव्वासात व अमदाबादकर पवारांकडे दोन असे दाखविले आहेत.
याशिवाय दक्षिणेतील पुष्कळ मोठा विश्वासराईचा सरंजाम ही पवारांकडे होता. यावरून त्याकाळी मराठा सरदारांत पवारांचा दर्जा कशा प्रकारचा होता व त्यांची सत्ता किती विस्तृत प्रदेशावर होती हे चांगले लक्षात येते.
धारच्या पवार राजघराण्यातील प्रतापी पुरुषांनी राष्ट्र कार्यासाठी आरंभापासून ते अखेरपर्यंत किती परिश्रम केले, कष्ट सोसले व अनेक मोठमोठ्या कामगिरी बजावून स्वपराक्रमाने आपला दर्जा व वैभव कसे वाढवले याचा हा अगदी त्रोटक वृत्तांत आहे. यात या घराण्यातील पुरुषांचे अनुवंशिक शौर्य, उज्वल स्वामीभक्ती व आढळ राष्ट्र प्रेम इत्यादी सद्गुण व्यक्त झाले आहेत.
।। समाप्त ।।
सर्व धार पवार बंधुना विनंती की , वरील मालिका आपणास कशी वाटली ? याबाबत आपले मत जरूर मांडावे !
याआधी ही बर्याच मालिका मी सोशलमिडीयावर चालवल्या होत्या ; पण आज ही मालिका संपते आहे हा विचार करून , मन खिन्न झाल ! एक प्रश्न परत परत पडतो आहे की ....
पवांरांची मराठा साम्राज्यासाठी इतकी वैभवशाली कामगिरी केलेली असुनही इतिहासात हवी तशी प्रसिध्दी या पवारांच्या इतिहासाला का मिळाली नाही ?
आता हा इतिहास सर्वांना समजण्यासाठी पवार बंधुनीच मेहनत घ्यावी !
धन्यवाद !!!!!!
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...