विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 30 March 2022

कोल्हटकर घराणे.

 

# इतिहासाच्या पाऊलखुणा.
कोल्हटकर घराणे.
आपल्यापैकी बहुतेक सर्व जण 'कोल्हटकर'नावाचा कुणी सरदार मराठ्यांच्या इतिहासात होऊन गेल्याचे आज प्रथमच ऐकत असल्याची शक्यता आहे.
भोसले कालीन लढाऊ ब्राह्मण सरदारांत भास्करराम कोल्हटकर यांचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे.भास्करराम वा भास्करपंत कोल्हटकरांचे पूर्वज रामाजी नारायण वाई प्रांतातील पांडवनगर येथील वतनदार देशमुख होते.नागपूरकर भोसल्यांचा मूळ पुरुष मुधोजी भोसलेची बापुजी,परसोजी व साबाजी हि तीन मुले कोयना नदीच्या तीरावर भैरवगड इथे राहत होती.भोसले व रामाजी यांच्यात घनिष्ठ मैत्री संबंध होते.एकदा जंजिऱ्याच्या सिद्धीने काही कारणाने भोसले बंधूना कैदेत टाकले.त्यावेळी रामाजी ने तीन हजार रुपये दंड भरून तिघा भोसले बंधूना सोडवून त्यांची पुढील व्यवस्था केली.रामाजी हे अतिशय धार्मिक वृत्तीचे होते,त्यांच्या आशीर्वादाने बिमबाजीस( बापुजी पुत्र) पुत्र झाला -रघुजी भोसले प्रथम-जो नागपूर येथील मराठ्यांच्या संस्थानाचा संस्थापक म्हणून प्रसिद्ध झाला.रामाजी च्या आदेशानुसार रघुजीने राजघराण्यात रामचंद्राची उपासना सुरु केली.भोसल्यांनी कोल्हटकरांस उपाध्यायकी दिली.१७३० साली रघुजीस वऱ्हाड-गोंडवना ची सनद व 'सेनासाहेब सुभा'हा किताब दिला.त्यावेळी रघुजी बरोबर कोन्हेराम आणि भास्करराम हे दोघे बंधू नागपूरला आले.रघुजीने कोन्हेरामास दिवानगीरी व मुजुमदारी पदे दिलीत तर भास्कररामास त्याचे उपजत लष्करी गुण पाहून सेनापतीचे सर्वोच्च पद दिले शाहू महाराजांनी अर्काटचा नवाब दोस्त महमद व त्याचा जावइ चान्दासाहेब यांचा बंदोबस्त करण्यास रघुजीस फर्मावले.भास्कररामाने चन्दासाहेबासकैद करून वऱ्हाडात नेले.त्यानंतर रघुजीने हळू हळू तेव्हाच्या बंगाल प्रांताकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.त्या वेळचा बंगाल म्हणजे आजचा प.बंगाल,बिहार ,ओरिसा व संपूर्ण बांगला देश होय.रघुजीने बंगाल वरील आक्रमणात भास्कर रामास आपला सेनापती नियुक्त केले. . मराठ्यांच्या स्वाऱ्यांपासून आपले व अन्य श्रीमंत लोकांचे संरक्षण करण्यासाठी इंग्रजांनी त्या काळात म्हणजे १७४० मध्ये उत्तर कलकत्त्यातील बाघबझार भागात एक प्रचंड खंदक खोदला जो 'मराठा डिच'नावाने प्रसिद्ध आहे.पहिली स्वारी १७४२ मध्ये झाली .ह्या स्वारीत मराठ्यांनी त्यावेळच्या बंगालच्या सुभेदार असलेल्या अलिवर्दी खांचा अनेक ठिकाणी पराभव केला,मुर्शिदाबादेत जगतशेठ आलमचंद्च्या पेढीतून अडीच कोटी रुपयांची लुट मिळवली.ह्या स्वारीने भास्कर रामाचा दरारा संपूर्ण बंगाल प्रांतात पसरला.१७४४ मध्ये तिसऱ्या स्वारीच्या वेळी त्याने ओरीसामधून बंगालमध्ये प्रवेश करून सर्वत्र धामधूम माजवली.
लष्करी बळावर भास्कर रामास आवरणे,त्याचा मुकाबला करणे अशक्य वाटल्याने अलिवर्दी खानाने त्यास वाटाघाटी,तह करण्यासाठी आपल्या एरियात आमंत्रित केले,पण त्याचा अंतःस्थ हेतू वेगळाच होता.३० मार्च १७४४ ला भास्कर राम कोल्हटकर आपल्या २१ सरदाराना घेऊन काहीसा गाफील राहून अलीवार्दी खानास भेटण्यास त्याच्या छावणीत गेला असता अलीवार्दीखानाने कपटाने भास्करराम व त्याच्या बरोबरच्या २१ मराठे सरदारांची कत्तल केली.भास्कर राम व त्याच्यासोबत असलेल्या २१ मराठा सरदारांच्या हत्तेचा बदल घेण्यासाठी रघुजीने आपल्या जानोजी व मुधोजी ह्या दोन मुलांना १७४८ मध्ये बंगालच्या स्वारीवर पाठविले.ह्या स्वारीत मराठ्यांनी पूर्ण ओरिसा जिंकून पाटण्या कडे कूच केले,पण अलीवार्दीखानाच्या जोरदार प्रतिकारामुळे मराठ्यांना माघार घ्यावी लागली,तसेच त्याच वेळी गोंड वनात बंड झाल्याचे कळल्याने रघुजीने आपली फौज माघारी बोलाविली.
भास्कर रामाचा थोरला भाऊ कोन्हेराम दुःखी होऊन कोंकणात परत गेला,रघुजीने भास्कर रामाच्या पत्नीस वऱ्हाडात १५ हजाराची जहागीर दिली.१७५७ पर्यंतकोन्हे रामचा मुलगा बाबुराव ,तसेच भास्कर रामचा नातू रामचंद्र हेही भोसल्यांच्या सेवेत राहिले होते.
भास्कर रामच्या बंगाल्वरील आक्रमणात तेथील जनतेस अमाप कष्ट,दुःख,त्रास झाल्याचे म्हणतात.तत्कालीन बंगाली लेखक गंगाराम ने 'महाराष्ट्र पुराण' नावाचे एक प्रदीर्घ काव्य लिहिले असून त्यात मराठ्यांच्या आक्रमणामुळे स्थानिक जनतेवर झालेल्या अत्याचारांचे वर्णन आहे.ह्या काव्याच्या पहिल्या खंडात मराठ्यांनी भास्कर रामच्या नेतृत्वाखाली १७४२-४४ मध्ये केलेल्या लष्करी मोहिमांची वर्णने आहेत.अलीवर्दीखान मराठ्यांच्या वेढ्यातून निसटल्यावर भास्कर रामाने वैफल्याने चिडून जाऊन सर्वसामान्य लोकांवर जे 'अत्याचार' केले,रेशीम,हातमाग उद्योगाची हानी केली त्याची पण वर्णने आहेत.मराठ्यांनी बंगाल मधील लुटलेल्या आणि पेटविलेल्या खेड्यांची एक मोठी यादीच गंगाराम ने पहिल्या खंडात दिली आहे.डच वखारीच्या लोकांनी मराठ्यांनी सुमारे चार लाख लोकांच्या हत्त्या व ८ लाख लोकांना मराठ्यांनी जखमी केल्याचे नमूद केले आहे.रियासतकार सरदेसाईनच्या मते 'महाराष्ट्र पुराण'' मधील ऐतिहासिक महत्वाची माहिती इतर तत्कालीन साधनांशी पडताळून पाहता खरी असल्याचे दिसते तर सदानंद मोरेंच्या मते,बंगाली लोकांना 'अतिशयोक्ती'करण्याची सवयच आणि मराठ्यांमध्ये चांगला इतिहासकार नसल्यामुळे 'हि बदनामी'वाढतच गेली.
(संदर्भ:१-मराठ्यांचा इतिहास,खंड १ व २-संपादक अ.रा.कुलकर्णी व ग.ह.खरे.,२ मराठी रियासत-गो.स.सरदेसाई,खंड ४,व प्रा.सदानंद मोरे यांचा ०४-०७-२०१४ ला दैनिक लोकसत्तातील लेख-( मराठ्यांचा) दरारा,दबदबा कि दहशत? हा लेख)

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...