विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 26 October 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ कोकणातील मराठा संस्थानिक घराणे: सावंतवाडीचे सावंत - 1

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

कोकणातील मराठा संस्थानिक घराणे: सावंतवाडीचे सावंत - 1

 

शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य संस्थापनेच्या उदात्त, उत्तुंग ध्येयात, कार्यात काही वेळा या सावंतवाडीच्या सावंतांनी त्यांना साथ दिली, तर काही वेळा शिवछत्रपतींचा रोषही त्यांना पत्करावा लागला होता. अन्य काही घराण्यांनीदेखील शिवछत्रपतींना विरोध केला होता, असे इतिहास सांगतो. परंतु हा विरोध अथवा सहकार्य हे त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असायचे, हे इतिहासाचा अभ्यास करताना जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

2400 चौरस किलोमीटर भूभाग असलेल्या आणि तसे बघितले तर महाराष्ट्राच्या एका टोकाला कोकण प्रांतात असलेल्या या सावंतवाडी संस्थानाला अपभ्रंशित शब्दात ‘वाडी’ असे ही ओळखले जाते. उत्तरेस गड नदी, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस महाराष्ट्रभू रक्षक सह्याद्रीच्या पर्वतरांगा, त्याच्यापलीकडे कोल्हापूर व बेळगाव जिल्हा आणि दक्षिणेस तेरेखोलची खाडी अशा सीमांनी सावंतवाडी वेढले गेले होते. दक्षिण कोकण प्रांतात मालवण आणि गोवा राज्याच्या सीमेलगत सावंतवाडी वसलेले आहे. सावंतवाडी व आसपासच्या प्रदेशात गवसलेले ताम्रपट, शिलालेख यांच्यावरून या संस्थानचा गत इतिहास उजेडात येतो. हा प्रदेश सहाव्या ते चौदाव्या शतकापर्यंत चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आदी राजवंशांच्या अधिपत्याखाली होता, असे दाखले आढळतात. त्यानंतर तो विजयनगर, विजापूरच्या अमलाखाली गेला. उदयपूरच्या सिसोदिया भोसले कुळातील मांगसावंत हे आदिलशाहीत सेवक होते. कालांतराने त्यांनी आदिलशाहीविरुद्ध बंड करून ते विजापूर सत्ताधीशांपासून वेगळे होऊन सावंतवाडीजवळील कुडाळ परगण्यातील ‘ओटवणे’ या ठिकाणी स्वतंत्रपणे राहू लागले होते. यांचे मूळ राजस्थानातील उदयपूर येथील सिसोदिया वंशाच्या राजपूत कुटुंबात होते. या कोकणात उतरलेल्या मांगसावंत भोसल्यांनी इसवी सन 1554 मध्ये स्वंतत्र गादी स्थापली आणि पुढे त्यांच्या वंशजांनी मग येथेच अनेक वर्षे राज्यकारभार केला. मात्र त्यांचे वारसदार भामसावंत हे फिरून आदिलशहाकडे गेले. पोर्तुगिजांसोबत झालेल्या झगड्यांत सावंतांनी आदिलशहास मदत केल्याने त्याने सावंतांना ‘सावंत बहाद्दर’ हा किताब दिला. हे सावंत भोसले स्वतःस सूर्यवंशी मानत असत. शिवपूर्वकाळात महाराष्ट्रातील बहामनी सत्तेचे विघटन होऊन गोवळकोंड्याची कुतूबशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, बीदर येथील बरीदशाही आणि वर्‍हाडची इमादशाही अशा पाच शाह्या निर्माण झाल्या. महाराष्ट्रातील अनेक मराठा सरदार घराणी नोकरीनिमित्त या शाह्यांत आपापला पराक्रम, कर्तबगारी दाखवत होती. सावंतवाडी संस्थानचे मूळ पुरुष ज्यांना मानले जाते ते खेमसावंत पहिले (इसवी सन 1627 – 1640) हेदेखील विजापूरच्या आदिलशाहीत कार्यरत होते. हे खेमसावंत म्हणजे मांगसावंत यांचे नातू होत. त्यांनी आदिलशाहीकडून देशमुखी प्राप्त केली होती. त्यांना सोम, फोंड आणि लखम असे तीन पुत्र होते. इतिहासातील नमूद दाखल्यांनुसार यांच्या पूर्वासुरींनी मेवाड प्रांतातील चितोड येथे सिंहासन स्थापलेले होते. आदिलशाहीच्या उतरत्या काळात सावंतवाडी संस्थान ‘जहागीर’ म्हणून इसवी सन 1627 ते 1640 पर्यंत खेमसावंत यांच्या ताब्यात होते. खेमसावंत पहिले यांच्या पश्चात त्यांचा मुलगा ‘सोमसावंत’ हा 1641 पर्यंत फक्त अठरा महिनेच गादीवर होता.

त्याच्यानंतर त्याचा कनिष्ठ बंधू ‘फोंडसावंत’ (कारकीर्द – 1641 ते 1651) याने सावंतवाडीचा पदभार स्वीकारला. हे व्यक्तिशः शांत आणि संयमी होते. यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लहान भाऊ लखमसावंत (इ.स. 1651 – 1675 ) हे सिंहासनावर विराजले. लखम सावंत हे शूर, पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. त्यांची कारकीर्द संघर्षमय असली तरी त्यांनी संस्थानच्या विकासासाठी खूप काम केलेले आहे. त्यांच्याजवळ सुमारे 12,000 ची फौज होती. यात पायदळ तसेच स्वतंत्र घोडदळ यांचाही समावेश होता. सावंतवाडी संस्थानचे त्या काळातही स्वतःचे आरमार होते, असे उल्लेख आढळतात. संस्थानच्या हद्दीत समुद्र तसेच मोठ्या नद्यांचा अंतर्भाव असल्याने आरमार असणे हे अपरिहार्य होते. त्या काळात समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात व्यापार-उदीम चालत असल्याने सागरावर आपले स्वामित्व असावे, या उद्देशाने हे आरमार उभारले होते. सावंतवाडी संस्थानच्या आरमारात लक्ष्मीप्रसाद, भवानीप्रसाद, साहेबराव नामक दोन डोलकाठ्या असलेली ‘गुराबा’ होती, ज्यांची क्षमता दीडशे ते तीनशे टन वजन वाहण्याची होती. काहीशा सपाट/उथळ तळामुळे गुराब तोल सावरण्यात तसेच हळुवारपणे वाहणार्‍या वार्‍यावरही ती जलद गतीने जात. या उपयुक्ततेमुळे अत्यंत चपळाईने शत्रूवर हल्ला करता येत असे. यासोबतच रामबाण, रघुनाथ, दुर्गा, यशवंती, लक्ष्मी, हनुमंत नावाची गलबतं पण होती. इसवी सन 1674 मध्ये लखमसावंत आणि त्यांचा पुतण्या खेमसावंत दुसरा यांनी वेंगुर्ल्याच्या किनार्‍यावर इंग्रज व्यापार्‍यांचे एक गलबत पकडले होते, अशी नोंद त्या जहाजावरील जॉन फ्रायर याने केलेली आहे. इंग्रजांच्या सुदैवाने सावंतवाडीचे इंग्रजांपेक्षाही दणकट आणि सामर्थ्यशाली असलेले गलबत काही कारणाने परत फिरले व इंग्रजांनी सुटकेचा निःश्वास सोडला. यावरून सावंतवाडी संस्थानची आरमारी तयारी लक्षात येते.

लखमसावंत व त्यांचा पुतण्या खेमसावंत दुसरा यांनी कुडाळ प्रांताच्या देसायांना ठार मारून त्यांचा भूभाग बळकावला. आदिलशाहीची मर्जी राखण्यासाठी त्यांनी विजापूरचा सरदार खवासखान याला सोबत घेऊन शिवरायांवर चढाई केली. साधारणतः यापर्यंतच्या काळात शिवरायांनी स्वतंत्र साम्राज्याचे ध्येय अंगीकारले होते आणि ते हळूहळू आपल्या पराक्रमाच्या उत्कर्षाकडे मार्गक्रमण करीत होते. शिवरायांनी या वेळी या दोघांचा दारुण पराभव केला. तेव्हा लखमसावंत आणि खेमसावंत दुसरा यांनी पोर्तुगिजांचा आश्रय घेतला. मात्र महाराजांनी पोर्तुगिजांचा फोंडा किल्ला जिंकून घेतला. यासमयी पोर्तुगिजांनी तह केला आणि लखमसावंत यांनीही शिवरायांसोबत पाच कलमी तह करून फौजेसह मराठा राज्याची सेवा करण्याचे तसेच आपल्या देशमुखीच्या उत्पन्नापैकी सहा हजार होन प्रतिसाल महाराजांना द्यायचे कबूल केले. यानंतर काही काळ लखमसावंतानी शिवछत्रपतींना साथ दिली. परंतु शिवरायांच्या ध्येयधोरणांशी न पटल्याने त्यांनी 1659 मध्ये शिवरायांशी झालेला सलोखा झुगारून पुढे पुन्हा आदिलशाहीशी सूत जमवले. या घडामोडींमुळे संतप्त झालेल्या शिवरायांचे सरदार बाजी पासलकर यांनी सावंतवाडीवर हल्ला करून सावंतांचा पाडाव केला व त्यांना आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले. मात्र सावंत हेसुद्धा शिवरायांप्रमाणेच भोसले कुलोत्पन्न असल्याने त्यांनी उदात्त विचारांनी सावंत यांचे अधिकार अबाधित राखले. सावंतवाडी संस्थानची म्हणून ओळखली जाणारी अशी तांब्याची व चांदीची नाणी आढळून येतात. यातील तांब्याची नाणी राजा खेमसावंत बाहादर तिसरे ( कालावधी – इ. स. 1755 ते 1803 ) यांनी पाडली होती, असे स्पष्टपणे म्हणता येते. या खेमसावंत तिसरे यांचा विवाह ग्वाल्हेरनरेश महादजी शिंदे यांच्या बहिणीशी झाला होता आणि महादजी शिंदे हे त्यासमयी दिल्ली दरबारचे ‘वकील – ई – मुतालिक’ म्हणून नेमले गेले होते. त्यांनी शाहआलम बादशाहकडे आपले वजन टाकून त्यांचे मेव्हणे खेमसावंत तिसरे यांजकहिता 1785 मध्ये ‘राजा बाहादर’ हा किताब घेतला होता. या कारणाने या तांब्याच्या पैशांना ‘राजाबाहादूरी’ पैसे असेही म्हटले जाते. या पैशांवर एका बाजूला ‘राजाखेमसावंत’ आणि दुसर्‍या बाजूला ‘बहादर’ असे देवनागरीत लिहिलेले आढळते. या पैशाचे वजन 7.5 ग्राम्स च्या आसपास असते. तसेच त्यांनी पाडलेले व वरील मजकूर तसेच फुलांचे डिझाइन असलेले पाव पैसे (1/4 पैसा) ही आढळतो. मात्र या पाव पैशाचा धातू व एक पैशाचा धातू तसेच त्याची बनावट (ाळपींळपस ीीूंश्रश) यात फरक आढळतो. नुकताच 1.8 ग्राम्सचा एकअष्टमांश पैसाही आढळून आला आहे. या नाण्याचा आणि एक पैशाच्या नाण्याचा धातू/तांबे आणि लिखावट तसेच ाळपींळपस ीीूंश्रश ही समान (र्वीािू रिीींंशीप) आढळली आहे. यानंतर सावंतवाडीच्या चांदीच्या नाण्यांचा व उर्वरित इतिहासाचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...