विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 13 November 2022

॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥ मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 3

 

॥ मराठा साम्राज्याची नाणी संपदा ॥

मराठ्यांच्या पश्चिम भारतातील टांकसाळी - 3

 

शककर्त्या शिवछत्रपती स्थापित चढते वाढते हिंदवीस्वराज्य हे आता शिवोत्तर कालखंडात खरोखरच संपूर्ण हिंदुस्थानात आपला आब राखून होते. मराठ्यांच्या बुलंद फौजांचा मुघलांच्यासकट सर्वच एतद्देशीय तसेच परदेशीय सत्ताधीशांनी मनोमन धसका घेतला होता. बंगाल, ओरिसा, कटक प्रांतात तर आया आपल्या लहान मुलांना झोपवण्यासाठी ‘बाळा झोप लवकर, नाहीतर मराठे येतील’ असे सांगायच्या असेही ऐकिवात आहे. इतका दबदबा मराठेशाहीच्या सत्तेचा सर्वदूर दुमदुमत होता.

औरंगजेबाच्या आधीपासून दख्खन मुलखाला जशी सातत्याने मुघल आणि अन्य आक्रमकांच्या स्वार्‍यांची धास्ती असायची तीच दहशत आता पेशवे काल खंडात हिंदुस्थानातील सर्व सत्ताधीशांना मराठ्यांच्या स्वार्‍यांची वाटत असे. वीजेच्या लोळाप्रमाणे मराठे कुठून, कसे आणि कोणावर कोसळतील याचा नेम नव्हता. थोरल्या बाजीरावराऊस्वामींनी अत्यंत चपळ, जलद हालचाली करून अनेक धुरिणांना हा हा म्हणता नामोहरम केले होते. मराठ्यांच्या फौजा अमुक एका ठिकाणी आहेत ही खबर पोहोचेपर्यंत त्या विद्युतगतीने अक्षरशः शत्रूच्या समोर जाऊन उभ्या ठाकलेल्या असायच्या. मग शत्रू असा काही भांबावून जायचा की त्याला मराठ्यांचा कसा प्रतिकार करावा हेच अनेकदा सुचत नसे. मराठा फौजा या प्रांतात शिरल्या आहेत हे त्यांचे नजरबाज येऊन सांगेपर्यंत अनेकदा ती मराठा फौज अथवा तुकडी तो प्रांत यथेच्छ साफ करून आणखी दुसरीकडे रवाना झालेली असायची.

औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला लागलेल्या उतरत्या कळेत अशी वेळ मुघल सम्राटांवर आली की, तख्त टिकविण्यासाठी त्यांना बरेचदा मराठ्यांच्या वाढलेल्या सामर्थ्याचा सहारा घ्यावा लागत होता. आतापावेतो आलम हिंदुस्थानात स्थिरस्थावर झालेले शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, नागपूरकर भोसले आदी मराठा संस्थानिक वेळप्रसंग बघून मुघल, निजाम, राजपूत, रोहिले, जाट यांना मदत करायची का नाही याचा निर्णय घेत असत इतके सामर्थ्य, दबदबा मराठेशाहीचा निर्माण झालेला होता. याचमुळे एक मोहिम आटोपून फौजा परत येईपर्यंत बरेचदा दुसरी मोहीम जारी झालेली असायची. असे उल्लेख आढळतात की जन्मजात सेनानी असलेले थोरले बाजीरावराऊस्वामी आपल्या फौजेसह अनेकदा मजल दरमजल करीत असताना घोड्यावर बसल्या बसल्याच हातात कणसाचे दाणे खात असत. पंतप्रधानपेशव्यांनी छत्रपतींच्याच्या नावे चलनात आणलेले पुणे टांकसाळीचे ‘अंकुश’ तसेच नागफणी चिन्हांकित रुपये, पैसे हे त्या काळात बहुतांशी हिंदुस्थानात एक नामांकित, विश्वसनीय चलन म्हणून मान्यता पावले होते. विघ्नहर्त्या शीगणरायाच्या हातात असणारा किंवा मदमस्त हत्तीला ताब्यात राखण्यासाठी माहूताकडून वापरला जाणारा अंकुश/एश्रशहिरपीं ॠेरव हे चिन्ह, नागराजाच्या फण्यावर ‘10’ आकड्यासदृष दिसणारा फणा/ नागफणी/ ीलळीीेीी हे देखील एक महत्त्वाचे चिन्ह आपणांस या नाण्यांवर बघता येते. अंकुश चिन्हाचे विविध प्रकार या रुपयांवर छापलेले आढळतात. याचसोबत अंकुश चिन्हाखाली तसेच बाजूला आढळणारे वेीं अथवा पूर्णविराम चिन्ह देखील या नाण्यांच्या टांकसाळ बाबत उलगडा करू शकते. या अंकुश चिन्हाचे तत्कालीन महत्व इतके होते की जंजिरा संस्थानाधिपती सिद्दी यांनी देखील या अंकुशी रुपयांवर चक्क देवनागरीत संस्थानचे आद्याक्षर ‘ज’ छापले होते असे नाणकतज्ञांचे एकमत आहे. जेणेकरून मराठेशाहीच्या या मजबूत चलना प्रमाणे त्यांच्या चलनाला ही सर्वमान्यता मिळेल, इतके हे अंकुशी चलन लोकमानसात सुपरिचित ठरले होते.

यापुढे जाऊन सांगायचे झाले तर इ.स. 1818 मध्ये संपुष्टात आलेल्या पेशवाई नंतर ब्रिटिश ईस्ट कंपनीची सत्ता एकएक संस्थाने खालसा करत सर्वदूर संपूर्ण हिंदुस्थानवर बळावली. व्यापाराच्या निमित्ताने देशात शिरलेले हे परकीय व्यापारी आता देशाचेच अधिपती होऊन बसले. छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचे चलन नवनिर्मित हिंदवी स्वराज्यात चालावे असा राज्याभिषेक समयी आलेला त्यांचा प्रस्ताव वेळीच धोका ओळखून नाकारला होता मात्र आता तेच इंग्रज बलवत्तर ठरून संपूर्ण देशाचे स्वामी होऊन बसले होते. मात्र अशा परिस्थितीत ही नाईलाजास्तव का होईना पेशव्यांनी पाडलेले आणि संपूर्ण देशात मान्यता पावलेले ‘अंकुशी व नागफणी’ चिन्हांकित मराठेशाहीचे चलन त्यांना मराठेशाही गिळंकृत केल्यानंतरही तब्बल 14 वर्षे वापरावे लागले यातच एका अर्थाने त्यांची अपरिहार्यता आणि आपल्या चलनाची परिणामकारकता ठळकपणे दिसून येते असे मानले तर ते गैरलागू ठरू नये. कारण ईस्ट इंडिया कंपनीला अंकुशी आणि नागफणी रुपयांवर देवनागरीतील अंक/आकडे टाकून रयतेला एका अर्थाने सांगावे लागले, की जरी आमची नवीन सत्ता असली तरी आम्ही तुमचेच चलन वापरत (किमानपक्षी सुरुवातीची काही वर्षे तरी) असल्याने तुमच्यापेक्षा वेगळे नाही आहोत हे तुम्हीही समजून घ्या. इतका जबरदस्त पगडा सर्वमान्य चलनाचा लोकमानसावर तसेच राज्यकर्त्यांवर पडत असतो. जसा शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाडलेल्या सोन्याच्या होनाचा आणि तांब्याच्या शिवरायी पैशाचा 350 वर्षांनंतर आजही आपणा सगळ्यांवर आहे.

अशाच प्रकारे पुणे उर्फ मुहियाबाद, गणेशपूर चिंचवड (चिंचूर), चांदोर उर्फ जाफराबाद, चाकण उर्फ मोमिनाबाद, नाशिक उर्फ गुलशनाबाद, धारवाड उर्फ नसीराबाद, मुल्हेर उर्फ औरंगनगर, गोकाक उर्फ आझमनगर, मिरज उर्फ मूर्तजाबाद, दार-उस-सरूर बुर्‍हाणपूर, दार-ऊल-खिलाफत शाहजहानाबाद उर्फ बागलकोट अशा नावाने मिंटची नावे नाण्यांवर आपणास बघावयास मिळतात. ही नावे मुळातच इतकी लांबलचक असायची की ती सहसा ( 99.99%) एकाच नाण्यावर उमटलेली आढळून येत नाहीत .असे आढळून आले आहे की , एखाद्या नाण्यावर ‘जाफराबाद’ हा शब्द, दुसर्‍या नाण्यावर ‘उर्फ’ हा शब्द तर तिसर्‍या नाण्यावर ‘चांदोर’ हा शब्द छापलेला आढळून आलेला आहे. या मराठेशाहीच्या नाण्यांवर मात्र अतिशय सुबक, ठसठशीत अशी धनुष्यबाण, परशु, अंकुश, तलवार, शी आदीकरून चिन्हे उत्कृष्टरित्या कोरलेली असायची जेणेकरून मराठा नाण्यांचे वेगळे अस्तित्व सहज लक्षात यावे. या पश्चिम भारतातील 75 टांकसाळीपैकी काही ठिकाणची नाणी आजही उजेडात आलेली नाहीत. कदाचित अतिशय अल्पस्वल्प प्रमाणात तेथे नाणी पाडली गेली असावीत असा तर्क मांडता येईल. दुर्गदुर्गोत्तम राजधानी रायगडावर शिवाजी महाराजांनी सोन्याचे होन (सेश्रव हेप – िीशलर्ळेीी ाशींरश्र) पाडले होते परंतु त्यांनी तांब्याची नाणी (ीशाळ िीशलर्ळेीी ाशींरश्र) ही गडाच्या तत्कालीन मध्यवर्ती भागात म्हणजे पाचाड येथे पाडली असावीत असा अभ्यासपूर्व निष्कर्ष नक्कीच काढता येतो. सालसेट उर्फ साष्टी प्रांतात देखील मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पाडाव केल्यानंतर जो काही काळ हा भूभाग ताब्यात असताना येथे ही देवनागरीत एका बाजूला ‘प्रांत साष्टी’ व दुसर्‍या बाजूला “शके (16)96” इ.स. 1774? लिहिलेली तांब्याची नाणी पाडलेली आहेत जी आजही उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे बलिष्ठ अशा मुघल सत्तेचे वर्चस्व झुगारून मराठ्यांनी ही आज खरोखर स्वप्नवत वाटावीत अशी बहुसंख्येने नाणी पाडलेली आहेत ही आपणास एक फारच अभिमानास्पद बाब आहे असे नक्कीच गौरवाने म्हणता येईल. मराठ्यांच्या हिंदुस्थानातील इतर प्रांतातील टांकसाळीचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...