विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 7 December 2022

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी

 


उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी

उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी
लेखन :प्रकाश लोणकर
बारामती येथील उत्तर मराठेशाहीतील एक मोठे प्रस्थ बाबूजी नाईक-बारामतीकर जोशी ह्यांना. त्यांनी ८२ वर्षांच्या आयुष्यात श्रीवर्धनकर भट घराण्यातील आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ पासून सवाई माधवराव( औट घटकेपुरता पेशवे झालेल्या राघोबा दादांसह)-अशा सात पेशव्यांची जवळपास ६४ वर्षांची कारकीर्द बघितली.नुसती बघितली नाही तर अंगच्या शौर्य,पराक्रम आणि पिढीजात धन बळावर त्यांनी उत्तर मराठेशाहीत स्वतःचे एक वेगळे स्थान पण निर्माण केले होते.पंतप्रधान(पेशवा) होण्याच्या महत्वाकांक्षेपायी त्यांच्या राजकीय भूमिकांत सातत्य राहिले नाही.वेळोवेळी ते सामर्थ्यशाली पेशव्यांबरोबर संघर्ष करत राहिले.पंतप्रधान पदाची आस शेवटपर्यंत अपुरीच राहिली.
कोकणातील केळशी गावचे रहिवाशी असलेल्या सदाशिव केशव जोशी आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या पोटी विश्वनाथ( बाबूजी नाईक) २३ मे १६९५ रोजी जन्मास आले.केशव जोशी हे काशी इथे सावकारीचा व्यवसाय करत असत.त्यामुळे सदाशिव जोशी सुद्धा पिढीजात सावकारीचा व्यवसाय चालविण्यासाठी सातारा इथे आले.त्यांच्या सावकारी व्यवसायामुळे साताऱ्यात त्यांना ` नाईक (सावकार)जोशी ` म्हणून ओळखले जाऊ लागले.इ.स .१७०८ पासून म्हणजे छ.शाहू महाराज सातारा गादीवर तख्तनशीन झाल्यापासून सदाशिवराव जोशी महाराजांच्या लष्करी मोहिमा,फौज्फाट्यासाठी कर्जाऊ पैसा पुरवू लागले होते.त्यांचा मुलगा विश्वनाथ (जन्म २३ मे १६९५)यांनी तरुण वयात पिढीजात सावकारी व्यव्सायातिल खाचाखोचा माहित करून घेताना शस्त्रास्त्र,युद्धकलेत पण प्राविण्य मिळविले.कोकणातील श्रीवर्धन निवासी बाळाजी विश्वनाथ भट १७ नोव्हेंबर १७१३ रोजी छ.शाहू महाराजांचे पेशवे म्हणून नियुक्त झाले.त्यांनी नव्याने जन्मास आलेल्या मराठी राज्याला आर्थिक दृष्ट्या सशक्त करण्यासाठी खूप कष्ट घेतले.यातून त्यांचा आणि सावकार बाबूजी नाईकांचा स्नेह जुळला.राज्य चालविण्यासाठी कर्जाऊ रकमेची निरंतर व्यवस्था होण्याच्या दूरदृष्टीने बाळाजी विश्वनाथांनी आपल्या चारही अपत्यांचे विवाह सावकारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात केले होते.बाळाजींची धाकटी कन्या ( थोरल्या बाजीराव पेशव्यांची धाकटी बहिण) भिउबाई हिचा विवाह इ.स.१७१२ मध्ये बाबुजींचा धाकटा भाऊ आबाजी पंत याच्याशी होऊन बाबूजी आणि बाळाजी एकमेकांचे सोयरे झाले.बाळाजी विश्वनाथ बाबूजी जोशींना आपल्या बरोबर विविध लष्करी मोहिमांत नेऊ लागले.नोवेंबर १७१८ रोजी औरंगाबादहून पन्नास हजार मराठी फौज सय्यद बंधूंच्या मदतीसाठी दिल्लीला रवाना झाली.सय्यद बंधूंच्या मदतीने मराठ्यांना चौथाई,सरदेशमुखी आणि स्वराज्याच्या अधिकृत सनदा मोगल बादशाह कडून मिळवायच्या होत्या.तसेच तीस वर्षे मोगलांच्या ताब्यात असलेल्या महाराणी येसूबाई आणि राजघराण्यातील अन्य सदस्यांची मुक्तता करून त्यांना स्वराज्यात आणायचे होते.बाळाजी विश्वनाथांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला कूच केलेल्या मराठी फौजेत अंबाजीपंत पुरंदरे,संताजी भोसले,परसोजी भोसले,पिलाजीराव जाधव,उदाजी पवार.बाळाजी महादेव फडणवीस,बाळाजी विश्वनाथांचे पुत्र बाजीराव,व्याही बाबूजी नाईक,शेख मीरा,नारो शंकर सचिव,चिमणाजी मोघे यासारखी विजीगिषु इराद्याची पराक्रमी मंडळी होती.महाराणी येसूबाई आणि राजघराण्यातील अन्य सदस्यांना घेऊन मराठी फौज २० मार्च १७१९ ला दिल्लीहून साताऱ्याच्या दिशेने निघाली.छ.शाहू महाराज आणि मातोश्रीं १२ वर्षांनी एकमेकांना भेटले!
पेशव्यांचे व्याही म्हणून बाबूजींना पेशव्यांकडून सतत पाठींबा मिळत गेल्याने त्यांच्यावर सोपवलेल्या अनेक कामगिऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या.सत्तेच्या उच्चतम वर्तुळात सदा वावर होत राहिल्याने त्यांचा विविध मान्यवर व्यक्तींशी संबंध येत गेला.यातून त्यांना अनौपचारिक असे ` बाबूजी ` नांव प्राप्त झाले.
थोरल्या बाजीरावांशी वितुष्ठ:बाळाजी विश्वनाथ एप्रिल १७२० मध्ये मृत्यू पावले.त्यांच्या पश्चात पेशवेपदी कुणाला नियुक्त करायचे यावरून सातारा दरबारात मोठ्या खेळ्या सुरु झाल्या.देशस्थ आणि कोकणस्थ दोन्ही गट आपले उमेदवार रेटू लागले.बाळाजी विश्वनाथांच्या पिलाजी जाधवराव,नाथाजी धुमाळ,उदाजी पवार,अंबाजीपंत पुरंदरे,संताजी भोसले,कान्होजी आंग्रे यांसारख्या निकटवर्तीय सहकाऱ्यांचा बाळाजींचे थोरले पुत्र बाजीराव यांना छ.शाहू महाराजांनी पेशवेपदी नियुक्ती करावे अशी इच्छा होती.बाबूजी नाईकांची पण अशीच इच्छा होती. त्यासाठी सातारा दरबारातील बऱ्याच मुत्सद्दी,राजकारण्यांचा रोष पत्करून त्यांनी छत्रपतींकडे बाजीरावांसाठी पूर्ण ताकद लावली छ.शाहू महाराजांनी पण बाळाजी विश्वनाथांनी त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट,समर्पण,प्रामाणिकपणा इत्यादी बाबी ध्यानात घेऊन बाजीराव बाळाजी(थोरले बाजीराव) यांची १७ एप्रिल १७२० रोजी पेशवेपदी नियुक्ती करून बाबूजी नाईकांस नवनियुक्त पेशव्यास सर्वतोपरी साह्य करण्याची आज्ञा केली.
बाजीरावांनी दिलेल्या सर्व कामगिऱ्या बाबुजींनी चांगल्या प्रकारे पार पडल्या.परंतु पुढे पुढे बाजीराव आणि बाबूजी यांच्यात कर्ज फेडीवरून कुरबुरी सुरु झाल्या.प्रकरण शाहू महाराजांकडे गेल्यावर त्यांनी बाबूजींना,” बाजीराव स्वतःच्या चैनीसाठी कर्ज उचलत नाहीत..वादात गुंतण्यापेक्षा सबुरी धरा”असा सल्ला दिला.बाबूजी नाईकांनी वेळोवेळी लष्करी मोहिमांसाठी पुरविलेल्या कर्जापोटी कृतज्ञता भावनेने बाजीरावांनी त्यांना मराठ्यांचे वकील म्हणून इ.स.१७२७ मध्ये निजामाकडे पाठविले.तिथे त्यांनी निजाम,मराठे,मोगल,रजपूत यांच्यातील किचकट परस्पर संबंधांचे चांगले निरीक्षण केले.निजामाचे वैभव,लष्करी ताकद,कावेबाजपणा,तेथील सावकारांचे महत्व आदींनी ते खूपच प्रभावित झाले.तरी पण त्यांनी आपली निष्ठा मराठा साम्राज्याशीच कायम ठेवली.बाबूजींच्या उत्तम कामगिरीवर खुश होऊन बाजीरावांनी त्यांना माळव्याची सुभेदारी दिली.बाबूजी नाईकांनी माळव्यातुन पाठविलेल्या खंडणी,नजराणे आणि चौथाईमुळे बाजीरावांनी युद्ध मोहिमांसाठी त्यांच्याकडून उचललेल्या कर्जाची परतफेड होऊन गेली.इ.स.१७३३ मध्ये बाबूजींना पेशव्यांनी पुण्यात बोलावून तीन पेठांची चौधरकी दिली.बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई १७३५-३६ मध्ये उत्तरेत तीर्थयात्रेला गेल्या होत्या.त्यांचे व्यवस्थापक म्हणून बाबूजी नाईक त्यांच्या बरोबर होते.नोवेंबर १७३७ मध्ये भोपाळ मार्गे दिल्लीला बाजीरावांनी काढलेल्या मोहिमेत बाबूजी नाईक पण होते.ह्या मोहिमे नंतर बाबूजींच्या ऐश्वर्यात प्रचंड वृद्धी झाली.आपल्या पैशाच्या जोरावर पेशवे लष्करी मोहिमा आखतात,कर्ज वेळेवर फेडत नाहीत पण नांव मात्र त्यांचे होते,असे विचार बाबूजींच्या मनात येण्यास सुरुवात होऊन ते पेशव्यांबरोबर बरोबरी तसेच कर्ज परतफेडीसाठी तगादे करू लागले.बाबूजी नाईक बाजीरावांच्या विरुद्ध जाण्याचे अजून एक कारण होते.बुंदेलखंड मोहिमेत बाबूजी नाईकांचा सहभाग होता.तेथून येताना लुटीत मिळालेला एक हत्ती आवडल्यामुळे त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतला.लुटीत मिळालेला यच्चयावत ऐवज प्रथम सरकारात दाखल केला पाहिजे,मग त्याची नियमानुसार वाटणी होईल असा बाजीरावांचा शिरस्ता होता.त्यानुसार त्यांनी आपल्या मेव्हण्याला,धनकोला-बाबूजी नाईकांना लुटीत मिळालेला हत्ती ताबडतोब सरकारजमा करण्याचे आदेश दिले.पण डोक्यात हवा गेलेल्या बाबुजींनी तसे करण्यास साफ नकार दिला.बाजीराव सरकारी हुकुम मोडणाऱ्याला कधीच सोडत नव्हते.त्यांनी बाबूजी नाईकांच्या वाड्यावर चौकी पहारे बसविले.चिमाजी अप्पांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटले गेले.असाच प्रकार बाबूजींचे चिरंजीव आबाजीपंत याने पण केला होता.दाभाडे सरदारांकडून मिळालेली लुट त्यांनी सरकारमध्ये जमा न करता परस्पर कर्ज वसुलीसाठी स्वतःकडे ठेवली होति.बाजीरावांचे धाकटे मेहुणे ( बहिण अनुबाईचे पती ) व्यंकटराव घोरपडे यांनी पण बाबूजी नाईकांकडून सैन्य उभारणीसाठी कर्ज घेतले होते,ज्याची परतफेड वेळेवर होत नव्हती.त्यामुळे बाजीरावांची नाईकांकडे दिलेली बहिण भिउबाईचे माहेरच्या लोकांबरोबर संबंध बिघडले.एप्रिल १७४० मध्ये बाजीरावांचे निधन झाले.
नानासाहेब पेशवे आणि बाबूजी नाईक: थोरल्या बाजीरावांचे रावेरखेडी इथे एप्रिल १७४० मध्ये अकस्मात निधन झाले.त्यांच्या जागी पेशवेपदी कुणाची निवड करावी असा प्रश्न छ.शाहू महाराजांपुढे उभा राहिला.नागपूरकर रघुजी भोसले(प्रथम)तसेच अन्य काही मातब्बर मराठा सरदारांनी बाबूजी नाईकांना पंतप्रधान(पेशवे)पद द्यावे म्हणून छ.शाहू महाराजांकडे खटपट सुरु केली.पण छ.शाहू महाराजांनी बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेबांस पेशवा नियुक्त केले.पेशवेपदाची महत्वाकांक्षा फलद्रूप न झाल्याने बाबूजी नाईक बारामतीकर आणि भट पेशवे घराण्यातील संघर्षात तेल ओतले गेले.ह्यावेळी बाबूजी नाईक ४५ वर्षांचे तर नानासाहेब अवघ्या २० वर्षे वयाचे होते..मे १७४३ मध्ये छ.शाहू महाराजांनी बाबूजी नाईकांच्या गुजरातेतील पेशवे विरुद्ध गायकवाड वादातील कामगिरीबद्दल नानासाहेबांचा विरोध असून देखील पुणे परिसरातील २२ गावे आणि बारामती महालाची जहागीर बाबूजी नाईकांना इनाम दिली.बाबूजींचे वास्तव्य बारामती इथे सुरु झाल्याने त्यांना बारामतीकर नाईक जोशी संबोधले जाऊ लागले.पेशवे पद हुकल्याच्या रागातून बाबूजी नाईकांनी बाजीराव पेशव्यांच्या छत्तीस हजार रुपये थकीत कर्जाची नानासाहेबांकडे एक रकमी परतफेड करण्याचा तगादा सुरु केला.त्यासाठी त्यांनी शनिवारवाड्याच्या दिल्ली दरवाजासमोर आमरण उपोषण करण्यासाठी एका ब्राह्मणाला पण बसविले.ब्रहम्म हत्तेचे पातक नको असेल तर संपूर्ण थकीत रक्कम एकरकमी देण्याची बाबुजींनी मागणी केली.नानासाहेबांचे मुतालिक असलेल्या महादजीपंत पुरंदऱ्यानी आपले सर्व जडजवाहीर,देवघरातील सोन्याचांदीचे देव,सोन्याचांदीची उपकरणी अगदी शंख ठेवण्याची अडणी सुद्धा,विकून रातोरात छत्तीस हजार रुपयांची रक्कम उभारून बाबूजी नाईकांचे थकीत कर्ज फेडून नानासाहेबांवरील नामुष्की टाळली!.
रघुजी भोसल्यांनी कर्नाटक मोहिमातून आणलेली संपत्ती पाहून नानासाहेबांसहित बऱ्याच सरदारांचे कर्नाटक मामला आपणास मिळावा म्हणून प्रयत्न चालले होते.बाबूजी नाईक पण त्यासाठी इच्छुक होते.छ.शाहू महाराजांनी बाबूजी नाईकांची मागणी मान्य केली पण त्यात त्यांना अपयश आल्याने इ.स.१७४६ मध्ये कर्नाटकचा मामला छ.शाहू महाराजांनी नानासाहेबांना सोपविला.सदाशिवराव भाऊनी कर्नाटकातून बरीच खंडणी वसूल केली.त्याने बाबूजी आणखीनच चवताळले.नानासाहेब मोहिमांमध्ये गुंतलेले पाहून सातारा दरबारातील त्यांच्या बाबूजी नाईक बारामतीकर,रघुजी भोसले,प्रतिनिधी,आनंदराव सुमंत,गायकवाड आदी परंपरागत विरोधकांनी छ.शाहू महाराजांकडे नानासाहेबान विरुद्ध तक्रारी केल्या.छ.शाहू महाराजांनी नानासाहेब विरोधकांच्या तक्रारींवर विश्वास ठेवून ९ मार्च १७४७ रोजी नानासाहेबांस पेशवे पदावरून बडतर्फ केले.पण नानासाहेबांची जागा घेयील असा दुसरा कुणीही लायक सरदार दिसून न आल्याने छ.शाहू महाराजांनी सव्वा महिन्याने म्हणजे १३ एप्रिलला पुन्हा नानासाहेबांस पेशवे पदी नियुक्त केले.इ.स.१७४० ते १७५३ अशी तेरा वर्षे बाबूजी नाईकांनी पेशव्यांशी स्पर्धा,संघर्ष करण्यात घालवली.पेशव्यांची जिरवण्यासाठी ते ताराराणी यांच्या गटात पण काही काळ सामील झाले होते.एप्रिल १७५३ मध्ये त्यांनी नाना साहेबांबरोबर समझौता केला.राघोबा दादांबरोबर ते उत्तरेकडील मोहिमात पण गेले.तिथे दादांशी न पटल्याने त्यांनी पिढीजात सावकारीच्या व्यवसायात अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली.याच सुमारास त्यांनी मोरोपंत पराडकर ह्या आर्यांसाठी( काव्य रचनेचा एक प्रकार) प्रसिद्ध पावलेल्या कवीस आश्रय दिला.नाईकांनी मोरोपंतांची पुराणिक पदावर नियुक्ती केली.
सैनिकी बाण्यात उत्तम गती असलेल्या बाबुजींनी इ.स.१७५७ मध्ये निजामाकडून नळदुर्ग किल्ला काबीज केला,उदगीर मोहिमेत सदाशिवरावभाऊना उत्तम साथ दिली.त्यामुळे नानासाहेबांनी अहमदशहा अब्दाली विरुद्धच्या पानिपत मोहिमेत सदाशिवरावभाऊ बरोबर बाबूजी नाईकांना पण पाठविले होते.विश्वासराव आणि सदाशिवरावभाऊ युद्धात ठार झाल्याचे ऐकून अन्य काही मराठे सरदारांबरोबर बाबूजी नाईक पण दिल्लीच्या दिशेने पळते झाले.नानासाहेब पेशव्यांना पानिपत संग्रामाची हकीकत कळविण्याची कटू जबाबदारी बाबुजींनी घेतली होती.पानिपत युद्धानंतर अवघ्या सहा महिन्यांनी म्हणजे जून १७६१ मध्ये नानासाहेबांचे निधन झाले.नानासाहेबांच्या निधनानंतर पुण्यात उद्भवलेली दंगल काबूत आणण्यासाठी बाबूजी नाईकांनी सखारामबापू आणि राघोबा दादांस मदत करून दंगल नियंत्रणात आणली.ह्यावेळी त्यांनी पेशवे पदासाठी दावा न करता अवघ्या सोळा वर्षे वयोमान असलेल्या माधवराव ह्या नानासाहेबांच्या द्वितीय पुत्रास पाठींबा देऊन अनेक मान्यवर व्यक्तींना माधवरावांच्या बाजूस आणले.निजामाविरुद्ध्च्या संघर्षात बाबुजींनी माधवरावास बरीच मदत केली.पण युद्धानंतर निजामाकडून पेशव्यांना मिळालेल्या जहागीरीवरून पुन्हा त्यांचे पेशव्यांशी बिनसले आणि ते लष्कर सोडून निघून गेले.नंतर माधवरावांनी त्यांची समजूत घालून त्यांना हैदर विरुद्धच्या मोहिमेत सामील करून घेतले.पण ह्या मोहिमेत सुद्धा स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी त्यांनी माधवरावांच्या आज्ञा पाळण्यात चालढकल सुरु केली. हि बाब माधवरावांच्या लक्षात आल्यावर भीतीने बाबूजी नाईक पेशव्यांचा तळावरून काळोख्या रात्रीचा फायदा घेऊन पळून गेले.हि खबर माधवरावांस मिळताच त्यांनी बाबूजींची मुले,माणसे,कुटुंब कबिला कैद करून मंगळवेढ्याला रवाना केला.बाबूजी नाईकांना शरण येण्याशिवाय अन्य पर्याय माधवरावांनी ठेवला नव्हता.नोवेंबर १७७२ मध्ये माधवरावांच्या अकाली मृत्यूने बाबूजींच्या मनावर जबरदस्त आघात होऊन ते जहागिरीच्या गावी—बारामतीला जाऊन स्वस्थ बसले.
माधवरावांच्या मृत्यू नंतर त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला.राघोबा दादांच्या दुर्गा ह्या कन्येचा म्हणजे नारायणरावांच्या चुलत बहिणीचा विवाह फेब्रुवारी १७७३ रोजी बाबूजी नाईकांचा मुलगा पांडुरंगराव याच्याबरोबर शनिवारवाड्यात थाटामाटाने पार पडला.यासाठी नारायणराव पेशव्यांनी स्वतः महत्वाच्या व्यक्तींच्या घरी जाऊन आमंत्रणे दिली होती,तसेच अंबारीतून पुणेकर जनतेला ह्या विवाहाच्या अक्षदा वाटल्या होत्या.ह्या विवाहाने बाबूजी आणि राघोबादादा एकमेकांचे व्याही झाले.यापूर्वी थोरल्या बाजीरावांची बहिण भिउबाईचा विवाह बाबूजी नाईकांच्या बंधुशी झाला होता.अशा प्रकारे दुसर्यांदा नाईक आणि पेशवे घराण्यात विवाह संबंध घडून आला.
नारायणरावाच्या हत्ते नंतर बारभाई नी काही दिवस नारायणराव पत्नी गंगाबाईच्या नावाने कारभार चालविला.सवाई माधवरावांच्या जन्मानंतर त्यांना पेशवाई ची वस्त्रे मिळाली.सवाई माधवरावांच्या जन्माच्या वेळी बाबुजींनी आपली सून दुर्गाबाई(राघोबादादांची मुलगी)गंगाबाईच्या सेवेसाठी पुरंदर किल्ल्यावर पटवली होती.बारभाई मंडळींच्या विनंतीवरून ते बारभाईनच्या राजकारणात सहभागी झाले होते.सवाई माधवरावांच्या जन्मा नंतर बाबूजी नाईक विशेष क्रियाशील राहिले नाहीत.बाबूजी नाईक वयाच्या ८२ व्या वर्षी ६ ऑक्टोबर १७७७ रोजी मृत्यू पावले.मृत्यूचे ठिकाण आणि कारण अजून तरी अज्ञात आहे.
बाबूजी नाईकांचे वास्तव्य असलेला बारामती येथील गढीवजा वाड्यात राज्य सरकारची विविध कार्यालये असून सध्या त्याचे मोठ्या प्रमाणावर दुरुस्तीचे( conservation and restoration) काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
संदर्भ:१-मराठी रियासत खंड पाच-गो.स.सरदेसाई
२-पेशवाई:ले.कौस्तुभ कस्तुरे
३-पेशवे:ले.श्रीराम साठे
४- मराठ्यांचा इतिहास खंड दोन आणि तीन :संपादक ग.ह.खरे आणि अ.र.देशपांडे.
-- प्रकाश लोणकर

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...