विनोद जाधव एक संग्राहक

Friday 27 January 2023

छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या दोन सनदा

 

छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या दोन सनदा

लेखन ::श्री नागेश सावंत

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते छत्रपती थोरले शाहू महाराजांपर्यंत स्वराज्यात अनेक व्यक्ति पेशवे म्हणून मराठा साम्राज्यात पेशवे पदावर विराजमान झाल्या. बाळाजी विश्वनाथ भट हे शिवशाहीच्या प्रारंभापासून आठवे पेशवे म्हणून पेशवे पदावर विराजमान झाले.
पेशवे या फारसी शब्दाचा अर्थ प्रंतप्रधान असा असून पेशवाई या शब्दाचा अर्थ सामोर जाणे . पेशव्यांच्या शिक्यांमध्ये “ मुख्य प्रधान “ ही अक्षरे दिसून येतात. राज्याची मुलकी व लष्करी व्यवस्था पाहण्यासाठी नेमलेले हे पद.
विजयनाम संवत्सरे शके १६३५ मार्गशीर्ष शु. एकादशी , मंगळवार दिनांक १७ नोहेंबर १७१३ रोजी छत्रपती थोरले शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पुण्यातील “ मांजरी ” गावी पेशवेपदाची वस्त्रे दिली. बाळाजी पेशवे यांच्या पश्चात भट कुटुंबातील थोरले बाजीराव पेशवे (बाजीराव बल्लाळ ) व नानासाहेब पेशवे (बाळाजी बाजीराव) यांना छत्रपती थोरले शाहू महाराजांनी पेशवेपदाची वस्त्रे दिली.
१ ओक्टोंबर १७४९ रोजी छत्रपती थोरले शाहू महाराजांनी दोन याद्या ( सनदा ) तयार करवून घेतल्या व त्या नानासाहेब पेशव्यांना दिल्या .या दोन सनदा म्हणजे छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे मृत्यूपत्रच या दोन सनदा पुढीलप्रमाणे
शाहू महाराजांस पुत्रसंतान नव्हते म्हणून अंतसमयी त्यांस फार दुःख होऊन पुढे राज्यभार कोण चालविणार याबद्दल चिंता उत्त्पन्न झाली. पुष्कळ तपास व खल केला. पेशव्यांशिवाय इतरांच्या हातून राज्याचा निभाव लागणार नाही अशी खात्री पटून त्यांनी मरणापूर्वी दोन लेख स्वहस्ताने लिहून पेशव्यांचे स्वाधिन केले आणि त्यांस राज्यभार चालविण्याची आज्ञा केली. याच आधारावर पेशव्यांनी पुढील उद्योग केला. हे दोन लेख मृत्युपत्रासारखे महत्वाचे आहेत. ( ऐतिहासिक पत्रबोध :- गोविंद सखाराम सरदेसाई )
सनद पहिली :-
श्री
राजमान रा| बालाजी प्रधान पडित यास आज्ञा - तुम्ही फौज धरने सरवास आज्ञा केली त्याच्या दैव नाही महाराजास दुखने जाले नाही बर होत नाही राजभार चाला पाहिजे तर पुढे वंस बसवने. कोलापुरचे न करने. चिटणीसास सरव सागितले तसे करने वंस होईल त्याच्या आज्ञेत चालून राजमंडल चालवने. चिटणीस स्वामीचे इसवासू त्याच्या तुमच्या विचारे राज राखने वंस होईल तो तुमची घालमल करणार नाई
सुदन असा
सनद दुसरी :-
श्री
राजमान रा| बालाजी पडित प्रधान
आज्ञा जे - राजभार तुम्ही चालवाल हा भरवसा स्वामीस आहे. पहिले सागितले खातरजमा ती चिटणीसानी अढळ केली तुमचे मस्तकी हात ठेविला आहे. वस होईल तो तुमचे प्रधानपद चालवील करील अंतर त्यास सफत आसे त्याचे आज्ञेत चालून सेवा करने. राज राखने . बहुत काय लिहिने,
सुदन असा.
सनदांचा सारांश पुढीलप्रमाणे :- स्वराज्याचा राज्यकारभार चालावा यासाठी गादीवर वंश बसवावा परंतु कोल्हापूर गादीतील व्यक्तीस गादीवर घेऊ नये. राज्यकारभार नानासाहेब पेशवे चालवतील या बाबत शाहू महाराजांना विश्वास असून नानासाहेबांच्या वंशाला पेशवेपद वंशपरंपरागत छत्रपतींकडून देण्यात येईल. छत्रपतींच्या आज्ञेत राहून स्वराज्याचा कारभार करावा .
या दोन सनदांमुळे नानासाहेब पेशवे यांच्या पुढील वंशास पेशवेपद वंश परंपरागत मिळाले. छत्रपती थोरले शाहू महाराजांनी राज्यकारभाराची जबाबदारी नानासाहेबांकडे सोपवली त्यामुळे पेशवे मराठा साम्राज्याचे मुख्यातार झाले.
लेखन आणि संकलन :- श्री नागेश मनोहर सावंत देसाई
संदर्भ :- ऐतिहासिक पत्रबोध :- गोविंद सखाराम सरदेसाई

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...