विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 24 May 2023

करवीर छत्रपती संभाजीराजे

 


करवीर छत्रपती संभाजीराजे
२३ मे १६९८ रोजी करवीर छत्रपती संभाजी राजे यांचा जन्म छत्रपती राजाराम महाराज व राजसबाई याांच्या पोटी झाला.
शिवछत्रपती यांचे दोन पुत्र छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज .छत्रपती संभाजी महाराजांनंतर छत्रपती राजाराम महाराज मराठ्यांचे छत्रपती बनले.याचवेळी सन १६८९ साली शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या राणी येसूबाई व पुत्र शाहू राजे रायगडावर मोगलांचे कैदी बनले. छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यु स.१७०० साली घडून आला.राजाराम महाराजांना चार पत्नी व दोन पुत्र होते.महाराणी ताराराणी यांच्या पोटी जन्मलेले शिवाजी राजे व तिसर्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्मलेले संभाजी राजे .राजाराम. महाराजांच्या मृत्यूनंतर ताराराणीने आपले पुत्र शिवाजीराजे यांना गादीवर बसवले.आणि स.१७०० पासून १७१४ पर्यंत हिंदवी स्वराज्याचा कारभार केला. १७०७ मधे औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मोगलांच्या कैदेतून सुटून छत्रपती शाहू महाराज स्वराज्यात आले.त्यांचा व ताराराणी यांचा झगडा होऊन त्यांनी साताऱ्यात आपली गादी स्थापन केली. तिकडे पन्हाळ्यास तारांराणींनी राजधानी करून वारणेच्या दक्षिणेकडील प्रदेशात आपला अंमल जारी ठेवला. त्यांचे हे राज्य करवीरचे राज्य अथवा कोल्हापूरचे राज्य म्हणून प्रसिद्धीस आले.
या राज्याचा कारभार करीत असताना अचानक ताराराणीच्या मनोरथाना प्रचंड हादरा बसला. तो खुद्द राजघराण्यातील घटनांनी. या घटना अत्यंत वेगाने घडत होत्या. याची चाहूल मात्र ताराराणीना लागली नाही. या घटनांची परीनीती नाट्यपूर्ण सत्तांतरामुळे झाली .या सत्तांतरामुळे ताराराणी व त्यांचे पुत्र शिवाजी राजे यांना पन्हाळ्यावर राजकैदेत पडावे लागले.छत्रपती राजाराम महाराज व राजसबाई यांचे पुत्र संभाजीराजे स.१७१४ पासून कोल्हापूर राज्याच्या गादीवर बसले. आणि नवी राजवट सुरू झाली.
या संघर्षाच्या ठिणग्या राजघराण्याच्या बाहेर किंवा आत उडाल्याचे दिसत नाही. पन्हाळ्याच्या राजवाड्यात घडलेल्या घटनेला" रक्त शून्य सत्तांतर" असे म्हणता येईल. करवीर राज्याच्या संदर्भात हे सत्तांतर अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरले. ताराराणी सारख्या शूर स्त्रीच्या विरुद्ध जाऊन त्यांच्या हातातील सत्ता हस्तगत करणे सोपे काम नव्हते. सत्तांतराच्या संबंधी किंचित जरी शंका आली असती तरी ताराराणीने आपल्याविरुद्ध होणाऱ्या कारस्थानाचा संपूर्णपणे बिमोड केला असता .परंतु अचानक पणे सर्व पारडे फिरावे आणि एका पारड्यातील वजन दुसऱ्या पारड्यात जाऊन पडावे हे सारे केव्हा व कसे घडले यासंबंधी फक्त आश्चर्य वाटते .अशी ही सत्तांतराची घटना घडली .
छत्रपती संभाजीराजे यांनी १७१४ ते १७६० असे तब्बल ४६ वर्ष राज्य केले. एवढा प्रदीर्घ काळ राज्य करण्याची संधी यापूर्वी छत्रपती घराण्यात कोणालाच मिळाली नव्हती.या कालखंडात त्यांना त्यांच्या मातोश्री राजसबाई या कारभारात मदत करत होत्या. त्यांचा दरारा व शिस्त कोल्हापूर राज्याची अधिसत्ता बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरली.छत्रपती संभाजी महाराज यांची सर्वात ऊल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्यांनी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्याशी केलेला वारणेचा तह .या तहात त्यांनी आपल्या राज्याची सीमा ठरवून घेतली. सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या एकत्र करण्या संबंधी स.१७१० साली केलेल्या करारात पुढच्या राजकीय घटना अतिशय दूरदर्शीपणाच्या व महत्त्वाच्या होत्या.छत्रपती संभाजी राजे स्वतःहा अनेक लढायात जातीने हजर रहात असत.
छत्रपती संभाजी महाराज यांचे एकंदरीत ७ विवाह झाले होते. यांच्या राज्यकारभारात त्यांच्या चौथ्या राणीसाहेब तोरगलकर शिंदे यांच्या घराण्यातील जिजाबाई यांचा अत्यंत महत्वाचा सहभाग होता.या जिजाबाई म्हणजे छत्रपती संभाजी राजांच्या महाराणी म्हणजे शिवछत्रपतींच्या नातसून व छत्रपती राजाराम महाराजांच्या धाकट्या सून होत्या.अत्यंत तेजस्वी, बुद्धीमान व विचारी अशा त्या राणी होत्या. शाहू महाराज निधन पावल्यानंतर छत्रपतीं संभाजीराजे यांनी साताऱ्याकडे फौजा वळवल्या होत्या. परंतु राणी जिजाबाईंच्या सल्ल्यावरून त्यांनी आपला मोर्चा मागे वळवला. ज्यावेळी संभाजीराजे साताऱ्यात जात त्या-त्या वेळी त्यांच्या पत्नी जिजाबाई त्यांच्याबरोबर असत. राज्य विस्तारासाठी आणि कारभारासाठी गुणी व्यक्तीचा संग्रह करण्याची दृष्टी छत्रपती संभाजीराजांकडे होती. छत्रपतीं संभाजी राजे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते .हे त्यांनी मंदिरांना व साधुसंतांना दिलेल्या सनदा पत्रावरून दिसून येते.सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीवर सन १७३२ साली छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्री बांधली होती .संभाजी राजेंनी एकूण सात लग्न केली होती . परंतु त्यांना पुत्रसंतती झाली नाही.
संभाजी महाराज यांनी १७१४
ते १७६० सालापर्यंत राज्य केले. ते करवीर संभाजी म्हणून इतिहासात प्रसिद्ध होते.सातारा व करवीर दोन पृथक मराठी राज्य स्थापन झाल्यापासून या दोन्ही राज्यात बरीच वर्ष सतत संघर्षाची भावना राहिली.
ताराराणीच्या कारकिर्दीतील वीरांचे संघर्षाचे धोरण सत्ताबदल होऊन छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले तरी बदलले नाही.शिवरायांनी ज्या हेतूने स्वराज्याची स्थापना केली, शंभूराजांनी, राजाराम महाराजांनी आणि ताराऊंनी ज्या हेतूने ते प्राणपणाने टिकवून ठेवले, तो हेतू , ती परंपरा, तो वारसा संभाजीराजांनी प्रभावीपणे जोपासला. शिवरायांनी सुरु केलेल्या प्रथा, राज्यकारभाराचे नियम, आदर्श हे संभाजीराजांनी पुर्णपणे अंगीकारले होते. "सार्वभौमत्व" हे मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याचे सर्वात मोठे मानचिन्ह होते. या सर्वभौमत्वासाठी लाखो वीरांनी आपले रक्त सांडले होते. स्वराज्याचे हे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचे काम राजारामपूत्र संभाजीराजे (दुसरे) यांनी केले.
२० डिसेंबर १७६० रोजी छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन झाले. निधनाची वार्ता समजताच नानासाहेब पेशवे यांनी राणी जिजाबाई यांच्या सांत्वनासाठी न येता राज्यावर फौजा पाठवून जप्तीचा हुकूम पाठवला.परंतु हुशार जिजाबाईंनी पेशव्यांच्या जप्तीचा डाव हाणून पाडला.जिजाबाई स्वतः फौजेचे नेतृत्व करत असत.जिजाबाई यांनी आपल्या अंगचे लष्करी नेतृत्वाचे गुण दाखवल्याचे इतिहासात अनेक ऊल्लेख आहेत.यथावकाश जिजाबाई यांनी शहाजी भोसले खानवटकर यांचे पुत्र मानकोजीस २२ सप्टेंबर १७६२ रोजी विधिपूर्वक दत्तक घेऊन त्यांचे नामरण छत्रपती शिवाजी असे ठेवून पुढील राज्यकारभार केला.
🙏अशा या थोर (करवीर) छत्रपती संभाजी महाराज यांना आमचा मानाचा मुजरा 🙏
लेखन ✒️
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
( इतिहास अभ्यासक पुणे)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...