विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

संभाजी महाराजांनी फक्त मराठ्यांचे आरमार राखले नाही तर ते इतके मजबूत केले

 संभाजी महाराजांनी फक्त मराठ्यांचे आरमार राखले नाही तर ते इतके मजबूत केले 

 लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'


संभाजी महाराजांनी फक्त मराठ्यांचे आरमार राखले नाही तर ते इतके मजबूत केले की मराठ्यांच्या आरमाराची दखल तत्कालीन सर्व भारतीय सत्तांना घावी लागली...
● इतिहासाचार्य वा.सी.बेंद्रे लिहितात..,
“युरोपिय लोकांना जो त्यांच्याजवळील अस्त्रांच्या अजिंक्यतेचा विश्वास वाटत होता त्याला संभाजी महाराजांनी हादरा दिला. युरोपिय लोकांना समुद्रावरील वर्चस्वाचा अभिमान वाटत होता. परंतु संभाजी राजांच्या दर्यावर्दी व्यापाराच्या अभावी ते संभाजी राजांचे काही नुकसान करू शकत नव्हते. उलट युरोपीय मोठे व जड आरमार संभाजी राजांच्या चिखलांनी भरलेल्या खाड्यांनी परिपूर्ण अशा किनाऱ्यास युद्धास निरुपयोगी होते याची जाणीव संभाजी राजांनी अवघ्या ८ वर्षाच्या काळात करून दिली. दारुगोळा करण्याचे २ कारखाने काढल्याने त्याबाबतही युरोपीय लोकांवर अवलंबून राहावे लागले नाही. युरोपीय राष्ट्रांना या काळापर्यंत कोणीही पायबंद घालण्याचा यशस्वी प्रयत्न न केल्याने पोर्तुगीज व इंग्रज जे चढाईने वागत त्यांना आळा बसल्याने त्यानाही आपल्या राज्य कारभारात व धार्मिक धोरणात क्रांती करून घेणे भाग पडले...”
शिवाजी महाराजांनी शून्यातून निर्माण केलेले आरमार संभाजी महाराजांनी जपले आणि त्याची व्याप्ती वाढवली. अनेक आरमारी शत्रू एका वेळी समोर उभे ठाकले असताना देखील मराठ्यांचे आरमार संभाजी महाराजांच्या काळात प्रतिकूल परिस्थितीत टिकले. स्वत संभाजी महाराजांनी आरमारी मोहिमांकडे जातीने लक्ष घालून आरमार, आवश्यक मनुष्यबळ, आरमारी किल्ले, जहाजे, खाड्यांवरील चौक्या ही सर्व रचना जगवली. यासाठी लागणारा पैसा उभा करून वेळोवेळी तो मोहिमांकरता पुरवला. मुघलांसारखा बलाढ्य शत्रू अंगावर चालून आलेला असताना देखील जहाज, गलबते असून चालत नाही तर त्यासाठी लागणारे मनुष्यबळ देखील तितकेच महत्वाचे असते. एवढ्या साऱ्या शत्रूच्या एकत्रित हल्ल्यात देखील संभाजी महाराजांनी आपल्या सैन्याला प्रोत्साहित करून स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणपणाने उभे केले. मराठ्यांनी संभाजी महाराजांच्या नेतृत्वात प्रदीर्घ लढा दिला. यातील आरमारी लढ्याचे श्रेय अत्युच्च राष्ट्रनिष्ठा असलेल्या मराठ्यांना द्यावेच लागेल. संभाजी महाराजांच्या काळातील मराठ्यांच्या आरमाराची व्याप्ती तत्कालीन नोंदी पाहिल्यास कळून येते. आरमारात असलेली जहाजे, गलबते, गुराबे, आरमारावर आणि बंदरावर असलेले सैन्य यावरून मराठ्यांच्या आरमाराची धास्ती इतर समुद्री सत्तांनी का घेतली असावी याची सहज कल्पना येते. संभाजी महाराजांच्या आरमारात अनेक कुशल नाविक होते, त्यांची माहिती आपण लेखात पाहिलेलीच आहे...
———————————
🎨 ओंकार जगताप 👌🏼♥️🔥

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...