विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 2 May 2024

कोकण किनार्‍यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी आंग्रे.

 


कोकण किनार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी आंग्रे...
🚩लेखन :

गडवाटकरी 'सचिन पोखरकर'

अंदमान बेटांवर कान्होजींचा (कान्होजी आंग्रे) तळ होता. ही बेटे भारतभुमीला जोडण्याचे श्रेय त्यांनाचं जाते..
कान्होजी आंग्रे मराठा आरमारातील अत्यंत पराक्रमी व धैर्यवान नेता होता. कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीज, इंग्रज, डच यांचा पराभव करत त्यांनी अनिर्बंध सत्ता गाजवली..
कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी झाला. मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजी महाराजांनी चौलजवळ सन १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, त्यात प्रथम प्रसिद्धीस आले. इ.स.१६५९ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी गेले. त्यांना मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. इ.स.१६८० तुकोजीं आंग्रेंचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वात कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होत..
आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्ना नंतरही कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले..
छत्रपति संभाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचा किल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दी कासमकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजींनी सिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्या मोगलांचे स्वप्न कान्होजींनी धुळीस मिळविले. सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी केला या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली..
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगड मुघलांच्या ताब्यात पडला आणि छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीला जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. इ.स.१६९४-१७०४ च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मुघलांकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले; शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी ‘आपण कोकणकिनाऱ्याचे राजे‘ अशी घोषणा केली. मुंबई जवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुल करायला आरंभ केला. १७ व्या शतकाच्या अखेरीस अलिबाग या गावाची स्थापना केली, त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते. कर्तृत्व, पराक्रम आणि निष्ठा याची परंपरा कान्होजीला पूर्वजांकडून लाभलेली होती. तरीही स्वपराक्रमाने, स्वत:चा एक स्वतंत्र ठसा त्यांनी इतिहासात उमटविला. छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यांस मराठा आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला..
४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवार मधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०,००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला..
२६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली..
१७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रॅंसिस्को जोस डी सॅंपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले..
● प्रमुख लढाया :
•इ.स.१७०२-कोचीनमध्ये सहा इंग्रजांसह काही जहाजांवर ताबा.
•इ.स.१७०६-जंजिऱ्याच्या सिद्दीवर हल्ला आणि विजय.
•इ.स.१७१०-ब्रिटिश लढाऊ जहाज गोडोल्फिनशी दोन दिवस झुंज दिल्यानंतर केनेरी बेटांवर (खांदेरी) कब्जा.
•इ.स.१७१२-मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी याचे खाजगी जहाज पकडले. ३०,००० रुपयांच्या खंडणीनंतर सुटका.
•इ.स.१७१३-ब्रिटिशांकडून १० किल्ले हस्तगत.
•इ.स.१७१७-ब्रिटिशांनी केनेरी बेटांवर केलेला हल्ला असफल. ६०,००० रुपयांची खंडणी वसूल केली.
•इ.स.१७१८- मुंबई बंदराची नाकेबंदी. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली.
•इ.स.१७२०-ब्रिटिशांचा घेरिया (विजयदुर्ग) किल्यावर हल्ला असफल.
•इ.स.१७२१-अलिबागवर ब्रिटिश आणि पोर्तुगीज आरमाराचा एकत्रित हल्ला असफल.
•इ.स.१७२३-ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला.
कान्होजींनी मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोकणपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज इत्यादी परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजीं आंग्रेंची जहाजे त्रावणकोर कोचीनपासून उत्तरेस सुरत कच्छपर्यंत समुद्रातून निर्विवाद संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीच्या धंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने देखील त्यांनी उभारले..
अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय.एन.एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे..
संदर्भ : कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची.
लेखक : श्री.मनोहर माळगावकर.
कुलाबकर आंग्रे सरखेल.(आंग्रे घरण्याचा इतिहास).
लेखक : दामोदर गोपाळ ढबू.
――――――――――――

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...