विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 20 November 2025

बसरूरची मोहीम

 २४ ऑक्टोबर, मराठा आरमार दिन,


बसरूरची मोहीम..

🚩
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वादळी कारकिर्दीत अनेक लढाया केल्या, वेळप्रसंगी तह केले, कित्येकदा यशस्वी माघार घेतली, छापा टाकून शत्रूचा पराभव केला, समोरा समोर भेटून कोथळा बाहेर काढला, पण सर्व अतुलनीय पराक्रमांना मागे सोडणारी एक लढाई तुमच्या अंगावर शहारे आणल्या शिवाय राहात नाही. ती म्हणजे "बसरूरची आरमारी मोहीम" या मोहिमेच नेतृत्व दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आहे, जे विजापूरच्या आदिलशाही सत्तेला, आशिया खंडातील बलाढ्य सत्तेचा बादशहा औरंगजेबाला उभ्या हयातीत साधता आले नाही ते शिवरायांनी वयाच्या ३५ व्या वर्षी करून दाखवले, त्यामुळे ह्या मोहिमेला मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे...
१. छत्रपती शिवाजी महाराजांचे सागराशी परिचय माणसाच्या मनात आलं अन काम साध्य केलं अस कधीच होत नाही, त्यामागे अथक परिश्रम, दूरदृष्टी, अचूक व्यवस्थापन गरजेचे असते. महाराजांनी १६६५ ला यशस्वी केलेल्या बसरूरच्या मोहिमेची बीज १० वर्षे आधीच जावळी प्रकरणात रोवली गेली होती. मग्रूर जावळीच्या मोऱ्यांच पारिपत्य केल्यावर रायरीचा (रायगड) किल्ला ताब्यात आला अन स्वराज्याची सरहद्द थेट समुद्राला भिडली व सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच ह्या सागरी शत्रू सत्तांशी शिवरायांची ओळख झाली...
२. आरमाराची स्थापना व विस्तार : किनारपट्टीच्या सुरक्षित करायची असेल तर सिद्धी, इंग्रज पोर्तुगीज यांच्याशी दोन हात करावे लागतील, त्यासाठी दर्यालाच वेसण घालावी लागेल हे महाराज जाणून होते, यथावकाश १६५७ मध्ये कल्याण, भिवंडीचा प्रदेश महाराजांनी जिंकून घेत राजापूरपर्यंतचा प्रदेश काबीज केला, २४ ऑक्टोबर १६५७ ला कल्याणच्या खाडीत आरमार उभारणीला प्रारंभ करत, हजारो वर्षात हिंदुस्तानच्या इतिहासात जे झाले नाही ते करून दाखवले. जहाजे बांधायची म्हंटल्यावर कारागीर हवेत अन डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या आपल्या मराठी माणसांकडे जहाज बांधणीची कला अवगत असणे अशक्यच. वसईला जहाज बांधणीत निष्णात असलेले पोर्तुगीज कारागीर होते. रुई लैंताव व्हियेगस व त्याचा मुलगा फेर्नाव व्हियेगस लैंताव या बाप लेकांच्या बरोबर तब्बल ३५० पोर्तुगीज कारागीर कामाला लागले. इथं महाराजांची मुत्सद्देगिरी वाखाणण्याजोगी आहे, बांधत असलेलं आरमार हे जंजिऱ्याच्या सिद्यांचा विरोधात वापरणार आहे असं जाहीर केले होते.(पुढे याच आरमाराने सिद्यांसहित डच पोर्तुगीज इंग्रजांची दातखीळ बसवली, खांदेरी उंदेरी प्रकरण तर कळसच) पुढे वसईचा कॅप्टन आंतोनियू मेलू द कास्त्रूच्या पत्रावरून हि पोर्तुगीज कारागीर मंडळी आरमाराच काम सोडून रातोरात वसईला निघून गेली. दरम्यानच्या काळात १६५७ ते १६५९ मध्ये २० जहाजे तयार झाली होती...
३. बसरूरचीच मोहीम का : बेदनूरचा राजा (स्थानिक लोक बेदनूर म्हणत व पोर्तुगीज इंग्रज बार्सिलोर म्हणत) शिवाप्पा नायकाने १६४५ ते १६६० आदिलशाहीच्या दुर्बलतेचा फायदा घेत डचांच्या मदतीने महाबळेश्वरपासून निळेश्वरपर्यंतची किनारपट्टी काबीज केली. १६६० ला शिवाप्पा मृत्यू पावला, त्याचा मुलगा भद्रप्पा आणि भाऊ वेंकटप्पा ह्यांच्या सत्तासंघर्ष झाला, शेवटी १६६१ ला वेंकटप्पा गादीवर आला, पुन्हा एका वर्षात भद्रप्पाने गादी मिळवली, १६६४ ला भद्रप्पा मृत्यू पावला अन ह्या अनागोंदीचा फायदा उचलत आदिलशहाने या प्रदेशात भरमसाठ खंडणी वसूल केली हे महाराजांना समजले, ह्या स्थळावर स्वारी केली तर भरपूर धनार्जन होईल असे महाराजांना वाटले अन महाराजांनी योजना आखली...
४. बसरूरच्या मोहिमेची पूर्वतयारी : महाराजांच्या मनात आलं आणि अचानक मोहीम उघडली अशी एकही घटना माझ्या तरी वाचनात नाही. प्रत्येक मोहिमेआधी त्या प्रदेशाची खडान्खडा माहिती, चोरवाटा, शत्रूची बलस्थाने, कमकुवत बाजू, जाण्याचा मार्ग, येण्याचा मार्ग, शत्रूची फौज, दारुगोळा, या सगळ्याची गुप्तपणे इत्यंभूत माहिती जमवून महाराज मोहिमेची आखणी करत. २६ नोव्हेंबर १६६४ च्या इंग्रज पत्रावरून समजते कि महाराजांची ८० जहाजे भटकळ बंदरापर्यंत जाऊन पुन्हा माघारी आली होती. (बसरूरचा मार्ग ह्याच बंदरातून जातो)...
५. मोक्याच्या क्षणी हल्ला : बसरूरला पोहोचायचे म्हणजे जमिनीवरून जाणे शक्य नाही. एकमेव पर्याय सागरी मार्ग. मी वरती दिलय कि पूर्वतयारी म्हणून महाराजांची काही जहाजे १६६४ मध्ये भटकळ पर्यंत जाऊन आली होती. पोर्तुगीजांनी मुंबई बेट इंग्रजांना दिले ते समारंभपूर्वक हस्तांतरित करण्यासाठी दिनांक ८ फेब्रुवारी १६६५ ला मोठा कार्यक्रम मुंबईत आयोजित केला होता, त्यासाठी पोर्तुगीज आरमार मुंबईला गेले होते, ह्याच नामी संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी उचलत निर्धोकपणे बसरूरकडे प्रयाण करायचं ठरवलं, मित्रहो हि आहे शिवाजी महाराजांच्या सक्षम हेरखात्याचे दमदार कामगिरी, विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात समुद्रही शांत असतो. हे निसर्गाचे योग्य आकलन...
६. मिर्झाराजाचे संकट : बसरूरच्या मोहिमे दरम्यान औरंगजेबाचा विश्वासू सरदार मिर्झाराजा आणि दिलेरखान बलाढ्य फौजेनिशी स्वराज्यात उतरत होता, ३ मार्च रोजी ते पुण्यात पोहोचले पण अशाही स्थितीत महाराज विचलित झाले नाहीत त्यांनी बसरूरची मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वतःला झोकून दिले...
७. बसरूरच्या आरमारी मोहिमेचा लेखाजोखा : ८ फेब्रुवारीला मालवणहुन तीन मोठी गलबते, ८५ छोटी गलबते, ६-७ हजार सैन्यबळ घेऊन राजे गोवा, कारवार, कुमठा, होनावर, भटकळ, या मार्गाने १३ फेब्रुवारीला गांगुळी बंदरापाशी पोहोचले. येथून भूमार्गाने चालत महाराज बसरूरला पोहोचले. शहरावर छापा मारून व्यापाऱ्यांकडून खंडणी जमा करून महाराज गलबताने गोकर्णामार्गे अंकोल्याला परतले. प्रत्यक्ष ह्या मोहिमेत आरमारी लढाई झाली नसली तरी, पोर्तुगीजांच्या नाकावर टिच्चून महाराज २०० किमी चे अंतर ५-६ दिवसांत समुद्रमार्गे पार करून गेले व अगणित माल, जडजवाहर तब्बल २ कोटी होनांचा ऐवज (सभासदाच्या नोंदीनुसार) घेऊन स्वराज्यात परतले हि हिंदुस्तानच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावी अशी घटना आहे...
भारतीय मराठा आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखले जाते...🙏🚩
सर्वाना मराठा आरमार दिनाच्या सह्याद्री, जलदुर्ग एवढ्या शुभेच्छा...
जय जिजाऊ । जय शिवराय । जय शंभूराजे ।।

No comments:

Post a Comment

संपूर्ण हिंदुस्थान मध्ये गोहत्याबंदी कायदा करण्यास कृष्णभक्त श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांनी दिल्लीच्या बादशहास भाग पाडले

  संपूर्ण हिंदुस्थान मध्ये गोहत्याबंदी कायदा करण्यास कृष्णभक्त श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार यांनी दिल्लीच्या बादशहास भाग पाडले --------...