कर्नाटक राज्यात गुलबर्गा जिल्ह्यातला "मालखेडचा किल्ला". मालखेड हे ठिकाण उत्तर कर्नाटकातील असून, सागरपासून ईशान्येस ४५ मैलांवर आहे. त्यावेळी या ठिकाणास मोठे महत्त्व होते. ते गोवळकोंडा प्रदेशाचे प्रवेशद्वारच समजले जात...
या लढाईनंतर बहुधा नजिबखान निघून गेला असावा; पण तोपर्यंत हिंमतखान तिथे येऊन पोहोचला. संताजीस ही बातमी समजल्यावर तो हिंमतखानावर घसरला. माणगाव या गावा जवळ त्याने खानाच्या सैन्यास सर्व बाजूंनी घेरले. खान मोठ्या अडचणीत सापडला. पण त्याच्या सुदैवाने याच वेळी हमीदुद्दीनखान व ख्वाजाखान हे दोन मोगल सरदार त्याच्या मदतीस धावले. मोगली लष्कराची संख्या जास्त झाल्याचे पाहताच संताजीने आपली योजना बदलली आणि लढाई सोडून देऊन पळ काढावयास सुरुवात केली. तेव्हा तिन्ही खान संताजींचा पाठलाग करू लागले. विक्रमहळ्ळी या ठिकाणी उभयपक्षी लढाई घडून आली...
● १९ नोव्हेंबर १६९३ चे मोगल दरबारचे बातमीपत्र म्हणते :
"हिंमतखान बहादूर, हमीदुद्दीनखान व ख्वाजाखान यांच्या कडून पुढीलप्रमाणे (बादशहासमोर) अर्ज आला, विक्रमहल्ली जवळ संताजीबरोबर युद्ध झाले. गोकुळ, अंजना वगैरे बेरड आणि संताजीबरोबरची तीनशे माणसे ठार झाली. तीनशे घोडी, निशाण, नगारे आमच्या हाती आले. आमची अनेक माणसे ठार किंवा जखमी झाली. मराठ्यांचा आम्ही पाठलाग केला. अर्ज वाचून बादशहा म्हणाले, 'मीठ खाल्ल्याचे सार्थक झाले. शाबास...! मोगलांच्या दुर्दैवाने आता या तिन्ही खानांत भांडण सुरू झाले. परिणामी संताजीचा पाठलाग करण्या ऐवजी हमीदुद्दीनखान व ख्वाजाखान गुलबर्ग्याकडे गेले. हिंमतखानाने मात्र संताजीचा पाठलाग चालूच ठेवला. यावेळी संताजींच्या फौजेत अमृतराव निंबाळकर हा मराठा सरदार होता. २१ नोव्हेंबर १६९३ चे मोगल दरबारचे बातमीपत्र म्हणते की, संताजींने अमृतरावकडे चार हजार स्वार देऊन वऱ्हाडकडे पाठविले आणि ते स्वतः सहा हजार स्वार घेऊन मालखेडला पोहोचले...
बादशहास जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्याने हमीदुद्दीन खान व ख्वाजाखान यांना वऱ्हाडात जाऊन अमृतरावाचा पाठलाग करावा, असा हुकूम केला आणि संताजींच्या पारिपत्यासाठी त्याने लष्करखान या सरदारास आपल्या बाजूने पाठविले. हिंमतखान हा संताजीच्या पाठलागावर होताच. त्यास मिळून साहाय्य करण्याचा हुकूम नांदेडचा सुभेदार अब्दुल्लाखान याजकडे धाडण्यात आला. संताजीविरुद्ध दाखविलेल्या हिंमतखानाच्या मर्दुमकीचे कौतुक म्हणून त्यास बादशहाने खिलतीची वस्त्रे आणि फर्मान पाठविले...
सरसेनापती संताजी उत्तर कर्नाटकातील प्रदेशातून ठिकठिकाणी चौथाई वसूल करीत होते. मालखेडला पोहोचल्यावर त्यांनी तेथील देशमुख-देशपांड्यांकडून सात हजार होन चौथाईची मागणी केली. पण ही चौथाई वसूल होण्यापूर्वीच हिंमतखान पाठलाग करीत तिथे पोहोचला. तेव्हा संताजींनी आपल्या फौजेसह प्रथम बेरडांच्या मुलखात व नंतर तिथून हैदराबादच्या दिशेने कूच केले. खान त्यांच्या पाठलागावर असणारच. तेव्हा संताजींनी त्यास हुलकावणी देऊन तो पुन्हा मालखेडच्या परिसरात आले. मालखेड जवळच्या अलूरच्या गढीत (मालखेडच्या नैऋत्येस १४ मैल) त्याने मुक्काम केला असता हिंमतखानाने त्यास गाठले आणि गढीस वेढा दिला...
● ३० नोव्हेंबर १६९३ चे बातमीपत्र म्हणते,
“हिंमतखान बहादूर याजकडून पुढील बातमी कळाली की, हिंमतखान व सय्यद अब्दुल्लाखान यांनी संताजींनी चित्तापूर जवळ अलूरच्या गढीत कोंडले असून किल्ल्याला वेढा घातला आहे. संताजींला आम्ही बाहेर पडू देणार नाही, अशा अर्थाचे मुचलके तिकडील जमीनदारांकडून घेण्यात आले आहेत.” मोगल सेनानींकडून वेढला जाऊन सहजासहजी सापडणाऱ्या सेनानींपैकी संताजी नव्हता. वेढा घालून बसलेल्या मोगलांच्या हातावर तुरी देऊन संताजी गढीतून सहजी निसटून गेला...
संताजींच्या वरील सर्व धावपळीच्या लढायांचा वृत्तांत मोगल दरबारच्या बातमीपत्रांवरच आधारित आहे. ही बातमीपत्रे एकांगी असण्याचीही शक्यता आहे. अनेक प्रसंगी संताजीच्या गनिमी युद्धाच्या पद्धतीमधील माघार हा त्याचा पराभव म्हणूनच मोगल बातमीदार नोंदवताना दिसतो. दुसरे असे की, संताजी जवळ यावेळी २०-२५ हजारांची फौज असावी. पण ती अनेक तुकड्यांत विभागली गेली असावी. म्हणूनच मोगलांच्या बातमीपत्रांत तो ५-६ हजार फौजेनिशी वावरताना दिसतो. एकाचवेळी २०-२५ हजार फौज रणांगणावर आणून शत्रूशी सरळ सामना करण्याची संताजीची रणनीती नव्हती. मोगली बातमीपत्रांतून आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसून येते, ती म्हणजे शत्रूच्या प्रदेशात चौथाई वसूल करून आपल्या फौजेचा खर्च वरच्यावर काढण्याच्या पद्धतीचा अवलंब आता सरसहा केला जात होता. संताजी, धनाजी अथवा अमृतराव यांच्या वऱ्हाड, गोवळकोंडा इत्यादी दूरच्या प्रदेशांतील मोहिमांना जिंजीतून छत्रपती राजाराम महाराजांनी अथवा पन्हाळ्याहून रामचंद्रपंताने पैसा पुरविणे ही गोष्ट अशक्य होती. अशा परिस्थितीत चौथाईची पद्धती म्हणजे मराठे लष्करास वरदान ठरल्यास नवल नव्हते...

No comments:
Post a Comment