विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 28 February 2019

नेताजी पालकरांचे पुढे काय झाले

नेताजी पालकरांचे पुढे काय झाले !
छत्रपती शिवरायांच्या कालखंडात घोडदलाचे प्रमुख म्हणून तुकोजी मराठा, माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पैकी प्रति शिवाजी म्हटले गेलेल्या नेताजींची कारकीर्द सर्वांत प्रदीर्घ असून शिवरायांनी नेमलेले स्वराज्याचे ते पहिले सरनोबत. शिवरायांच्या जीवनातील खडतर मोहिमा म्हणजे अफझलखान स्वारी, पन्हाळ्याचा वेढा, उंबरखिंडीतील कारतबलखान व रायबागनची केलेली फजिती, शाहिस्तेखानावरील छापा, सुरतेवरील पहिली स्वारी व पुरंदरचा तह या सर्वच मोहिमांत नेताजी पालकरांनी सेनापती म्हणून अद्वितीय अशीच कामगिरी केली आहे. उंबरखिंडीत गाठून फक्त दगडांचा वर्षाव करून त्याने मोगलांना शरण आणले होते तर शाहिस्तेखान पुण्यात ठाण मांडून बसलेला असताना नेताजींनी परंड्याच्या किल्ल्यावर आक्रमण करून मोगलांना गनिमी काव्याचा धडा दिला होता.
नेताजी पालकरांच्या मूळ गावाविषयी इतिहासकारांत एकवाक्यता नसली तरी काहींच्या मते कराडजवळील खंडोबाची पाली हे त्याचे मूळ गाव असून पालकर घराण्यातील विश्वासराव हे या परिसरातील पिढीजात देशमुख असून पुढे ते रत्नागिरी जिल्ह्यातील चौक या गावी राहण्यासाठी गेले. मात्र या दोन्ही ठिकाणी त्यांच्याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध होत नाही. परंतु याच वेळी काष्टी (तांदळी), ता. शिरूर, जि. पुणे या ठिकाणी मात्र नेताजी पालकरांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आढळून येतात. त्यानुसार काष्टी गावामध्ये ३२ गुंठ्यांवर नेताजींचा भव्य वाडा होता. पालकरांची काही घराणी गावामध्ये आहेत. त्यांचा नेताजीशी थेट संंबंध लागतोच, असे ठामपणे सांगता येत नाही.
शिवरायांच्या स्वराज्य उभारणीतील पहिल्या प्रत्येक संकटात नेताजींनी प्रचंड पराक्रम गाजविला. म्हणूनच शत्रूंनी त्यांना प्रति-शिवाजी ही पदवी दिली. प्रत्येक मोहिमेत उत्तुंग यश मिळवीत असताना शिवरायांना मिर्झाराजा जयसिंहाने पुरंदरच्या युद्धात हार स्वीकारायला भाग पाडले. साहजिकच छत्रपती शिवाजी महाराज नेताजी पालकरांसह मोगलांच्या बाजूने आदिलशहाविरोधात लढत असताना दोघांमध्ये काही तरी गैरसमज निर्माण होऊन नेताजी पालकर निजामाला जाऊन मिळाले. या वेळी विजापूरच्या आदिलशहाने त्यांना खमम परगण्यातील जमकोरची जहागिरी बहाल केली; परंतु मोगलांचे दक्षिणेतील सुभेदार मिर्झाराजांनी लगेचच नेताजीला आपल्याकडे वळवून ५ हजारांची मनसब आणि तामसा (ता. हदगाव, जि. नांदेड) या परगण्यातील ५५ गावांची जहागिरी दिली.
नेताजी पालकर मोगलांच्या सेवेत गेले त्याच वेळी शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून निसटले. त्यामुळे नेताजी पालकर पुन्हा एकदा शिवरायांना जाऊन मिळाले तर...! औरंगजेबाला याची धास्ती होती. नेताजीचा मुक्काम या वेळी धारूर (जि. बीड) येथील किल्ल्यात असताना भूम, जि. उस्मानाबाद गावात तळ देऊन असणा-या मिर्झाराजा जयसिंहाच्या आदेशावरून नेताजी पालकरला अटक करून दिल्लीला नेण्यात आले. १५ फेब्रुवारी १६६७ साली औरंगजेबाने त्याला जबरदस्ती मुस्लिम बनवून त्याचे नाव महम्मद कुलीखान ठेवले.
नेताजीला तीन बायका असून पैकी दोन त्याच्यासोबत राहिल्याने त्यांनाही धर्म बदलावा लागला. एक जण महाराष्ट्रातच राहिल्याने तिने आपला धर्म राखला. नेताजी आपल्या प्रांतात परत जाऊ नये म्हणून औरंगजेबाने नेताजीला काबूल-कंदहार प्रांतात स्वारीवर नेमले. दहा वर्षे तो मोगलांच्या सेवेत होता. ‘असे होते मोगल’ या ग्रंथाचा कर्ता व मोगलांच्या तोफखान्याचा प्रमुख जातीने इटालियन असणारा निकोलाव मनुचीने नेताजीवर लेखन करताना म्हटले आहे की, मी स्वतः नेताजीसोबत मोगलांच्या चाकरीत असून नेताजीने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पकडला जाऊन त्याला जबर शिक्षा करण्यात आली. पुढे नेताजीने औरंगजेबाचा विश्वास संपादन केला. या दहा वर्षांच्या कालखंडात स्वराज्यात अनेक घडामोडी घडल्या होत्या. ६ जून १६७४ ला शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला होता. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्याकरिता बादशहाने आपला सेनापती दिलेरखानाला मोठी फौज देऊन शिवरायांवर पाठविले तेव्हा मराठी मुलुखाचा माहीतगार म्हणून बादशहाने त्याच्यासोबत महम्मद कुलीखान म्हणजेच नेताजीला पाठविले.
दहा वर्षांनंतर नेताजीचे पाय स्वराज्याला लागले आणि त्यांच्या मनात आठवणींचे काहुर माजले. या वेळी त्यांचा मुक्काम गोवळकोंडा परिसरात होता. जिवाची पर्वा न करता नेताजी थेट स्वराज्याकडे निघाले. ते थेट रायगड गाठून शिवरायांसमोर उभा राहिले. पुरंदर तहात हरल्यामुळे नेताजीला आदिलशाही चाकरीत पाठविणे हा राजांचा कदाचित डाव असू शकतो. परंतु राजे आग््रयात अडकले तर नेताजी धर्मात अडकले. आता दोघांच्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या. दोघांना आधार देणा-या जिजाऊसाहेब जगात राहिल्या नव्हत्या.

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...