सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”...
"स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ८ दुंदुभीनाम संवत्सरे जेष्ठ शुद्ध सप्तमी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीराजा शंभूछत्रपती स्वामी याणी राजश्री जिजोजी काटकर मुद्राधारी सज्जनगड यांसी आज्ञा केली ऐसी जे श्री स्वामी याणी अवतार पूर्ण केला त्या अगोदरच आज्ञा केली होती की श्री देव मुचाफल या कडील कार्यभाग व राजगृहास जाणे येणे हे वेदमूर्ती दिवाकर गोसावी यांनी करावे श्री स्वामी कडील वीत विषय असेली त्याचा व्यय देवालयी चाफलास करावा. सज्जनगडी चितास्थानी श्री हनुमंताचे देवालय बांधावे. गड मजकुरी भानजी व रामाजी गोसावी आहेती व स्वामीकडील समुदाये ही उभयंताचा आहेतैसा असो द्यावा म्हणून श्री स्वामींची आज्ञा आहे ऐसा असता उधव गोसावी उगीच द्रव्यलोभात्सव भानजी व रामाजी गोसावी यांसी कटकट करितात. तुम्ही ही उधव गोसावी यांसी द्रव्य व पात्रे व वस्त्रे भानजी व रामाजीगोसावी याकडून श्री स्वामींची देवविली म्हणून कलो आले तरी तुम्हास ऐसे करावया प्रयोजन काये व उधव गोसावी यासी कटकट करावया गरज काये यासपरी जे । वस्ताभाव व द्रव्य उधव गोसावी याचे अधीन तुम्ही करविले असेल ते मागते भानुजी व रामाजी गोसावी यांचे आधीन करणे. उधव गोसावी यांसी कटकट करू न देणे...
२२ जानेवारी १६८२ रोजी रामदास स्वामींचा सज्जनगडावर मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सज्जनगडावर श्री हनुमानाचे मंदिर बांधले. रामदास स्वामींनी आपल्या पश्चात सर्व अधिकार दिवाकर गोसावी याला दिले होते, तरी उद्धव गोसावी द्रव्यलोभासाठी गडावरील कर्मचाऱ्यांशी भांडण करत होता. छत्रपती संभाजी महाराजांना हे कळताच त्यांनी "सज्जनगडाचा किल्लेदार जिजोजी काटकर" याला पत्र लिहून कडक सूचना दिल्या. जिजोजी काटकर याने गडावरील कर्मचाऱ्यांकडून वस्त्रे आणि पैसे घेऊन उद्धव गोसावी यास दिले होते. त्या बद्दलही संभाजी महाराजांनी त्याची कडक शब्दात हजेरी घेतली. जो व्यवहार करावयाचा तो केवळ दिवाकर गोसावी यांच्याशी करावा असा आदेश संभाजी महाराजांनी किल्लेदाराला या पत्रातून दिला. संभाजी महाराजांनी सज्जनगडावरील स्वामींच्या शिष्यवर्गात निर्माण झालेले तंटे सोडविण्यात पुढाकार घेतला..
या सर्व उदाहरणांवरून छत्रपती संभाजी महाराजांची गडकोट प्रशासन व व्यवस्थेवर किती उत्तम पकड होती याची आपणास कल्पना येते...
इतिहासाकार : वा.सी.बेंद्रे.
――――――――――――
.jpg)
No comments:
Post a Comment