विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 24 March 2019

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती भाग ६

छत्रपती शाहूमहाराजांचा दत्तकविधान समारंभ आणी कापशीकर सेनापती

भाग ६

पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या मानपत्रातील अनेक मुद्दे व त्यास पोलिटीकल एजंट यांनी दिलेले उत्तर हे आजच्या कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे ...

" शककर्ते थोरले शिवाजी महाराजांच्या राज्याचा हा एक लहानसा संस्थानचा भाग असला तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील वारसदार इथे राज्य करतात ही अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे ... तथापी कोल्हापूर संस्थानची प्रगती होणेसाठी नव्याने होत असलेल्या मिरज रेल्वेच्या स्टेशनमधुन एक रेल्वेचा फाटा कोल्हापूर संस्थानला जोडण्यासाठी प्रयत्न करणेत यावे... कोल्हापूरात विद्याभ्यासाची व्यवस्था चांगली आहे तेथेच महाराजांचा अभ्यास होईल " ...

त्यानंतर छत्रपती शाहूमहाराजांना पोशाख , नजराणे , सतके वगैरे देण्याचा समारंभ सुरु झाला ... त्यापैकी काही मान्यवरांचे आहेर व त्यांची तत्कालीन किंमत पुढीलप्रमाणे होती ....

श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे सर्जाराव यांनी ७५ रुपयांचा मंदिल , ८ रुपयांच्या जोट्या , २७ रुपयांच्या किनखाब , ५० रुपयांचे तिवट असा एकंदर १६० रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ७५ रुपयांचा मंदिल , ३ रुपयांच्या जोट्या , १२ रुपयांच्या किनखाब , ६० रुपयांचा दुपेटा असा एकंदर १५० रुपयांचा आहेर श्रीमंत जयसिंगराव घाटगे सर्जाराव यांना केला ...

श्रीमंत संताजीराव घोरपडे सेनापती कापशीकर यांनी ६ रुपयांच्या जोट्या , १० रुपयांच्या किनखाब , २० रुपयांचा दुपेटा आणी १५ रुपयांचा तिवट असा एकंदर ५१ रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ३ रुपयांच्या जोट्या , ९ रुपयांच्या किनखाब , २० रुपयांचा दुपेटा आणी १५ रुपयांचा तिवट असा एकंदर ४७ रुपयांचा आहेर श्रीमंत संताजीराव घोरपडे सेनापती कापशीकर यांना केला ...

श्रीमंत बळवंतराव घाटगे सर्जाराव यांनी १२५ रुपयांचा मंदिल , ४ रुपयांच्या जोट्या , १८ रुपयांच्या किनखाब , ६० रुपयांचा दुपेटा असा एकंदर २०७ रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात १०० रुपयांचा मंदिल , ३ रुपयांच्या जोट्या , ३७॥ रुपयांच्या किनखाब , ६० रुपयांचा दुपेटा असा एकंदर २००॥ रुपयांचा आहेर श्रीमंत बळवंतराव घाटगे सर्जाराव यांना केला ...

श्रीमंत नारायणराव घोरपडे इचलकरंजीकर यांनी ३ रुपयांच्या जोट्या , २१ रुपयांच्या किनखाब , ६० रुपयांचा दुपेटा आणी १८ रुपयांचा तिवट असा एकंदर १०२ रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ३ रुपयांच्या जोट्या , ३७॥ रुपयांच्या किनखाब , ४० रुपयांचा दुपेटा आणी १८ रुपयांचा तिवट असा एकंदर ९८॥ रुपयांचा आहेर श्रीमंत नारायणराव घोरपडे इचलकरंजीकर यांना केला ...

श्रीमंत निपाणीकर सरकार यांनी ५ रुपयांच्या जोट्या , २४ रुपयांच्या किनखाब , १५ रुपयांचा दुपेटा आणी १६ रुपयांचा तिवट असा एकंदर ६० रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ५ रुपयांचा दुपेटा आणी १८ रुपयांचा तिवट असा एकंदर २३ रुपयांचा आहेर श्रीमंत निपाणीकर सरकार यांना केला ...

श्री अब्दुल सुलतान देसाई आलाबाद यांनी ७ रुपयांच्या जोट्या , ५।. रुपयांच्या किनखाब , ८ रुपयांचा दुपेटा आणी १५ रुपयांचा तिवट असा एकंदर ३५।. रुपयांचा आहेर छत्रपतींना केला ... आणी छत्रपतींनी परतीच्या आहेरात ८ रुपयांचा दुपेटा आणी २० रुपयांचा तिवट असा एकंदर २८ रुपयांचा आहेर श्री अब्दुल सुलतान देसाई आलाबाद यांना केला ...

असे अनेक आहेर व परतीचे आहेर छत्रपती शाहूमहाराजांच्या दत्तकविधान समारंभात देवाणघेवाण झाले ....

त्यानंतर रेसिडेन्सी दरबार सुरु झाला ... तिथे एका बाजुला मांडलेल्या खुर्च्यांच्या पहिल्या रांगेत दक्षिण महाराष्ट्रातील व सातारा संस्थानातील जहागीरदार व त्यामागच्या खुर्च्यांच्या रांगेत त्यांचे कारभारी , ट्युटर व कारकून यांच्या जागा होत्या ... दुसऱ्या बाजुला मांडलेल्या खुर्च्यांच्या पहिल्या रांगेत सेनापती कापशीकर यांच्यासारखे कोल्हापूर इलाख्यातील जहागीरदार आणी त्यामागच्या रांगेत त्यांचे कारभारी वगैरे लवाजमा बसला ... कोल्हापूर इलाख्यातील जहागीरदार वगैरेंच्या स्वागतासाठीं असिस्टंट पोलिटीकल एजंट आणी कोल्हापूर इंन्फंट्रीचे सेकंड इन कमांड रावबहाद्दर केंट्स साहेब हे स्वतः उभे होते ....

यावेळी पोलिटीकल एजंट साहेबांनी केलेल्या भाषणातील मुद्दे हे कोल्हापूर इलाख्यातील सुधारणेसाठी पायाभरणी होती ... छत्रपती शाहूमहाराजांच्या दत्तकविधान प्रित्यर्थ इंग्रज सरकारने कोल्हापूरला मिरजेतून रेल्वेचा स्वतंत्र फाटा , साखर कारखाना आणी दगडी कोळशावर आधारित उद्योगांच्या मंजूरीची घोषणा केली ... त्यामुळे आजचे छत्रपती शाहूमहाराज टर्मिनन्स म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर रेल्वे स्टेशन , छत्रपती राजाराम शुगरमिल म्हणून ओळखला जाणारा साखर कारखाना आणी रेल्वेच्या उड्डानपुलाखाली वसलेली लोणार वसाहत ( लोणार कोळसा ) या तिन्ही सुधारणा या इंग्रज सरकारने छत्रपती शाहूमहाराजांच्या दत्तकविधान कार्यक्रमात घोषित केलेल्या व वेळेत पुर्ण केलेल्या होत्या हे विषेश ...

त्यानंतर सत्कार , जाफती , आतशबाजी , मेजवानी , गायन समाजाच्या गाण्यांचा कार्यक्रम वगैरे होऊन दत्तकविधान समारंभ संपन्न झाला ...

कापशीकर सरकारांना कोल्हापूर संस्थानच्या राजकीय व छत्रपती राजघराण्यांच्या वैयक्तिक मसलती व समारंभात अनन्यसाधारण सन्मानाचे स्थान होते व आजही आहे ...

समाप्त

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...