विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 30 March 2019

सरखेल आंग्रे

सरखेल आंग्रे
मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध नाविक योद्धा. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे त्यांचे मूळ गाव व संकपाळ हे मूळ आडनाव. काळोसेतील आंगरवाडी या भागामुळे त्यांस आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. कान्होजींचे वडील तुकोजी ह्यांना शिवाजीच्या आरमारात २५ असामींची सरदारी होती असे म्हणतात. औरंगजेब मराठ्यांना जिंकण्यासाठी १६८१च्या शेवटी महाराष्ट्रात आला. त्या वेळी कान्होजींच्या कोकणपट्टीतील कार्यास सुरुवात झाली. १६९४ पासून ९८ पर्यंत त्यांनी कोकणपट्टीतले मोगलांनी व इतरांनी काबीज केलेले मराठ्यांचे बहुतेक सर्व किल्ले परत घेतले. छत्रपती राजारामांनी त्यांची ही कामगिरी पाहून त्यांस ‘सरखेल’ हा किताब दिला. १६९६ मध्ये त्यांनी कुलाबा जिंकून ते आपले मुख्य ठाणे केले. पुढे राजारामांनी त्यांस मराठी आरमाराचा मुख्याधिकारी केले. राजारामांच्या मृत्यूनंतर (१७००) थोड्याच वर्षांत शाहूंची सुटका होऊन १७०७ मध्ये ते छत्रपतींच्या गादीवर आले. त्या वेळी राजारामांची पत्‍नी ताराबाई व पुतणे शाहू ह्यांत गादीबद्दल तंटा सुरू झाला. कान्होजींनी ताराबाईंचा पक्ष घेऊन १७०७ ते १०च्या दरम्यान अनेक विजय मिळविले. ताराबाईंनी सावंतवाडी ते मुंबईपर्यंतच्या किनाऱ्याच्या संरक्षणार्थ मराठी आरमाराचे प्रमुख म्हणून त्यांस नेमले आणि इंग्रजांच्या मदतीने शाहूंनी कोणतीही हालचाल करू नये, या हेतूने राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास कान्होजींना सांगितले. १७१३त शाहूंनी कान्होजींविरुद्ध बहिरोपंत पिंगळे ह्यांस धाडले. कान्होजींनी त्यांचा पराभव करून त्यांस कैद केले. त्यामुळे शाहूंनी बाळाजी विश्वनाथ या पेशव्यास कान्होजींवर धाडले. बाळाजीने कान्होजींबरोबर सलोखा करून तह केला. त्यात कान्होजींस १० जंजिरे व १६ किल्ले मिळाले व त्यांनी शाहूचे अंकित बनून सालिना १२,००० रु. त्यास देण्याचे ठरले. त्याशिवाय त्यांची सरखेली त्यांजकडे कायम करण्यात आली व सर्व आरमाराचे आधिपत्य त्यांस दिले. अशा प्रकारे ते शाहूंच्या पक्षात सामील झाले व अखेरपर्यंत त्यातच निष्ठेने राहिले.

कान्होजींची सत्ता कोकण किनाऱ्यावर कोट मांडवेपासून त्रावणकोरपर्यंत पसरली. ही गोष्ट तत्कालीन इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज व डच ह्या परकीयांस आणि जंजिऱ्याच्या सिद्दीस बोचत होती. इंग्रज, डच, पोर्तुगीज व फ्रेंच ह्यांनी कधी स्वतंत्रपणे, तर कधी संयुक्त रीत्या त्यांवर चढाई केली. पण प्रत्येक वेळी त्या सर्वांचा पराभव झाला. आंग्र्यांच्या अंमलाखालील सागरी प्रदेशांतून ये-जा करणाऱ्यास दस्तक (परवाना) घ्यावयास भाग पाडून समुद्रावर त्यांनी आपले निरपवाद स्वामित्व प्रस्थापिले आणि सिद्दीस वारंवार माघार घेण्यास भाग पाडले. कुलाबा व विजयदुर्ग येथे जहाजे बांधण्यासाठी त्यांनी गोद्या बनविल्या. त्यांची जहाजे कच्छपासून त्रावणकोरपर्यंत सागरात निर्वेधपणे संचार करीत.

कान्होजी सुद्दढ व प्रेमळ होते. तथापि त्यांचे हुकूम सक्तीचे व शिक्षा कडक असे. त्यांना मथुराबाई, लक्ष्मीबाई व गहिनाबाई या तीन धर्मपत्‍नी होत्या. त्यांना सहा मुलगे झाले. असा हा सागरी अनभिषिक्त राजा अलिबाग येथे मरण पावला. त्यांच्या मरणानंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू होऊन पुढे आंग्रे घराण्याची वाताहत झाली.

संदर्भ : ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल, मुंबई, १९३९.

आपटे, भा. कृ.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...