विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 25 April 2019

संताजी "घोरपडे" ... संताजी "जाधव" नाते संबंधांची अजब वीण

संताजी "घोरपडे" ... संताजी "जाधव" नाते संबंधांची अजब वीण
इतिहास अभ्यासताना एका मातबर घराण्याचा दुसऱ्या मातबर घराण्याशी असलेले नाते संबंध बऱ्याच वेळा निष्ठा आणि नाते जपण्याच्या वृत्तीचे दर्शन घडवून जाते. छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत महान पराक्रम करणारे आणि मुघलांना त्राही भगवान करून सोडणारे संताजी धनाजी यांच्या घराण्यांचा पूर्वेतिहास असाच रंजक आहे.
भोसले आणि घोरपडे एकाच सिसोदिया वंशाचे हे आपल्याला माहीत आहे. या घराण्यातील उग्रसेन नावाच्या व्यक्ती पासून ही दोन घराणी उपजली. उग्रसेनाचा थोरला पुत्र कर्णसिंह या पासून घोरपड्यांची थोरली पाती तर धाकटा पुत्र शुभकृष्ण (शुभकर्ण ? ) या पासून भोसल्यांनी धाकटी पाती सुरू झाली. थोडक्यात ही दोन्ही घराणी चुलत घराणी होती. कर्णसिंहा पासून नवव्या पिढीत बाजी घोरपडे तर शुभकृष्णा पासून दहाव्या पिढीत शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुढील काळात राजकीय आणि वैयक्तिक वैरात बाजी शिवाजी महाराजांकडून मारला गेला. तर बाजीचाच चुलतभाऊ म्हाळोजींची दोन मुले संताजी आणि बहिरजी यांचा उल्लेख शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयात सामील असल्याचा सापडतो. राजाराम महाराजांच्या काळात संताजींना सेनापतीपद मिळाले तर पुढील काळात काही वादांमुळे सेनापतीपद धनाजी जाधवांकडे गेले. म्हणजे संताजी घोरपड्यांचे घराणे शिवरायांचे चुलत घराणे होते. .
आता धनाजी जाधवांच्या पूर्वपिठीकेकडे वळू. या जाधव वंशाचे मूळ सिंदखेडकर जाधवरावांच्या म्हणजे जिजाबाईंच्या घराण्यातच आहे. जिजाबाईंच्या वडिलांच्या म्हणजेच लखुजींच्या हत्येच्या वेळी त्यांचे भाऊ अचलोजी यांचीही हत्या झाली होती. जाधवराव घराण्यावर कोसळलेल्या या संकटामूळे लखुजींचे धाकटे भाऊ जगदेवराव मुघलांना मिळाले तर अचलोजींच्या अल्पवयीन मुलाचे संताजीचे संगोपन जिजाबाईंनी केले. हे संताजी संभाजी राजांचे (शिवरायांचे जेष्ठ बंधू) समवयस्क होते आणि त्यांच्याच बरोबर कनकगिरीच्या वेढ्यात मारले गेले. या संताजींचा मुलगा शंभुसिंह जाधव शिवाजी महाराजांचे समवयस्क होते. त्यांचा सुपुत्र धनाजी प्रतापराव गुजरांच्या हाताखाली तयार झाला आणि पुढील इतिहास घडवला. म्हणजे धनाजी जाधवांचे घराणे शिवरायांचे मातुल घराणे होते.
थोडक्यात रक्ताच्या नात्याने जोडलेल्या या घराण्यांच्या नात्यांची गुंतागुंत काहीशी विस्मयात टाकते खरी पण नात्यांच्या याच ताकदीने स्वराज्याचा गोफ घट्ट विणला होता असेच म्हणावे लागेल. संताजींना "ममल्कतमदार जफ्तनमुल्क" हा किताब होता तर धनाजींना "जयसिंहराव" किताब होता. यातूनच त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येते. या कर्तृत्वाचा, रक्ताच्या नात्यांचा आणि निष्ठेचा अपूर्व संगम क्वचितच बघायला मिळतो. मुघलांचे रक्तरंजित नाते संबंध लक्षात घेता मराठे या ही बाबतीत उजवे ठरतात हे मान्य करण्या शिवाय पर्याय नाही.
संदर्भ :- मराठी रियासत खंड २
भित्तिचित्र सौजन्य :- श्री अमित राणे
©विद्याचरण भालचंद्र पुरंदरे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...