विनोद जाधव एक संग्राहक

Monday 22 April 2019

राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर

राणोजी शिंदे व मल्हारराव होळकर यांना जरब दाखविण्याकरिता दिल्ली येथील दुसर्या सैन्याचे नेतृत्व घेऊन मीरबक्षी खानडौरान दिल्लीतुन बाहेर पडला. मराठ्यांनी साबर घेतले व ते आजमिराजवळ आहेत असे समजल्यावर खानडौरानने सवाई जयसिंग, मारवाडचा अभयसिंग , महाराव कोटेवाला वगैरे राजांना सामील करून घेतले. दोन लाख स्वार व तोफखाना अशी प्रचंड मोगल सेना जमा झाली. मुकुदरा उतरून रामपुरा प्रांतात मराठ्यांच्या रोखाने मोगलांचे कुच झाले. इकडून राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर जाऊन त्यांनी युद्धास सुरुवात केली. मोगलास चारी बाजुने वेढा देऊन बुडवावे हा मराठ्याचा पहिला बेत त्या प्रमाणे आठ.दिवस लष्कराच्या चारी बाजुंनी काडी दाणा पाणी घास बंद केला. मोगलांची उंट, घोडे धरुन आणली. खानडौरान मोगल साम्राज्याचा मीरबक्षी. त्याच्या निशाणाखाली रजपूत रजवाड्याच्या फौजा जमा झालेल्या. अशा प्रचंड सैन्याशी मुकाबला करण्यापेक्षा जयपूर, बुंदी, कोटा येथील तुकड्या आघाडीवर गेल्यामुळे या उघड्या पडलेल्या प्रदेशात आपल्याला अडथळा होणार नाही हे शिंदे होळकर यांच्या ध्यानात येऊन त्यांनी वेढा उठवला. शत्रूला कळू न देता गनिमीकावा करून मराठे मुकुददरा उतरले. बुंदी कोट्यावरुन त्यांनी जयसिंगाचा मुलुख गाठला व तेथे लुटालूट करून मराठे निसटून पुढे गेले. आपल्या पिछाडीवरील मुलखाचा मराठ्यांनी नाश सुरू केला आहे ही बातमी येताच मीरबक्षी च्या हाताखालील सैन्याचा धीर सुटला. आपल्या मुलखाचा बंदोबस्त करण्यासाठी जयसिंग जयनगरकडे वळला. तोच मार्ग इतरांना करावा लागला. जयसिंग यांच्या मध्यस्थीने मीरबक्षी खानडौरान होळकर शिंदे यांची भेट होऊन तह ठरला. मराठ्यांची ब्याद टळावी या अपेक्षेने माळव्याच्या चौथाई दाखल दरसाल 22 लाख देण्याचे खानडौरानने कबूल केले. शिंदे होळकर- खानडौरान यांच्यात हा तह झाला ती तारीख होती - 22 मार्च 1735.
#khub_ladhe_marhatte
#sardar
#maratha_empire
#maratha_riyasat

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...