विनोद जाधव एक संग्राहक

Friday 19 April 2019

☀ दिंडोरी युद्ध आढावा…☀

दिंडोरी युद्ध आढावा…
शिवाजी राजेंच्या सुरतेवरील छाप्यामुळे मुअज्जम जागा झाला. त्याने लगेच दाऊदखान कुरेशीला शिवाजी महाराज राजगडावर पोहोचायच्या आधी त्याला अडविण्याचा आदेश दिला. दाऊदखान बऱ्हाणपुरहून निघाला व १६ ऑक्टोबर १६७० ला रात्री नऊ च्या सुमारास चांदवडला पोहोचला. तिथे त्याला पक्की बातमी मिळाली की शिवाजी महाराज चांदवडची रांग कंचना - मंचना घळीतून पार करणार आहेत.
शिवाजी महाराजांनी रात्री छावणी न टाकता अंधारातच चांदवड रांग ओलांडून नाशिककडे कूच केले. दाऊदखानला ही बातमी मध्यरात्रीनंतर कळली. तो लगेच तिथून निघाला व चादवडपासून साधारण १६ किमीवर असलेल्या कंचना घळीत पोहोचला. शिवाजीराजेंना दाऊदखानच्या हलचालींबद्दल सगळी माहिती मिळत होती. त्याने पाच हजार स्वारांनिशी सगळी लूट पुढे पाठवली. उरलेल्या दहा हजार लोकांनिशी तो वणी दिंडोरी जवळ मुघलांची वाट बघत होता. दाऊदखानने इखलासखानला पुढे पाठवल्यामुळे त्या दोघांत अंतर निर्माण झाले. पहाटेच्या सुमारास इखलासखान एका टेकाडावर पोहोचला व त्याला समोर युद्धासाठी तयार असलेले मराठ्यांचे सैन्य दिसले. दाऊदखानसाठी न थांबता त्याने मराठ्यांवर हल्ला केला..
जोरदार हल्ले व प्रतिहल्ले सुरु झाले व थोड्याच वेळात मुघलांची फळी मागे हटू लागली. इखलासखान घायाळ होऊन घोड्यावरुन खाली पडला. तोवर दाऊदखान तिथे पोहोचला व त्याने मुघलांची मोडलेली फळी सावरली. संग्रामखान घोरी नावाचा आणखी एक सरदार घायाळ झाला. दाऊद खानने त्या रणधुमाळीत घुसून इखलास खानला वाचविले पण तोवर मुघल सैन्याची वाताहात झाली होती. मराठ्यांनी जोरदार प्रत्याक्रमण करत मुघलांना टेकाडावरुन खाली ढकलून दिले. तीन हजार मुघल सैनिक मारले गेले. मुघल तोफखान्याचा मुख्य अब्दुल मबूदचा इतरांशी संपर्क तुटला. त्याची दोन मुले मारली गेली. दाऊदखानला माघारी शिवाय पर्याय उरला नाही. तो नाशिकला गेला व एक महिनाभर तिथेच होता. त्यानंतर तो अहमदनगरला गेला. ह्या युद्धात शिवाजी महाराजांनी स्वतः मराठ्यांचे नेतृत्व केले.. मराठे व मुघलांमधील समोरासमोरच्या क्वचितच होणाऱ्या लढायांपैकी ही एक होती.…
महापराक्रमी महाराजाधिराज छत्रपती शिवाजी
महाराजांचा विजय असो !!

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...