विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 18 April 2019

आबाजी सोनदेव


आबाजी सोनदेव -
दादाजी कोंडदेवाप्रमाणें शहाजी राज्यांच्या पदरीं असलेल्या सोनोपंत डबीराचा हा मुलगा. हा दादोजी कोंडदेवाच्या तालमीत तयार झालेला होता. याचा भाऊ निळो सोनदेव याला १६४७ त शिवरायांनी आमात्य केलें. इ. स. १६४८ त आबाजींनें कल्याणवर अचानक हल्ला करून तेथील मुल्ला अहमद नांवाच्या सुभेदारास कैद केलें, व कल्याण आणि कल्याणच्या आसपासचे सर्व किल्ले हस्तक करून घेतले. तेव्हां शिवरायांनी खूष होऊन याची फार प्रशंसा केली व त्यास त्यानें जिंकलेल्या मुलुखाचा सुभेदार नेमिलें. मुल्ला अहमदास पकडल्यावेळी आबाजीनें त्याची सुंदर सूनहि हस्तगत केली होती. पण शिवरायांनी तिला सन्मानपूर्वक परत पाठविलें.
रायरी ( रायगड ) ला राजधानीचें स्वरूप आणण्याकरितां सरकारी कामकाजासाठी अवश्य त्या इमारती वगैरे बांधण्याचें काम इ. स. १६६२ त याच्याच देखरेखीखालीं सुरू होऊन १६६४ मध्यें तें संपविण्यांत आलें.
इ. स. १६६६ त ज्या तीन गृहस्थाकडे राज्याचा कुलअखत्यार देऊन शिवाजी अवरंगजेबाच्या दरबारी दिल्लीस गेला त्यांत आबाजी सोनदेव होता. १६७० त मोरोपंत पिंगळे याजबरोबर आबाजी माहुली किल्ला व कल्याण प्रांत सर करून आला. राजारामानें १६९२ मध्यें आबाजीस रायगड घेण्यास पाठविल्याचा उल्लेख रा. खं. त सांपडतो ( ८.४३ )
आबाजीस माधवराव व मेघ:श्यामराव हे दोन मुलगे होते. माधवरावाचा वंश भोरास व मेघ:श्यामरावाचा कोल्हापुरास आहे. आबाजीच्या वंशजाकडे हल्लीं मोठी जहागीर नाहीं. पुष्कळशी इनामी वावडेकराकडे गेली आहे. [ डफचा मराठ्यांचा इतिहास. मराठी रिसायत. किंकेडपारसनिसकृत मराठयांचा इतिहास. केळूसकर-छत्रपति शिवाजी महाराज. सभासद विरचित शिव-छत्रपतीचें चरित्र, राजवाडे खंड ८ वा. बावडेकर घराण्याचा इतिहास महाराष्ट्र-मंडळाची बखर ]

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...