विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 18 April 2019

अमात्य

अमात्य
हा अष्ट प्रधानांतील एक अधिकारी. याचा हुद्दा पंत प्रधानाच्या खालोखाल असून शिवरायांच्या वेळेला यास बारा हजार होन वार्षिक वेतन होतें. आरंभीं या अधिकार्‍यास मुजमुदार हें फारशी नांव होतें. पण शिवरायांनी पुढें तें बदलून त्यास पंत अमात्य हें संस्कृत नांव दिलें . अमात्य या संस्कृत शब्दाचा वस्तुत: अमा म्हणजे राजाच्या सन्निध रहातो तो एवढाच आहे. अमात्य यांनीं सर्व राज्यांतील जमाखर्चावर देखरेख ठेवावी, राज्यांतील दफ्तरदार व फडणीस त्यांच्याच स्वाधीन राहतील, खालून जे हिशोब येतील ते त्यांनीं तपासून पहात जावे, फडनिसी व चिटनिसी पत्रांवर त्यांनीं आपलें निशाण करावें व युद्धप्रसंग करून प्रांत स्वाधीन होईल त्याचें रक्षण करावें, अशी शिवाजीनें आपल्या जाबत्यांत अमात्याचीं कामें सांगितलीं आहेत आरंभीं बाळकृष्णपंत हणमंते हा शहाजीचा कारकून शिवरायांच्या अमात्य म्हणून होता. इ. स. १६४७ च्या सुमारास तें काम शिवरायांनी सोनोपंत डबीर याचा पुत्र निळो सोनदेव यास सांगितलें. शिवरायांनी राज्याची हिशोबी पद्धत निळोपंताच्या हातची आहे. १६७२ त निळो सोनदेव मरण पावल्यावर तें काम त्याचा पुत्र नारोपंत याजकडे आलें. पण नारोपंत हा स्वत: साधुवृत्तीचा असल्यामुळें कच्चें काम त्याचा भाऊ रामचंद्रपंतच पहात असे. छत्रपती संभाजीच्या कारकीर्दींत रामचंद्रपंत हाच अमात्यपदावर होता. राजारामाच्या वेळीं जिंजीस घालमेली झाल्या त्यांत रामचंद्रपंतास ‘हुकमत पुन्हा’ हा हुद्दा मिळून अमात्यपद जनार्दन रघुनाथ हणमंते यांजकडे आलें. पुढें रामचंद्रपंत कोल्हापुराकडे कायमचा राहिल्यामुळें शाहूनें अमात्याची जागा अंबूराव नामक स्वत:च्या उपयोगी पडलेल्या एका हणमंते घराण्यांतील इसमास दिली. तथापि अमात्याचें काम वस्तुत: बाळाजी विश्वनाथ हाच पहात होता. पेशव्यांच्या अमदानींत अष्टप्रधानांचें महत्त्व कमी होऊन अमात्याचें पद केवळ नामधारी होऊन बसलें.
[ मराठी रिसायत; इतिहास आणि ऐतिहासिक; राजवाडे खंड ८; बावडेकर घराण्याचा इतिहास. ]

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...