विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 27 June 2019

#छत्रपती_संभाजी_महाराजांचे_अद्भुत_राजकारण_आणि_फसलेला_औरंगजेबपुत्र_अकबर.

#छत्रपती_संभाजी_महाराजांचे_अद्भुत_राजकारण_आणि_फसलेला_औरंगजेबपुत्र_अकबर.

औरंगजेबाला चार बायका आणि त्यांच्या पासून झालेली दहा अपत्ये होती.
औरंगजेबाची पहिली बायको दिलरस बानु च्या पोटी ह्या अकबराचा जन्म सन ११ सप्टेंबर १६५७ रोजी औरंगाबाद येथे झाला.

हा शाहजादा अकबर महत्वाचा का? तर ह्याने खुद्द आपल्या बापाविरोधात म्हणजे औरंगजेबाविरोधातच मराठे आणि राजपुतांच्या मदतीने बंड करण्याचा प्रयत्न केला.

ह्या अकबराची आई दिलरस बानु हि अकबर केवळ दोनच महिन्यांचा असताना वारली. त्यामुळे हे पोर बापाच्या विशेष प्रेमात वाढले. ह्या वेळी औरंगजेब हा आपल्या भावांना ठार मारून दिल्लीच्या गादीवर बसला होता. 

औरंगजेबाने ह्या अकबराला इतर भाऊ बहिणींप्रमाणे लहानपणापासूनच राजकारणाचे शिक्षण दिलेले होते.

१६७८ साली घडलेल्या एका राजकीय घटनेमुळे ह्या अकबराचे आपला बाप औरंगजेबाबरोबर भांडण झाले. आणि इथून पुढे ह्या बाप बेट्यांतील संबंध हे कायमचे दुरावातच गेले. १० डिसेंबर १६७८ रोजी महाराजा जसवंतसिंगचा मृत्यू झाला. औरंगजेबाने महाराजा जसवंतसिंगाचे 'जोधपूर' खालसा करण्याचा घाट घातला. पण जसवंतसिंगाच्या राण्या आणि कारभाऱ्यांना हि गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे राजपुतांनी औरंगजेबाविरोधात बंड केले.

हे राजपुतांचे बंड मोडून काढण्यासाठी आता औरंगजेबाने आपली तीन मुलं शहाआलम, आझमशाह आणि अकबर ह्यांना पाठविले.

४ मार्च १६८० रोजी अकबराला चितोडची बाजू सांभाळण्यासाठी पाठविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अकबराचा सारखा पराभवाचं होत होता. अकबराने राजपुतांविरोधात लढण्यात पाच महिने असेच फुकट घालविले.राजपुतांपुढे आता काही आपला निभाव लागत नाही असे पाहून अकबराने आपल्या बापास औरंगजेबास हे युद्ध बंद करण्याची विनंती केली.
ह्या विनंतीने औरंगजेब भयंकर चिडला. आणि त्याने रागाने अकबराची चांगलीच कानउघडणी केले.

अकबरालाही बापाचा भंयकर राग आला. आता अकबराने चिडून जाऊन गूपचुप रजपुतांशीच बोलणी सुरु केली आणि दुर्गादास राठोड आणि राजा रामसिंग ह्यांच्या सल्यानुसार औरंगजेबाविरोधात बंड पुकारले. (हा राजा रामसिंग आठवला का? हाच तो मिर्झाराजा जयसिंगाचा मुलगा. शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीवेळी महाराजांची देखरेख करणारा हाच तो.)

सिसोदिया आणि राठोड ह्यांच्या मदतीने आता ह्या अकबराने औरंगजेबाच्या विरोधात जाऊन अजमेर येथे स्वतःस बादशहाच घोषित केले आणी लगेच स्वतःची नाणीही पडली.

"आपल्या आयुष्यात आपण सत्तेसाठी जशी आपल्या भावांची हत्या केले तसेच आता सत्तेसाठी आपली मुलंच आपली हत्या करतील" असे औरंगजेबास वाटू लागले.

औरंगजेबाने आपला मुलगा असलेल्या अकबरास पत्र पाठवून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण ह्या अकबराने आता अजमेर येथे मोठी फौज गोळा केली. ह्याच वेळी मात्र औरंगजेबाजवळ कमी फौज होती. वस्तुतः जर अकबराने औरंगजेबावर लगेचच हल्ला केला असता तर ह्यात औरंगजेबाचा पराभव झाला असता. पण अकबर फौज गोळा करून नुसताच स्वस्थ बसून राहिला.

आता औरंगजेबाने त्याच आवडत शस्त्र बाहेर काढले ते शस्त्र म्हणजे "कपटनिती."

आणि ह्या शस्राने कारगर काम केले. औरंगजेबाने 'कपटनितीने' सगळे राजपूत सरदार अकबरापासून तोडले आणि स्वतःस जोडले. राजपूत सोडून जाताच अकबराने अजमेरवरुन जीव वाचून पळ काढला. आता अकबराची रानोमाळ भटकण्याची वेळ आली होती.

राजपुतांचे साहाय्य एकदम नाहीसे होताच अकबर भांबवलाच. काय करावे हेच त्याला सुचेना. प्रथम मारवाडला जाऊन तिथून इराणला पळून जायचा अकबराने विचार केला. अकबराची ही पळापळ पाहून औरंगजेबाने सर्व प्रांतांच्या सुभेदारांना ह्या अकबराच्या वाटा अडविण्याचा हुकूम जारी केला.
अश्या प्रकारे सर्व मार्ग बंद झाल्यावर अकबराने आता दक्षिणेत मराठ्यांचा राजा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांकडे जायचे ठरविले.

अकबरास मराठयांवाचून दुसऱ्या कोणाकडूनही आश्रय मिळण्याची शक्यता नव्हती. संभाजी महाराजांचा राज-आश्रय मिळविण्यासाठी त्याला प्रथम संभाजी महाराजांकडून मान्यता हवी होती.

अकबर आणि दुर्गादास राठोड ह्यांनी ९ मे १६८१ ला 'महेश्वर' येथे नर्मदा नदी ओलांडली.

अकबराच्या ह्या पळापळीचे एक पत्र 'महेश्वर' येथून त्याने संभाजी महाराजांना लिहिले. हे पत्र ९ मे १६८१ च आहे. त्या पत्रात तो संभाजी महाराजांना म्हणतो, " औरंगजेबाबरोबर युद्ध करायची मला वेळच आली नाही. माझ्या कुटुंबाबरोबर मी मारवाडांत गेलो. तिथं दुसऱ्या दिवशी रात्री मला दुर्गादास राठोड त्याच्या सैन्यासहित येऊन मिळाला. मारवाडात दोन तीन वेळा मला भटकावं लागलं. माझ्या पाठलागावर शहजादा मुअज्जमची नेमणूक केलेली होती. पण त्याला काही मी सापडलो नाही, म्हणून त्याने मारवाडांत मला पकडण्यासाठी आपले सैन्य विखरून ठाणी उभी केली.

पळापळीला वैतागून मी राजा जयसिंगाच्या मुलखात गेलो. जयसिंगाचा 
मुलगा राजा रामसिंगाने मला घोडे आणि इतर जिन्नस दिले आणि आपल्याच मुलखात राहायची विनंती केले. पण त्याचा मुलुख हा दिल्लीपासून जवळ असल्याने मला तिथं राहणे सोयीचे वाटले नाही. मी नर्मदा नदी सुखरूप पार केली आहे. दुर्गादास राठोड माझ्याबरोबर आहे.

माझ्याबद्दल तुम्ही नि:शंक राहावे. अल्लाच्या कृपेने मला राज्य मिळाले तर नाव माझे आणि राज्य तुमचे राहील. औरंगजेब हा माझ्याबरोरच तुमचाही शत्रू आहे हे ध्यानात घ्यावे. आपण दोघांनी मिळून आपले उद्दिष्ट्य साध्य केले पाहिजे. शहाण्या माणसांस विशेष सांगण्याची गरज नाही. इशारा पुरे."

९ मे १६८१ ला नर्मदा नदी ओलांडताना अकबराने पाठविलेले हे पत्र रायगडास संभाजी महाराजांना मिळाले. पण संभाजी महाराजांनी ह्या पत्राला हेतुपूर्वक काहीही उत्तर दिले नाही.

'औरंगजेबासारख्या कपटी शत्रूच्या मुलाकडून पहिल्यांदाच आपल्याला असे पत्र आल्याने संभाजी महाराजांनी मनात शंका धरली कि 'ह्यात औरंगजेबाचेच काहीतरी कुटील राजकारण असेल.'

इकडं मात्र हा अकबर संभाजी महाराजांच्या आश्रयास येणास अधीर झाला होता.

पहिल्या पत्राचे उत्तर आले नाही तोच अकबराने आता परत २० मे १६८१ ला दुसरे पत्र संभाजी महाराजांस पाठविले. त्यात तो संभाजी महाराजांना म्हणतो, " हिंदुस्थानातील ह्या राजश्रेष्ठाने (म्हणजे संभाजी महाराजांनी) मीं पत्रात लिहिल्याप्रमाणे वागावे. म्हणजे जगात तुमचा लौकिक वाढेल. या पूर्वी मी तुम्हास एक पत्र पाठविले होते. बहुदा तुम्हास ते मिळाले नसेल. नाहीतर तुम्ही त्याचे उत्तर पाठविलेच असते.

मी तुमच्याकडे निघालोच आहे. त्यामुळे तुम्ही आता पत्र लवकर पाठवावे, उशीर करू नये. ह्या एकनिष्ठ राजाची (म्हणजे संभाजी महाराजांची) वार्ता ऐकण्यासाठी मला दीर्घ काळापासून उत्कंठा लागलेली आहे. तुम्हाला भेटण्यासाठी मी अत्यंत आतुर झालो आहे."

संभाजी महाराजांच्या पत्राची वाट न पाहता अकबराने आपला दक्षिणेतील मराठ्यांच्या राज्याकडील प्रवास चालूच ठेवला. मुघल फौजेचा पाठलाग चुकवीत दुर्गादास राठोड ह्या अकबराला त्रिंबक येथे घेऊन आला.

केवळ संभाजी महाराजच औरंगजेबाविरुद्ध टिकाव धरू शकतील अश्या विश्वासाने ह्या दुर्गादास राठोडने अकबरास संभाजी महाराजांकडे 'राज-आश्रय' मागायचा सल्ला दिला होता.

अकबर मराठ्यांकडे जात आहे हे पाहून औरंगजेबाने अकबरास दोन पत्रे पाठविली. त्यातील एका पत्रात औरंगजेबाने अकबरास सांगितले कि," चूक करून, शत्रूस जाऊन मिळण्याचा घातक मार्ग तू अवलंबिलेला आहे. ह्याचे चांगले परिणाम होणार नाहीत."

पण अकबराने ह्या पत्रांकडे दुर्लक्ष केले. अकबर दक्षिणेकडे जात आहे हे लक्षात येताच औरंगजेबाने आपला औरंगाबादचा सुभेदार बहादूरखान खानजहाँ ह्यास पत्र पाठवून अकबरास पकडण्याचा हुकूम जारी केला. पण तोपर्यंत हा अकबर बागलाणात पोहचला होता. 

बागलाणचा सुभेदार आणि मुल्हेरचा किल्लेदार असलेल्या देवीसिंह बुंदेला ह्याने अकबराची वाट अडविण्याचा प्रयत्न केला. पण अकबर त्याला हूल देऊन नाशिकला पोहचला. नाशिकहून तो परत त्रिंबकला आला आणि तिथून तो कोकणात पळून गेला.

इकडे संभाजी महाराजांनी अजूनही ह्या अकबरास पत्र पाठवून उत्तर दिले नव्हते.

"ह्या अकबराचा आपण फायदा करून घेतला पाहिजे" असा विचार संभाजी महाराजांनी केला आणि आपल्या मराठा राज्यात आलेल्या अकबरास आणण्यासाठी आपली माणसे पाठविली.

मराठ्यांनी आता अकबरास आपल्या बरोबर घेऊन सुधागडाच्या पायथ्याशी आणून ठेवले. सुधागड हा रायगडापासून दूर आहे. संभाजी महाराजांनी मुद्दाम ह्या अकबरास आपल्यापासून दूर ठेवले.

अकबराजवळ ४०० घोडे, २५० उंट, आणि थोडेसे पायदळ होते. अकबराचे लोक त्यास बादशहा म्हणून मुजरा करत असत. हा अकबर माध्यम बांध्याचा आणि रंगाने गोरा होता. त्याची व्यवस्था सुधागडाच्या पायथ्याशी पेंढ्यानी शाकारलेल्या आणि शेणाने सारवलेल्या घरात केली होती. त्यास बसावयास सतरंजी होती. कोकणातील ह्या साध्या घराबाहेर अकबर हा उघड्यावरच बसत असे. त्याच्या बरोबरचे राजपूत आणि मुसलमान लोक त्यास पहारा देत असत. संभाजी महाराजांनी अकबराच्या रक्षणासाठी ३०० हशम ठेवलेले होते.

१७ जून १६८१ च्या सुमारास संभाजी महाराजांनी हिरोजी फर्जंदास पत्र देऊन अकबराकडे पाठविले. बरोबर एक हजार पागोडे , मोत्याची माळ, हिरेजडित मोठा कंठा, एक हिरेजडित तुरा, आणि इराणी आणि हिंदू पद्धतीच्या काही गोष्टी नजराणा म्हणून दिल्या. अकबराला लागणाऱ्या धान्यसामुग्रीचीही व्यवस्था करण्यात आली.

अश्या प्रकाराने आता बळजबरीनेच न बोलावता घरी आलेल्या 'पाहुण्याचा पाहुणचार' करायची वेळ संभाजी महाराजांवर आली होती.
थोड्याच दिवसांनी संभाजी महाराजांनी २० हजार होन देऊन नेताजी पालकर आणि इतर लोकांस ह्या अकबराजवळ ठेवले.

ऑगस्ट १६८१ पासून ह्या अकबराने आजून फौज गोळा करायचा उद्योग सुरु केला. तो आता अधिक सैन्य गोळा करू लागला. संभाजी महाराजांच्या हेरांनी हि बातमी लगेच संभाजी महाराजांच्या कानावर घातली. अकबर स्वतःची फौज जमा करत आहे असे पाहून संभाजी महाराजांनी ह्या अकबराला ताबडतोब निरोप धाडला कि "तू जर स्वतःचे सैन्य जमा करत
असशील तर माझ्या मुलखातून ताबडतोब निघून जा. इथं राहून सैन्य गोळा करायचे नाही." संभाजी महाराजांनी ह्या अकबरास नव्याने येऊन मिळालेल्या सैन्यास हाकलून देण्याची आज्ञाच काढली.

इकडं हा अकबर अजूनही संभाजी महाराजांची आणि आपली भेट कधी होते ह्याची आतुरतेने वाट पाहतच होता. संभाजी महाराजांनी मात्र ह्या अकबरास भेटण्याची आजिबात घाई केली नाही.

इथं एक अकल्पित आणि संभाजी महाराजांसाठी धोक्याची घटना घडली. जुलै १६८१ च्या आसपास संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या आण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो ह्यांनी गुपचूप संभाजी महाराजांस मारायचा कट केला. आणि ह्यासाठी आमच्या मदतीला यावे म्हणून ह्या अकबराला पत्र पाठविली.

अकबर प्रथम ह्या गोष्टीचा फायदा घेण्यास तयार झाला होता. पण अकबराजवळील दुर्गादासाने ह्या अकबरास सल्ला दिला कि "तू असे काही करू नकोस. कदाचित खुद्द संभाजी महाराजच तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा पाहत असतील." हा सल्ला पटून अकबराने त्याला आलेली हि पत्र संभाजी महाराजांस तशीच पुढे पाठवून दिली.

इकडे संभाजी महाराजांनी राजद्रोहाची हि पत्रे पाहून ताबडतोब ह्या कटातील सर कारकूनांस हत्तीच्या पायीच देऊन ठार मारले.
हा कट उघडकीस आल्यामुळे संभाजी महाराजांचा ह्या अकबरावरील विश्वास वाढला आणि आता त्यांनी ह्या अकबराची भेट घ्यायची ठरवली.
संभाजी महाराज हुशार होते. त्यांनी ह्या अकबरास रायगडास न बोलावता स्वतःच ह्या अकबरास भेटायला ते सुधागडास गेले.

१३ नोव्हेंबर १६८१ रोजी संभाजी महाराज आपल्या लष्करासहीत 'सुधागडाजवळील पादशाहपूर' येथे ह्या अकबरास भेटले. ह्या भेटीच्या वेळी दुर्गादास राठोडही बरोबर होता.

अकबर आणि संभाजी महाराजांच्या भेटीने तिकडे उत्तरेत औरंगजेबाचा अस्वस्थपणा आता अधिकच वाढला होता. त्याला भीती वाटली कि मराठे हे अकबराच्या मदतीने राजपुतांस हाताशी धरून आता सरळ आपल्यावर हल्ला करतील.

दक्षिणेत निघण्याअगोदर आता औरंगजेबाने घाई घाईने राजपुतांशी तह करून त्यांना अनुकूल करून घेतले. अजमेर येथून ८ सप्टेंबर १६८१ रोजी मोठी फौज घेऊन हा औरंगजेब दक्षिणेत यायला निघाला. १३ नोव्हेंबर १६८१
रोजी औरंगजेब आपल्या भव्य अश्या फौजेसहित बऱ्हाणपुरास पोहचला.
आता औरंगजेबाने परत आपले आवडते शस्र बाहेर काढले ते म्हणजे 'कपटनिती.' त्याने सिद्दी, पोर्तुगीज आणि कोकणांतील देसाई आपल्या बाजूस करून घेतले. इकडे संभाजी महाराजांनीही औरंगजेबाविरुद्ध लढायची जोरदार तयारी सुरु केली.

जंजिऱ्याच्या सिद्दीविरोधात संभाजी महाराजांनी जोरदार मोहीम उघडली होती. ह्या मोहिमेत आता संभाजी महाराजांनी ह्या अकबरालाही सिद्दीविरोधात आपल्या बरोबर सामील करून घेतले.

आता इथं सगळ्यात महत्वाचं आहे.

संभाजी महाराजांनी १६८२ च्या मे आणि नोव्हेंबर महिन्यांत दोन पत्रे राजस्थातील आमेरचा राजा रामसिंग (मृत मिर्झाराजा जयसिंगाचा मुलगा) यास लिहिली.

पत्रात संभाजी महाराज रामसिंगास म्हणतात कि, " तुम्ही सुलतान अकबरास तुमच्या राज्यात आश्रय दिलात हि फार चांगली गोष्ट केली. आपण सगळे हिंदू आहोत. त्यामुळे हिंदू म्हणून जी जी मदत करणे शक्य असेल ती ती मी तुम्हास करेल. तुम्ही पुढाकार घेऊन अकबरास गादीवर बसविण्याचे कार्य पार पाडावे. त्या यवनधमाला (म्हणजे औरंगजेबाला) असे वाटू लागले आहे कि आपण हिंदू तत्वशून्य झालो आहोत. त्याला असे वाटते कि आम्हाला आमच्या धर्माचा अभिमान राहिलेला नाही.

आम्ही क्षत्रिय आहोत. त्या यवनधमाची (म्हणजे औरंगजेबाची) वागणूक यापुढे आम्ही सहन करणार नाही. आमच्या धर्माला कमीपणा आणणारी कोणतीही गोष्ट आम्हास मान्य नाही. या दुष्ट यवनांशी युद्ध करण्यात आम्ही आमची संपत्ती, आमचा देश, आमचे दुर्ग असे सर्व काही पणास लावायला तयार आहोत.

ह्याच उद्देशाने आम्ही गेली दोन वर्ष अकबरास आणि दुर्गादास राठोडास आमच्या राज्यात आश्रय दिला आहे. आम्ही त्या यवनधमाच्या (म्हणजे औरंगजेबाच्या) अनेक सेनापतींचा वध केला. कित्येकांना कारागृहात टाकले. कित्येकांस दया येऊन सोडून दिले. आता खुद्द ह्या यवनधमाला (म्हणजे औरंगजेबालाच) पकडून कारागृहात टाकण्याची वेळ आलेली आहे.
तुम्ही ह्या वेळेस जर धैर्य आणि साहस दाखविले तर यवनांची शक्ती नष्ट करून आणि आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करून आपली धर्मकार्ये निर्विघन पार पाडता येतील.

पण अश्या प्रसंगी धर्माभिमान सोडून तुम्ही नुसते गप्पच बसून राहिलात ह्याचे आम्हास मोठे आश्यर्य वाटते.

आम्ही लवकरच अकबर आणि दुर्गादास राठोडास गुजराथेत पाठविण्याचा विचार करत आहोत. आपणही धैर्य करून मदत करावी.

इराणचा शहा अब्बास ह्याने आपण अकबरास मदत करू असे लिहिलेच आहे. परंतु ह्या यशाचे श्रेय इराणच्या शहाने घ्यावे असे आम्हास उचित वाटत नाही. आपले पिताजी 'मिर्झाराजा जयसिंग' ह्यांनी जसे ह्या यवनधमाला (म्हणजे औरंगजेबाला) गादीवर बसविले तसेच तुम्ही अकबरास गादीवर बसवून यशाचे धनी व्हावे.

आपण उभयतांनी एक होऊन जर अकबरास गादीवर बसविले तर हिंदू धर्म रक्षणाचे कार्य होईल. ह्या कार्याने तुमच्या वंशाची शोभा वाढेल.

माझे मंत्री कवी कलश आणि जनार्दन पंडित तुम्हास आजून सविस्तर पत्र लिहीतच आहेत. प्रतापसिंहाच्या ( हा हेर होता) तोंडून तुम्हाला सगळा तपशील कळेलच. कुशल कळवीत जाणें. अधिक काय लिहिणे. "

पत्र लिहून संभाजी महाराजांनी ह्या राजपुतांना औरंगजेबाविरोधात उठाव करण्यास सांगितले. संभाजी महाराज ह्या अकबरास नामधारी गादीवर बसवून दिल्लीची सगळी सत्ता हिंदूंच्या हाती कशी येईल ह्याचे नियोजन करत होते.

पण रामसिंगने काही धाडस झाले नाही. घाबरून जाऊन रामसिंग स्वस्थच बसून राहिला. संभाजी महाराजांच्या ह्या धाडसी मनसुब्याला ह्या कचदिल रामसिंगाने काही परवानगी दिली नाही.

ह्या मोठ्या पत्रावरून संभाजी महाराजांचा आत्मविश्वास आणि झेप किती मोठी होती ह्याची कल्पना येते.

इकडे मराठी राज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाच्या फौजांचा मराठी राज्याच्या सीमेवरच पराभव सुरु झाला होता. औरंगजेबाचे मराठयांना जिंकायचे स्वप्न; मराठे औरंगजेबाच्या फौजेस हरवून धुळीस मिळवत होते.
१६८२ सालच्या ऑगस्टच्या महिन्याच्या अखेरीस संभाजी महाराजांची आणि अकबराची परत भेट झाली. ह्या भेटीनंतर संभाजी महाराजांनी अकबरास सुधागडावरून हलवून तिकोना किल्यावर ठेवले. पण त्याला काही तिथली हवा मानवली नाही. त्यामुळे अकबरास परत तिथून काढून जैतापुरास आणून ठेवले. पण तेथीलही हवा काही ह्या अकबरास मानवली नाही.

इकडे संभाजीमहाराज हे औरंगजेबाबरोबरच इंग्रज पोर्तुगीज आणि सिद्दीशी एकाच वेळी लढत होते.

अति-व्यस्ततेमुळे संभाजी महाराज आपल्याकडे मर्यादेपेक्षा जास्त लक्ष देत नाहीत ह्याचा अकबरास राग येत असे.

अश्याच प्रसंगी १६८२ च्या अखेरीस एक प्रसंग घडला आणि संभाजी महाराज आणि अकबराचे संबंध एकदम बिघडले.

संभाजी महाराजांनी ह्या अकबरास भेटीवेळी एक हिरेजडित कंठा आणि एक हत्ती भेट दिला होता. संभाजी महाराजांनी दिलेली हि भेट ह्या अकबराने परस्पर त्याच्या एका रखेलीस भेट म्हणून दिली.

अकबराच्या प्रत्येक हालचालींवर संभाजी महाराजांचे अगदी बारीक लक्ष असे. संभाजी महाराजांच्या हेरांनी हि बातमी महाराजांस येऊन सांगितली आणि संभाजी महाराजांच्या मस्तकाची आग तळपायातच गेली.

त्यांनी अकबरास निरोप पाठविला कि, " मी तुझ्या सन्मानासाठी तो हिरेजडित कंठा तुला दिला होता."

ह्याला अकबराने उलट उत्तर दिले कि ' " मी बादशहा आहे. माझ्या मनासारखे मी वागेल."

हे उत्तर येताच संभाजी महाराजांनी अकबराच्या मदतीस ठेवलेले २००० घोडदळ आणि २००० पायदळ परत बोलावले. अकबरास खर्चाची रक्कम देणेही बंद केले.

ह्या घटनेने रागावून जाऊन अकबराने राहत असलेल्या छपरांना आणि तंबूंना आगी लावून दिल्या आणि फकिराचा वेष धारण करून गोव्यास निघण्याची तयारी सुरु केली. त्याने जाताना संभाजी महाराजांस प्रवासासाठी मदत म्हणून फौज मागितली. पण संभाजी महाराजांनी ती मदत दिली नाही.
अकबर आता गोव्याला पोर्तुगीजांकडे गेला. तेथून तो मक्केस जाणार होता. 

पण तिथं त्याला कवी कलश येऊन भेटला आणि त्याची समजूत काढून त्यास परत संभाजी महाराजांकडे वेंगुर्ल्यास घेऊनआला.

संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध सुरु केलेल्या युद्धात ह्या अकबराला बरोबर घेतले. मराठे आणि पोर्तुगीज तहात अकबराने बरेच मध्यस्तीचे काम केले.

पुढे संभाजी राजांनी अकबरास गुजरातला पाठविले. भडोच इथं अकबरास इराणच्या शहाचे आमंत्रण मिळाले.

१६८७ सालच्या फेब्रुवारी महिन्यात अकबर इराणकडे रवाना झाला. इराणला पोहचल्यावर शहा अब्बासचा मुलगा शहा सुलेमान ह्याने त्यास पुष्कळ नजराणे दिले आणि आपल्याकडे ठेऊन घेतले.

१७०४ साली वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी हा अकबर इराणमध्येच मरण पावला.

संभाजी महाराजांची ह्या प्रसंगी दूरदृष्टी दिसून येते. त्यांनी ह्या अकबराचा उपयोग जसा हिंदूंचे राज्य बळकट करण्यासाठी केला तसेच पोर्तुगीजांच्या विरुद्धही केला.

रामसिंगास पाठविलेल्या पत्रांतून छत्रपती संभाजी महाराजांचे अफाट बुद्धी कौशल्य दिसून येते.

संपूर्ण उत्तर हिंदुस्थान यवनांच्या हातून मुक्त करून हिंदू पतपादशाही स्थापन करायचे स्वप्न संभाजी महाराजांनी पाहिले; आणि ते स्वप्न पूर्ण करायचा आटोकाट प्रयत्नही केला.

छत्रपती संभाजी महाराजांच हे स्वप्न पुढे त्यांचाच मुलगा छत्रपती शाहू महाराज ह्यांनी पूर्ण केले.

उत्तर हिंदुस्तानातील स्वराज्य विस्तारक हे छत्रपती संभाजी महाराज हेच होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्याईचा परमोच्च बिंदू हा छत्रपती संभाजी महाराज होते.

सार्थ अभिमान आहे की देव देश आणि धर्म वाढविणारा असा राजा ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला.

लेख समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...