विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 27 July 2019

युवराज्ञी येसूबाई भाग 7

युवराज्ञी येसूबाई :
post by: अभय शरद देवरे, सातारा

भाग 7
मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल ? त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ? धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील ? आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल ? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल ? महाराष्टातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजते. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमीकाव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो की पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे याना येसूबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही ? त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.
कोणत्या मातीत जन्मलेली आणि तयार झालेली माणसे ही ? स्वराज्यासाठी तन मन धन देणे म्हणजे काय हे यांच्याकडून किती वेळा शिकायचे ? कितीही प्रयत्न केला तरी येसूबाईंइतके पराकोटीचे उच्च त्यागजीवन जगणे आपल्याला जमेल का ? राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणे हेच त्यांच्या जीवनाचे सार होते ते अंगी बाणवणे हे आपल्याला कितीसे जमेल हा प्रश्नच आहे. स्वराज्यासाठी त्यांनी केलेला आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची परिसीमाच म्हणावी लागेल.
आज कैदेतून झालेल्या त्यांच्या सुटकेला ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वोतोमुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके तर आपण नक्कीच करू शकतो.
अभय शरद देवरे,
सातारा

No comments:

Post a Comment

सज्जनगडाचा "किल्लेदार जिजोजी काटकर"

  सातारा शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्याच्या किनाऱ्यावर उभा असलेला “परळीचा किल्ला उर्फ सज्जनगड”... ●...