विनोद जाधव एक संग्राहक

Friday 26 July 2019

होदिगेरेचा अज्ञातवास : महाराज साहेब शहाजीराजे यांचे समाधीस्थळ






होदिगेरेचा अज्ञातवास : महाराज साहेब शहाजीराजे यांचे समाधीस्थळ
आवर्जून वाचावा असा अभ्यासपूर्ण लेख...
महाराज साहेब शहाजीराजे यांच्या शिमोगा जिल्ह्यात हालचाली चालू होत्या. बिदनूरच्या बंडखोर नायकास शासन करून त्यांनी आसपासच्या पाळेगारांचा बंदोबस्त केला. चन्नगिरी पासून चार मैलावर होदिगेरे या ठिकाणी त्यांचा तळ पडला होता. आज हा भाग जरी ओसाड दिसत असला तरी त्यावेळी तो घनदाट जंगलाने व्यापलेला होता . काही स्थानिक शेतकरी जंगलातील रानडुकरे त्रास देतात व शेतीचीही नासधूस करतात अशी तक्रार घेऊन महाराज साहेबां जवळ आले. महाराज साहेबांनी शिकारीची योजना आखली. शिकारी दरम्यान सावजाचा पाठलाग करताना महाराजांच्या घोड्याचा पाय विवरात अडकला आणि महाराज साहेब घोड्यावरून फेकले गेले . घोड्यावरुन पडल्यावर महाराज साहेबांना मूर्च्छा आली परंतु त्यांचा पाय रिकीबीत अडकल्यामुळे काही अंतर ते फरफटत गेले व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. ती तारीख होती २५ जानेवारी १६६३.
ज्या ठिकाणी महाराज साहेबांच्या घोड्याचा पाय अडकला ती जागा आज लायदा होळा या नावाने ओळखली जाते आणि ज्या ठिकाणी घोडा थांबला आणि महाराज साहेब गतप्राण झाले त्या ठिकाणी आज त्यांची समाधी आहे.
व्यंकोजीराजांनी येथे समाधी बांधून घेतली.
या गावापासून जवळच पाच किलोमीटरवर एरगट्टीहल्ली नावाचे गाव आहे, महाराज साहेबांच्या समाधीची व्यवस्था म्हणून हा गाव इनाम म्हणून देण्यात आला होता.
समाधीपासून साधारण दीडशे मीटर वर राचीराम नावाची विहीर आहे. ही विहीर व्यंकोजी राजे यांनी महाराज साहेबांच्या समाधीची पूजा करताना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून राचीराम नावाच्या व्यक्तीस बांधण्यास सांगितली. आज ती राचीराम या नावाने ओळखली जाते. आज ही विहीर फक्त नावापुरती उरली आहे.
महाराज साहेबांच्या मृत्यूची बातमी शिवाजी महाराजांना सुरतेच्या मोहिमेवरून परत आल्यावर कळाली. दक्षिण दिग्विजय मोहिमे वरून परत येताना शिवाजी महाराजांनी या समाधीवर छत्री बांधली .
छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी महाराज साहेब शहाजीराजे यांच्या समाधीच्या दिवाबत्तीची सोय व्हावी यासाठी दिलेले पत्र उपलब्ध आहे. थोरल्या शाहूंनी नंतर शहाजीराजे शिवाजी राजे आणि संभाजी महाराज यांची एकत्र समाधी शिखर शिंगणापूर येथे बांधून घेतली. म्हणजेच काय तर महाराज साहेब शहाजीराजांनी जो स्वराज्य रुपी वृक्ष लावला त्या वृक्षाची कोणतीही शाखा आपल्या मूळ पुरुषाला विसरलेली नाही. ही कृतज्ञता खानदानी राजघराण्याला शोभणारीच आहे . आज आम्ही या डौलदार वृक्षाची फळे चाखणारे मात्र त्या मूळ पुरुषाच्या कर्तुत्वाशी आणि त्यांच्या उपकाराशी किती कृतज्ञ आहोत ?
समाधीचा शोध:-
इ.स. १९१० ते १९१२ च्या दरम्यान समाधीचा शोध लागला. बसवपट्टण हे गाव होदिगेरे येथून 42 किलोमीटर अंतरावर आहे . ग्रँड डफ व डॉक्टर बाळकृष्ण यांच्या मते शहाजी महाराजांची समाधी बसवापट्टण येथे आहे परंतु प्रत्यक्षात ही समाधी होदिगेरे येथे असल्याचे म्हैसूर सरकारच्या पुरातत्व खात्याने संशोधन करून १९४० मध्ये सिद्ध केले.
तसेच पटवर्धन यांनीही जुनी कागदपत्रे पाहून हीच शहाजी महाराजांची समाधी आहे असे भारत इतिहास संशोधन मंडळाच्या १९१५-१९१६ च्या अहवालात मांडले होते .
खरी समाधी होदेगिरी येथेच असावी या कल्पनेस काझी बारामुद्दीन यांना सापडलेल्या शिलालेखावरून चालना मिळाली. हा शिलालेख कानडी भाषेत आहे त्यातील पहिली ओळ "श्री शहाजी " अशी असून दुसरी ओळ " राजंन्ना स... " अशी आहे. त्यानंतरची ' माधी 'ही अक्षरे नष्ट झाली आहेत परंतु ती अक्षरे समाधी अशीच असली पाहिजेत. काझी बारामुद्दीन यांना सापडलेला शिलालेख हा समाधी वरून काढून शेतातील पाणी अडविण्यासाठी लावण्याचा उद्योग कोण्या एका स्थानिकाकडून करण्यात आला होता.
समाधीची निश्चिती करण्यात चन्नगिरी येथील मराठा पुढारी एम एस पापण्णा(सुर्यवंशी) यांनी पुढाकार घेतला होता .
धारवाडचे एक थोर समाजसेवक श्री भिसे-कदम यांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न केले. भिसे हे थोर स्वातंत्र्यसैनिक होते. १९२०,२१ व ३० या काळात इतिहास प्रसिद्ध जी असहकार चळवळ झाली त्यात त्यांनी भाग घेतला होता. १९३१ मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना शिक्षा झाली होती .
२३ जानेवारी १९३९ मध्ये त्यांनी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त होदिगेरे येथे जाऊन श्रद्धांजली वाहिली व नंतर त्यांनी समाधीचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून महाराष्ट्रभर दौरा काढला . अनेक सभा घेतल्या नामवंत व प्रतिष्ठित व्यक्तींना या कार्याकडे लक्ष घालण्याची विनंती केली, म्हैसूर व महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु समाधीची जबाबदारी घेण्यास कोणीही पुढे आले नाही.
स्थानिक रहिवाशांना १७७३ पर्यंत या समाधीची माहिती होती , पुढे मात्र लोकांना तिचा विसर पडला , त्यानंतर दीडशे वर्षांनी या समाधीचा शोध लागला. १९४० मध्ये तिची डागडुजी करण्यात आली समाधीवर एकूण तीन फूट उंचीचे चबुतरे दावणगिरी, चन्नगिरी व शिमोगा येथील मराठा मंडळींनी बांधून घेतले. तसेच मूळच्या सपाट व जमिनीलगत असणाऱ्या चबुतऱ्याला सिमेंट ने प्लास्टर केले. परंतु नंतर समाधी बद्दलचा त्यांचा त्यांचा उत्साह मावळला. होदिगेरे येथील गावकऱ्यांनी देखील समाधीकडे लक्ष दिले नाही, उलट साफसूफ करून ठेवलेल्या या पवित्र जागेत डुकरे, शेळ्या-मेंढ्या, जनावरे व वेळप्रसंगी गावकरी यांना घाण करण्यासाठी हक्काची जागा मिळाली.
१९५६ साली त्यावेळचे केंद्रीय शेती मंत्री पंजाबराव देशमुख हे होदिगेरे येथे समाधी पाहण्याकरता आले असता त्यांनी समाधी आणि जवळपासचे भयानक चित्र पाहिले व तिथल्या तिथेच १००० रुपयांचा चेक समाधीच्या आजूबाजूची झाडी साफ करण्यासाठी दिला. दिल्लीला परत गेल्याबरोबर त्यांनी समाधीसाठी १८००० रुपयांचा निधी मंजूर करून दिला.
केंद्रीय पुरातत्व खात्याने समाधीसाठी २६ गुंठे जमीन तिमाप्पा सावकाराकडून विकत घेऊन , समाधी भोवती ६०X६०X६ अशी भिंत बांधून घेतली व पुरातत्व खात्याच्या नावाचा बोर्ड तेथे उभा केला. मिळालेल्या निधीतून रंगनाथ देवालयाची दुरुस्ती तसेच सत्तेबेन्नूरच्या कारंज्याची दुरुस्ती करण्यात आली.
त्यानंतर महाराष्ट्रातील एक-दोन मान्यवरांनी समाधीला भेट दिली परंतु भेट देण्यापलीकडे कोणीही काही भरीव कामगिरी केली नाही.
समाधी व इतर वास्तूंची आजची परिस्थिती:-
गावच्या मध्यावर चौकात Shahaji Tomb अशी पाटी लावलेली आहे . पाटी इतकी गंजलेली आहे आहे की त्यावरील अक्षरे ही स्पष्ट दिसत नाहीत . जिथे ही पाटी आहे त्याच्या विरुद्ध दिशेला गावाच्या वेशीवर एका मोठ्या वटवृक्षा जवळ महाराज साहेबांची समाधी आहे. समाधी भोवती चौकोनी कंपाऊंड व लोखंडी जाळी बसवलेली आहे. कंपाऊंडच्या भोवती झाडे लावण्यात आलेले आहेत परंतु ही झाडे म्हणजे फक्त औपचारिकता वाटते. समाधीचा केअरटेकर सकाळी दहाच्या अगोदर कधी तिथे पोहचत नाही . गावकऱ्यांचे समाधीकडे किती लक्ष आहे हे जाणून घेण्यासाठी मी मुद्दामून कंपाऊंड पार करुन आत शिरलो तब्बल वीस मिनिटे मी आत होतो , परंतु हा माणूस कंपाऊंडच्या आत शिरून काय करतोय एवढे विचारण्याची किंवा तिकडे लक्ष देण्याची ही कोणास गरज वाटली नाही.
गावामध्ये एक अंबा भवानीचे मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार महाराज साहेबांनी केला होता. पूर्वी हे मंदिर अगदी साधं होतं मधल्या काळात भोसले नामक एका व्यक्तीने त्याचा जीर्णोद्धार केला.
समाधीच्या समोरच शहाजी महाराज यांनी बांधून दिलेला तलाव आहे. हा तलाव सध्या पूर्ण चिखलाने माखलेला आहे व सर्वत्र झाडी वाढली आहे.
मलप्पा शेट्टी नावाचा एक सावकार या गावात राहत होता. त्याच्या वाड्यात महाराज साहेबांचा मुक्काम असे . त्या वाड्यात आज शेट्टी यांचे वंशज राहतात. काही वर्षापर्यंत शहाजी महाराजांची रत्नजडित तलवार, त्यांची वस्त्रे व काही मौल्यवान वस्तू शेट्टी यांच्या वंशजांकडे होत्या , परंतु आज त्यांचे वंशज त्या गोष्टींसाठी नकार दर्शवतात. हा वाडा आज जीर्ण झालेला आहे ,परंतु ऐतिहासिक खुणा बाळगून आहे. रंगनाथ देवस्थानाच्या पाठीमागे अगदी थोड्या अंतरावर हा वाडा आहे.
बेळगाव येथे राहणारे श्री श्रीहरी तेलकर ( आमचे जीवलग स्नेही श्री Arvind Telkar यांचे काका) यांनी लिहिलेल्या " हिंदवी स्वराज्याचे जनक श्री शहाजी राजे भोसले " या पुस्तकात समिधीविषयी सविस्तार माहिती आली आहे . त्यांनी समाधीला स्वतः भेट देऊन काही महत्त्वपूर्ण नोंदी करून ठेवल्या आहेत. खरंतर या पुस्तकामुळे होदीगेरे येथे जाण्याचा माझा विचार आणखी बळावला. श्रीहरी तेलकर यांचा मी सदैव ऋणी राहीन. त्यांनी समाधीला भेट दिल्यानंतर त्यांना काही गोष्टी जाणवल्या ज्या आजही होणे गरजेचे आहे, त्या पुढील प्रमाणे
१ समाधीची डागडुजी करून नवे चबुतरे व छत्री बांधावी.
२ समाधी भोवतीची सुमारे सहा एकर जमीन विकत घेऊन त्याठिकाणी सुंदर बगीचा तयार करावा.
३ बगिच्याच्या परिसरात एक म्युझियम तयार करून शहाजी महाराजांच्या काळची हत्यारे पोशाख व इतर दुर्मिळ वस्तू ठेवाव्यात.
४ महाराज साहेबांचा भव्य पुतळा येथे उभारावा.
५ महाराज साहेब होदिगेरे येथे ज्या वाड्यात मुक्काम करीत असत तो सरकारने ताब्यात घेऊन महाराज साहेबांच्या वास्तव्याची एक खूण म्हणून तो राखून ठेवावा.
६ राचीराम विहीर ही व्यंकोजीराजांनी तयार करून घेतलेली विहीर पुन्हा बांधण्यात यावी.
७ शहाजीराजांनी बांधून दिलेला दिलेला तलाव त्यातील गाळ व माजलेली झाडे झुडपे कापून स्वच्छ करण्यात यावी जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांना तो वापरता येईल
८ समाधीच्या देखरेखी करता कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी.
९ होदिगेरे गावाचे नाव बदलून ते शहाजीनगर असे असे ठेवावे.
१० यात्रेकरू व प्रवासी केंद्र म्हणून या ठिकाणी विश्रांती स्थान व उपहारगृहाची व्यवस्था करावी.
शहाजी महाराजांची स्फूर्तीदायक आठवण तरुण पिढीच्या मनात सतत जागृत ठेवण्याकरता तसेच क्षात्र वृत्तीची जोपासना करण्यासाठी वरील जीर्णोद्धाराची योजना अंमलात आणली गेली तर एक बहुमोल अशी राष्ट्रीय कामगिरी केल्यासारखे होईल.
चित्र सूची
१ शहाजी महाराजांची समाधी दर्शवणारी गंजलेली पाटी.
२ महाराज साहेबांची समाधी समाधी
३महाराज साहेबांनी बांधून दिलेला तलाव
४ महाराज साहेबांचं वास्तव्य असलेला वाडा
५ व्यंकोजीराजांनी बांधून दिलेली राचीराम विहीर
६ महाराज साहेबांच्या घोड्याचा पाय अडकलेली जागा लायदा होळा
७ महाराज साहेबांच्या समाधीसाठी दिलेलं गाव एरगट्टीहल्ली येथील प्रवेशद्वाराजवळच मंदिर
८ अंबा भवानी चे मंदिर
९ रंगनाथ देवालय
पोस्ट साभार : अमर श्रीरंग साळुंखे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...