विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 August 2019

जहाज फिरंगी. एका कलंदर सैनिकाची गोष्ट

जहाज फिरंगी.
एका कलंदर सैनिकाची गोष्ट.
गोष्ट आहे महादजी शिंदे यांच्या काळातली; म्हणजे साधारण १७९४ च्या आसपासची.
मराठ्यांच्या इतिहासाशी एका आयर्लंड देशातील आयरिश माणसाचा संबंध आलेला आहे.
ह्याच नाव होते जॉर्ज थॉमस. ( George Thomas )
मराठा लोक ह्या जॉर्ज थॉमसला 'जहाज फिरंगी' असे म्हणत.
हा 'जॉर्ज' मूळचा आयर्लंड देशातील कौंटी टिपेरायरा भागातील रोस्क्रेया ह्या गावचा रहिवासी होता.
(Roscrea, Tipperary, Ireland)
हे आयर्लंड इंग्लडच्या जवळ बेटावर आहे.
ह्या जॉर्जचा जन्म एका अतिशय गरीब शेतकरी कुटुंबात झाला होता. हा जॉर्ज लहान असतानाच ह्याचे वडील वारले.
हा कधीही शाळेत गेला नाही त्यामुळे हा निरक्षरच राहिला.
ह्या वेळी आयर्लंड मध्ये तरुण मुलांना पकडून जबरदस्तीने नौदलात भरती करत असत.
पुढे थोडा मोठा झाल्यावर ह्या जॉर्जलाही बळजबरीने पकडून नौदलात भरती केले गेले. सुरवातीस हा तिथल्या 'युगहल' बंदरावर ( Youghal ) एक सामान्य कामगार म्हणून काम करत असे.
वयाच्या २५ व्या वर्षी हा जॉर्ज ब्रिटिश नौदलात भरती झाला आणि १७८२ साली ह्याला इंग्लडमधून भारतातील मद्रास येथे पाठविण्यात आले.
जॉर्ज भारतात आला त्यावेळी त्याचे वय ३२ वर्ष होते. पण मुळातच महत्वकांक्षी आणि काही जगावेगळे करण्याची धडपड असणाऱ्या ह्या जॉर्जला ही कामगाराची नोकरी काही आवडली नाही.
जॉर्ज स्वतः चांगला घोडेस्वार आणि लढवय्या असल्याने पुढे जॉर्जने आपली ब्रिटिश सैन्यातील कामगाराची नोकरी सोडून दिली.
जॉर्जने जवळ असलेले सर्व पैसे खर्च करून पेंढारी सैनिकांची एक छोटी तुकडी तयार केली. पेंढारी सैनिक म्हणजे भाड्याचे सैनिक. जो पैसे देईल तिकडे हे पेंढारी काम करत. हे काही कायमचे पदरी बाळगलेले सैनिक नसत.
जॉर्जने ह्या पेंढाऱ्यांना आपल्या पदरी ठेऊन स्वतःचे एक छोटे सैन्य तयार केले आणि आता हा जॉर्ज आजच्या उत्तरप्रदेशातील मीरत जवळील 'सारधाना' येथील 'बेगम सुमरू' नावाच्या बाईच्या पदरी येऊन नोकरी करू लागला.
ही 'बेगम सुमरू' नावाची बाईही एक भन्नाटच प्रकरण आहे.
हीच खरं नाव 'फर्जाना झेब उन्ननिस्सा.'
ही मूळची काश्मिरी होती. दिसायला सुंदर असल्यामुळे सुरवातीच्या काळात ही नाचगाणे करून आपले पोट भरायची.
नाचगाण्यातून ह्या बाईने बरीच धनदौलत कमावली होती.
कमावलेल्या पैश्यांच्या जोरावर पुढे ह्या बाईने आपल्या पदरी पेंढाऱ्यांची भाडोत्री फौज बाळगायला सुरवात केली. ज्या जहागीरदाराला  लढाईसाठी फौजेची गरज पडेल त्याच्याकडून पैसे घेऊन हि बाई आपली भाडोत्री फौज त्या जहागीरदारास लढाईसाठी देत असे.
पुढे ह्या 'फर्जाना झेब उन्ननिस्साने एका वॉल्टर रेनहार्डट सोम्बरे
( Walter Reinhardt sombre )  नावाच्या युरोपियन ख्रिश्चन सैनिकाशी  लग्न केले आणी आपला मुस्लिम धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हिने आपले मुस्लिम नाव बदलून 'जोंना नोबिलिस सोम्बरे' (Joanna Nobilis Sombre ) असे इंग्रजी नाव धारण केले.
पण हे नाव उच्चारायला कठीण असल्यामुळे सगळे लोक हिला 'बेगम सुमरू' असेच म्हणायचे.
ही बाई बरीच खटपटी होती. आपल्या पदरी असलेल्या भाडोत्री पेंढाऱ्यांच्या फौजेच्या जोरावर हिने मीरत जवळील 'सारधाना' येथे स्वतःची जहागिरी स्थापन केली होती.
पोटा पाण्याच्या शोधात असणारा जॉर्ज आपली छोटी पेंढाऱ्यांची फौज घेऊन आता ह्या बेगम सुमरूच्या पदरी नोकरी करू लागला. कर्तृत्वाच्या जोरावर लवकरच जॉर्ज हा बेगम सुमरूचा आवडता 'जनरल' बनला.
पण एका जागेवर समाधानी राहील तो जॉर्ज कसला..
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
पुढे ह्या जॉर्जने ह्या बेगम सुमरूची नोकरी सोडून दिली आणि मराठ्यांच्याकडील महादजी शिंद्यांच्या फौजेत नोकरी पत्करली. महादजी शिंद्यांच्या पदरी असलेल्या अप्पा खंडेराव ह्याच्या पदरी जॉर्ज राहू लागला.
१७९३ पासून १७९७ पर्यंत म्हणजे चार वर्ष हा अप्पा खंडेरावच्या पदरी आपली पेंढाऱ्यांची फौज घेऊन नोकरी करत होता. ह्या वेळी मराठ्यांच्या पदरी राहून ह्याने बऱ्याच लढायांत भाग घेतला. राजस्थान आणि हरियाणा भागातील कछवाह, शेखावत, ठाकूर, शेखावती आणि शीख ह्यांच्यावर मराठ्यांनी हल्ले करून ह्या सगळ्यांना जिंकून घेतले होते.
ह्या मराठ्यांच्या मोहिमेत ह्या जॉर्जने आपल्या छोट्या पेंढाऱ्यांच्या फौजेसहित चांगली कामगिरी बजावली होती.
मराठ्यांच्या पदरी नोकरी करून जॉर्जला आता बराच अनुभव आलेला होता.
अप्पा खंडेरावच्या मृत्यूनंतर साधारण १७९७ मध्ये जॉर्ज स्वतंत्र जहागीरदाराप्रमाणे वागू लागला.
अनुभव आणी युद्धातून मिळालेल्या पैश्यांच्या जोरावर जॉर्जने आपली फौज अधिक वाढवली. जॉर्ज आता फौज आणि पैसे ह्यांमुळे अधिक शक्तिशाली झाला होता. जॉर्जने आता महादजी शिंद्यांच्या पदरी असलेली आपली नोकरी सोडून दिली आणि हरियाणाच्या भागात लुटालूट सुरु करून 'रोहतक' आणि 'हिसार' प्रांत बळकावले.
आता हा जॉर्ज एखाद्या जहागीरदारासारखे वर्तन करू लागला. सुरवातीस मराठ्यांनी ह्या जॉर्जच्या उचापतींकडे फारसे लक्ष दिले नाही. 
जॉर्जने आता हरियाणामधील 'हंसी' हे त्याचे मुख्य लष्करी ठाणे तयार केले आणि असिगढ उर्फ हंसीच्या किल्याची दुरुस्ती आणी मजबुती केली.
जॉर्जने रोहतकच्या दक्षिणेस १० कोसांवर एक ‘जॉर्जगड’ नावाचा किल्लाही बांधला. ह्या किल्यास आपले लोक 'जहाज गड' असे म्हणत.
पुढे हा पंजाबच्या पतियाला भागातील 'फुलकीयान मिसल' जहागीरदार शिखांच्या मदतीने मराठ्यांवरच हल्ले करू लागला. ह्या शिवाय ह्याने पंजाब प्रातांतील 'जिंद' भागावर हल्ले करून जिंदच्या शीख सैन्याचा पराभव केला.
आपल्या पदरी असलेल्या सैन्याचा खर्च भागविण्यासाठी हा जॉर्ज शेजारच्या 'जिंद' आणि 'कैथल' प्रदेशावर कायम हल्ले करून लूट मिळवायचा.
१८०० मध्ये तर ह्या जॉर्जने धाडस करून पटियाला राज्यातील 'सिरसा' शहरावर हल्ला करून मोठी लूट मिळविली होती.
अत्यंत महत्वाचे:
आपल्या लुटीच्या पैश्यांच्या जोरावर जॉर्जने मोठी फौज उभी केली आणि आजूबाजूचा मुलुख जिंकून घेऊन स्वतःस हंसीचा राजाच घोषित केले.
जॉर्जने त्याच्या ह्या छोट्याश्या राज्यात स्वतःच्या नावाची नाणीही पाडली. ह्या जॉर्जचे राज्य उत्तरेकडील घर्ग नदीपासून दक्षिणेकडील झज्जर भागातील बेरी गावापर्यंत आणि 'राहोतक' भागातील 'मेहम'पासून हनुमानगड जिल्ह्यातील 'भंडारा'पर्यंत पसरलेले होते.
जॉर्जने असीगढ म्हणजे आजचा हंसीच्या किल्याची डागडुजी करून हंसीला आपल्या राज्याची राजधानी घोषित केले आणि तिथून राज्य चालवायला सुरवात केली.
ह्या जॉर्जचे राज्य १४ परगण्यांत पसरलेले होते.
ह्याने आपले सैन्य वाढवून आठ बटालियन केले. ह्याच्या सैन्यात ६००० सैनिक असून त्याच्याकडे चांगल्या ५० तोफा होत्या. शिवाय १००० घोडदळही जॉर्जच्या पदरी होते.
ह्या शिवाय जॉर्जने जाट आणि १५०० रोहिल्ला मुसलमान सैनिकांना आपल्या राज्यात इनामी जमिनी देऊन आपली लष्करी शक्ती बरीच वाढविली होती.
महाराष्ट्र धर्मचे लेखक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार;
हा जॉर्ज अभिमानाने स्वतःस 'हंसीचा राजा' आणि शिवाय 'आयर्लंडमधील टिपेरायराचा राजा' अशी बिरुदावली लावत असे.
जॉर्जने जयपूर, बिकानेर, उदयपूर, आणि शिखांच्या राज्यांवर हल्ले करून बरेच विजय मिळविले होते.
आपल्या आत्मचरित्रात जॉर्ज म्हणतो कि, " मी माझ्या कर्तृत्वाने स्वतःचे राज्य स्थापन केले. नवीन किल्ले बांधले. जुन्या किल्यांची मजबुती केली. सुरवातीस मला फार अडचणी आल्या. परंतु मी अडचणींवर मात करत स्वतःची ७ हजार सैनिकांची  फौज उभी केली. मी माझ्या राज्यात स्वतःच्या नावाने नाणी पाडली.  एका साध्या कामगारापासून मी कर्तृत्वाने जहागीरदार बनलो आणी पुढे  जहागीरदारापासून मी पुढे राजा बनलो. मी स्वतःच्या हाताने माझ्या तोफखान्याच्या तोफा ओतल्या. मी बनविलेल्या तोफा आणी बंदुका ह्या सर्वोत्तम होत्या."
पुढे १७९८ ते  १८०१ मध्ये जॉर्जने स्वतःसाठी हिस्सार प्रांतात 'जहाज कोठी' नावाचा महाल तयार केला.
जॉर्ज आता आपल्या राज्याच्या सीमा वाढवू लागला आणि आजूबाजूच्या प्रदेशांवर सारखे हल्ले करू लागला.
मराठ्यांच्या ताब्यातील प्रदेशावरही जॉर्ज आता धाडसाने हल्ले करू लागला. ह्या त्याच्या खटपटींमुळे जॉर्ज मराठ्यांच्या नजरेसमोर आला.
वास्तविक मराठ्यांच्या शक्तीपुढे जॉर्ज 'टिचभरही' नव्हता.
'जहाज फिरंगी' उर्फ जॉर्जचे वाढते अस्तिव आता दौलतराव शिंद्यांच्या नजरेस येऊ लागले आणि आता मराठ्यांनी जहाज फिरंगी उर्फ जॉर्ज विरुद्ध आपली आघाडी उघडली.
दौलतराव शिंद्यांच्या फौजेतील 'जनरल पेरॉन' ह्याने जहाज फिरंगी उर्फ जॉर्ज ह्याच्या राज्यावर हल्ले सुरु केले.
मराठयांनी त्याच्या या जॉर्जगड उर्फ जहाजगडास वेढा घातला. त्यात जॉर्जचा सेनापती हॉपकिन्स हा ठार होऊन जहाज फिरंगी उर्फ जॉर्जचा पूर्ण पराभव झाला.
मराठ्यांनी जहाज फिरंगी उर्फ जॉर्जचे सर्व राज्य एकाच झटक्यात जिंकून घेतले. जॉर्जचे राज्य जिंकून घेतले तरी जॉर्ज काही मराठ्यांच्या हाती  लागेना. जॉर्जला जिवंत पकडण्यासाठी मराठा फौज आता शोधाशोध करू लागली.
मराठे मागे लागलेले पाहून 'जहाज फिरंगी' उर्फ जॉर्ज आता जीव वाचवून पळत सुटला.
तो एकटाच पळून ३० कोसांवरील हंसीस गेला.
(साधारण ५५ किलोमीटर )
पाठलागावरील मराठ्यांनी हंसीला वेढा घातल्यावर तिथून पळून जाऊन जॉर्ज उत्तरप्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात असलेल्या अनुपशहर येथे एका इंग्रज तुकडीच्या आश्रयास गेला.
मराठे तिथेही त्याच्या पाठलागावर गेले. त्यामुळे तिथून जॉर्ज शेवटी बंगालमध्ये पळून गेला.
बंगालमधून पुढे तो यूरोपात इंग्रजांच्या सोबतीने जाण्यास निघाला असता बंगालमधील बहरामपूर येथे २२ ऑगस्ट १८०२ साली गंगेच्या काठी  'जहाज फिरंगी' उर्फ जॉर्ज हा साथीच्या आजाराने मरण पावला.
मृत्यूनंतर बहरामपूर येथील 'बाबुलबोना' येथे जॉर्जला दफन करण्यात आले.
मृत्यूच्या वेळी जॉर्जला 'ऍलेक' आणी 'ऍनी' अशी दोन अपत्ये होती.
कर्तृत्वाने मनुष्य काय काय करू शकतो?
जॉर्जच्या ह्या इतिहासातून शिकण्यासारखे आहे. इच्छाशक्ती आणी धाडस असेल तर मनुष्य आपल्यास हवे ते यश नक्कीच मिळू शकतो.
पहा; एक आयरिश पोरगा इकडे येतो काय आणि आपल्या कर्तृत्वाच्या धडाडीने सैन्य उभे करून स्वतःचे राज्य निर्माण करून त्या राज्याचा राजा बनतो काय..
आहे कि नाही गंमत. 
तर असा हा मराठ्यांच्या इतिहासातील 'जहाज फिरंगी.'
लेख कसा वाटला ते मला खाली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि लेख शेअर करायला विसरू नका.
लेख समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...