परसोजी भोसले
मृत्यू दि. 1709 * संभाव्य समाधी - खेड माहुली ता. जि. सातारा
इतिहासप्रसिद्ध भोसले घराण्यातील छत्रपती शिवरायांची वेरूळ शाखा व नागपूरकर भोसलेंची हिंगणी शाखा ह्या एकाचा कुळातील होत्या. पुण्याजवळच्या पाटस परगण्यातील हिंगणी येथील पाटीलकी खरेदी करून परसोजी भोसले हे नागपूरकर भोसल्यांचे मूळपुरुष तेथे स्थायिक झाले. परसोजीना बिंबाजी नावाचे पुत्र होते. बिंबाजींचे मुधोजी व रुपाजी हे दोन पुत्र शहाजीराजांच्या बरोबर सुरुवातीला निजामशाहीत चाकरी करीत होते. लवकरच ते शिवरायांच्या पदरी स्वराज्यसेवेत दाखल होऊन पायदळात सरदार म्हणून प्रसिद्धीस आले. मुधोजींचे पुत्र बापुजी, परसोजी व साबाजी हे तिघेही बंधू आपल्या वडिलांप्रमाणेच शिवाजीमहाराजांच्या सेवेत दाखल झाले. आपल्या कर्तबगारीवर ते सरदार बनले व शिवरायांच्या काळातच वर्हाड भागात मोहिमांवर जाऊ लागले. 1674 मध्ये राज्याभिषेकप्रसंगी शिवरायांनी साबाजीना ‘एकनिष्ठ व पुरातन सेवक’ असे गौरवून राक्षसवाडी तर्फ राशिंग व पिंपरी तर्फे कडेवली ही गावे इनाम दिली.
शिवराय व संभाजी महाराज ह्यांच्या मृत्यूनंतर मोगल महाराष्ट्रात वरचढ ठरत असल्याने छत्रपती राजाराम महाराज जिंजी येथे गेले. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या संरक्षणासाठी मोजक्या सरदारांमध्ये रुपाजी भोसले हेही जिंजीला गेले. मोगलांनी जिंजीला वेढा घातला. ह्यावेळी सेनापती संताजी घोरपडे व धनाजी जाधव ह्यांच्या नेतृत्वाखाली परासोजींनी मोगलांना महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू ह्या भागात गनिमी काव्याने विलक्षण सतावले. परसोजींच्या कर्तबगारीची दखल घेऊन छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना ‘सेनासाहेबसुभा’ हे उच्च दर्जाचे पद देऊन वर्हाड-गोंडवन भागावर मराठी सत्तेचा अंमल बसविण्याची कामगिरी सोपविली. त्यांना सरंजाम देऊन सरदेशमुखी वसूल करण्याची सनद दिली.
1704 मध्ये परसोजी भोसले व नेमाजी शिंदे ह्यांनी मोठी फौज घेऊन प्रथमच नर्मदा नदी ओलांडून थेट मुगलांच्या मुलुखात स्वारी केली. बुराणपूर-सिरोंजसह मराठे सरदार गुजरातेतही शिरून हल्ला करून लुट करू लागले. मोगलांचे वर्चस्व पूर्णपणे उडवून लावून मराठ्यांनी औरंगजेबाला पूर्ण निष्प्रभ करून टाकले. हताश अवस्थेत औरंगजेब 1707 मध्ये महाराष्ट्रातच मातीआड झाला. मोगलांनी तत्काळ महाराष्ट्र सोडून दिल्लीची वाट धरली. मोगलांच्या कैदेत असलेल्या छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहूराजे यांची मोगलांनी सुटका केली. शाहू महाराज महाराष्ट्रात यायला निघाले त्यावेळी महाराणी ताराबाई ह्या मराठा सत्तेचे नियंत्रण करीत होत्या. शाहुराजांनी मराठे सरदारांना आपल्याला मिळण्याविषयीची पत्रे पाठवली आणि मराठ्यांमध्ये दोन गट निर्माण झाले.
नंदुरबार भागातील लामकानी येथे शाहूराजे आले तेव्हा ते खरेच शाहूराजे आहेत ह्याची खात्री पटल्यावर परसोजी आणि साबाजी आपल्या पंधरा हजाराच्या सैन्यासह शाहूंना मिळाले. इतर सरदारांची खात्री करण्यासाठी हे उभयता बंधू शाहुराजांसह एका ताटात जेवल्याचा उल्लेख नागपूरकर भोसले यांच्या बखरीत आहे. शाहुराजांना मिळालेले परसोजी हे पहिले मोठे सरदार होते. त्यानंतर अनेक मराठे शाहुराजांकडे दाखल झाले. 1707 च्या ऑक्टोबर महिन्यात शाहूराजे व ताराराणी यांच्या सैन्यात खेड येथे लढाई झाली. ह्यावेळी परासोजींनी आपल्या सैन्यासह ताराराणींच्या सैन्यावर चाल केली. ऐनवेळी धनाजी जाधवही शाहुराजांच्या पक्षात मिळाले व ताराराणीचे सैन्य पराभूत झाले. अखेर दोन्ही पक्षात समझोता होऊन सातारा व कोल्हापूर अशा दोन छत्रपतींच्या गाद्या निर्माण झाल्या.
शाहू महाराजांनी परसोजींचा 1708 मध्ये आपल्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी मोठा बहुमान केला. त्यांचे सेनासाहेबसुभा हे पद व वर्हाड-गोंडवन प्रांताचा अंमल कायम करून त्यांना वंशपरंपरेची सनद दिली. वराड, गोंडवन प्रांतासह गाविल, नरनाळा, माहूर, पवनार, कळंब इत्यादी महाल ह्या प्रदेशात सामील होते. राजाराम महाराजांच्या काळात परसोजींनी मोगलांशी लढून त्यांचा मुलुख खजिना लुटून स्वत;चे सैन्य उभारले होते. आता छत्रपतींचा आदेश मिळताच ते मिळालेला प्रांत अमलाखाली आणायच्या उद्योगास लागले. 1709 मध्ये शाहू महाराजांना भेटून परत जाताना सातार्याजवळ खेड माहुली येथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांची समाधी खेड माहुली येथे बांधली गेली व त्यांचे पुत्र कान्होजी यांच्या विनंतीवरून 17010 मध्ये शाहूराजांनी खेड गावातील एक चाहूर जमीन समाधीच्या पूजाअर्चा व दिवाबत्तीसाठी इनाम दिली. परासोजींचे सेनासाहेबसुभा पद व प्रांत कान्होजींना देण्यात आले. परसोजींचे बंधू साबाजी व बापुजी हे फारसे प्रसिद्धी पावले नाहीत. साबाजी हे 1716 तर बापुजी हे 1722 मध्ये निधन पावले. यवतमाळ जिल्ह्यातील भाम हे परसोजी व रुपाजी भोसले यांच्या सुरुवातीच्या वास्तव्याचे ठिकाण होते. हे गाव परसोजींचे काका रुपाजी भोसले यांना मिळाले होते.
सध्या संगम माहुली शेजारीच असलेल्या खेड माहुली ह्या गावात परशुरामेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्याच्या समोर मूळच्या गावठाणाचा स्मशानभूमीचा भाग असून त्यात एक शिवकालीन समाधी आहे. दगडी चौथर्याच्या रुपात असलेली ही समाधी परसोजी भोसलेंची असण्याची शक्यता आहे. त्याकाळच्या बांधकाम शैलीवरून हा अंदाज बांधता येतो पण अजूनही काही ठाम पुरावे मिळायला हवेत. भोसलेंच्या मूळ बेरडी ह्या गावी त्यांच्या मुळपुरुषांची समाधी आहे.
मुद्रा ः श्रीमछिव प्रसन्न परसोजी ॥
No comments:
Post a Comment