छत्रपती शिवाजी महाराज पानिपतच्या युद्धावेळी हयात असते आणि जर त्यांनी त्या संपुर्ण मोहिमेचे नेतृत्व केले असते तर नक्कीच पानिपतचा इतिहासच आज आपण पाहतो त्यापेक्षा शतपटीने वेगळा असता.
मुळातच शिवाजी महाराज युद्धशास्त्रात अत्यंत निपुण व हुशार होते.युद्धभुमीचा प्रदेश,तेथील वातावरण,इतिहास यांची ते खडाणखडा माहिती ठेवत.तसेच ते स्वतः अत्यंत उत्तम व्यवस्थापक होते.
त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात गाजवलेल्या मोहिमा व त्यावरून पानिपतच्या मोहिमेबाबत आपण विचार करू शकतो.
मुळात इतिहासात जर तर ला महत्त्व नसत पण हा प्रश्न उपस्थित झाला व एक चांगले वैचारिक मंथन होण्यासाठी नक्कीच आपण विचार करू शकतो.
मुळात मराठ्यांचे पारड हे अब्दाली व नजीबखान रोहिल्यापेक्षा जड होते.कित्येक आव्हान पेलतही अखेरपर्यंत ऐन युद्धातही मराठ्यांचाच विजय होत होता.पण अनेक मोहिमेवरील कारणे व युद्धातील तात्कालीक कारणांमुळे पारड फिरल व मराठी फौजांना माघार घ्यावी लागली.शिवराय असते तर ही सर्व कारण घडलीच नसती आणि मराठी फौजांचा विजय झाला असता.
पानिपतच्या मोहिमेवर जाताणा लढाऊ फौजेपेक्षा जास्त संख्या असलेले तीर्थयात्रेकरू,मुल,बायका ,बाजारबुणगे हे फौजेसोबत आले.त्यामुळे लष्करावर रसदेबाबत नेहमीच ताण असायचा. जेव्हा रसद पुरवली जायची त्यातला मोठा हिस्सा या बाजारबुणग्यांना जायचा.परिणामी लढाऊ सैनिक व युद्धात उपयोगी पडणार्या जणावरांनाही पुरेसे अन्न मिळायचे नाही. दिल्लीला असताणा मोठा दुष्काळ फौजेला सहन करावा लागला व पानिपतच्या युद्धापुर्वी तब्बल तीन आठवडे लष्कर उपाशी होते.परीणामी ऐन युद्धामध्ये दक्षिणायनामुळे जेव्हा सुर्याची किरणे थेट आपल्या सैनिकांच्या डोळ्यात जाऊ लागली तेव्हा सैनिक व जनावरे चक्कर खाऊन पडू लागले. तसेच युद्धापुर्वीही अनेक सैनिक जणावरे पराकोटीच्या उपासामुळे मेले.परंतू जर पानिपतच्या मोहिमेचे नेतृत्व शिवरायांजवळ असते तर महाराजांनी असे निरुपयोगी ,लष्कराच्या रसदेवर ताण निर्माण करणारे आणि मोहिमेच्या वेगात संथपणा आणणारे बाजारबुणगे सोबत घेतलेच नसते.परिणामी अन्नधान्य लढाऊ सैनिकांना व्यवस्थित पुरले असते व मराठ्यांच्या मोहिमेची ओळख असणारे 'जलदपणा' व वेगवाण हालचाली हे वैशिष्ट मराठी फौजांना साध्य करता आले असते. याच्याच जोरावर मराठ्यांनी २७ वर्ष स्वातंत्र्यसंग्राम लढवला आणि बाजीरावांनीही आपल्या वेगवान घोडदळाच्या जोरावर उत्तरेत सर्वत्र विजय मिळवला.फौजेचा वेग वाढून अनेक उद्दीष्ट शिवरायांनी साधली असती व अब्दालीला पराभव पत्करावा लागला असता.
ज्यावेळेस मराठ्यांनी कुंजपुरा किल्ला जिंकला तेव्हा हजारभर अफगाणी गुलाम मुल मराठी फौजांच्या हाती लागली.विठ्ठलराव विंचुरकरांनी ती मुल आपल्याजवळ काही काम करण्यासाठी ठेवली.ऐन युद्धात जेव्हा अब्दाली पिछाडीवर जात होता तेव्हा याच गुलाम मुलांनी बुणगाईत हैदोस घालून लष्कराची मागील बाजू अस्थिर केली व यामुळे मराठ्यांचे नुकसान झाले पण अशा अफगाणी गुलाम पोरांना ऐन युद्धाच्या धामधुमीत आपल्या लष्करासोबत थोड्याफार कामकाजासाठी घेण्याबाबत शिवरायांनी कधीच परवानगी दिली नसती.
मराठ्यांच्या काही धोरणामुळे उत्तरेतील कोणतेच राजे त्यांच्या बाजुणे रणांगणात उतरले नाही व काही मदतही केली नाही. पण शिवराय असते तर त्यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्ता व उत्तम राजकारणाच्या जोरावर अनेक राजपुत,जाट राजांना आपल्या बाजुने वळवून घेतले असते. एवढेच नव्हे तर सुजा उद्दौलालाही आपल्या बाजुने वळवून घेत शिवरायांनी रसदेचा प्रश्न मिटवला असता व आपली बाजू अधिकाधिक बळकट करत विजय मिळवला असता.
उत्तरेतील पानिपतच्या मैदानी व सपाट प्रदेशात गनिमीकाव्याची लढाई करणे फारसे शक्यच नव्हते. त्यामुळे जशी झाली तशीच गोलाचीच लढाई करणे शिवरायांनी पसंत केले असते. पण प्रत्यक्ष युद्धात मराठी फौजांचा तोफखाना प्रमुख इब्राहीम गारदी त्याच्या तोफखान्याच्या जोरावर सुरवातीलाच विजय मिळवत आहे हे पाहून विठ्ठलराव व दमाजी गायकवाडांनी आपल्यालाही विजयाचे श्रेय मिळावे म्हणुन ऐन तोफखाना चालू असताणा आपले घोडदळ पुढे घातले व गोल मोडला.आपल्या बंदुकांसमोर आपलेच सैनिक आलेले आहे हे पाहुन इब्राहीमने तोफखाना बंद केला व या मोठ्या चुकीमुळे हाती आलेला विजय मराठ्यांना सोडावा लागला. शिवरायांचे आपल्या सरदारांवर प्रचंड नियंत्रण होते.त्यांचे नियोजन व शिस्त उत्तम असे.परीणामी शिवरायांच्या नेतृत्वात अशी चुक सरदारांनी केलीच नसती. उलट तेथील परिस्थितीनुसार इब्राहीम गारदीच्या तोफखान्याला प्रोत्साहन देत शिवरायांनी विजय मिळवला असता कारण प्रत्यक्ष युद्धातही सुरवातीलाच इब्राहीमने आपल्या तोफखान्याच्या बळावर समोरील १८००० रोहिल्यापैकी १२००० रोहिल्यांना यमसदनी धाडले व अब्दालीची एक फळीच मोडली होती.
युद्ध चालु असताणाच विश्वासरावांना गोळी लागली आणि सदाशिवराव भाऊ बेभान होऊन लढू लागले आणि पुढे गर्दीत दिसेनासे झाले व मराठी फौजांचे हे पाहून मनोधैर्य खचले आणि हाती आलेला विजय सोडत त्यांनी माघार घेतली.पण शिवराय असते तर त्यांनी अशी परिस्थिती उद्भवुच दिली नसती आणि जरी उद्भवली तरी ती योग्य प्रकारे हाताळून फौजेला विजय मिळवून दिला असता.
जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी सर्वप्रथम नजीबखान रोहील्याचा बंदोबस्त केला असता. कारण त्यानेच अब्दालीला आमंत्रण देऊन पानिपतचे युद्ध घडवले. रघुनाथरावांनी ही गोष्ट जाणली होती पण त्यांना नजीबाचा पुर्णपणे बंदोबस्त करता आला नाही.व पुढे जाऊन सर्व पानिपत घडले.
पानिपतच्या एकवर्षाअगोदरच अब्दाली व नजीबाची वाट दत्ताजी शिंदेनी बुर्हाडी घाटात अडवली होती. तेव्हा होळकर राजपुतान्यात अडकले होते व पेशव्यांचे सैन्य दक्षिणेत निजामाशी लढण्यात अडकले होते.दत्ताजीस कोणतीही मदत न मिळाल्याने ते एकटेच अब्दालीस सामोरे गेले व पुढे त्यांना वीरमरण आले .पण शिवराय असते तर त्यांनी दत्ताजीस नक्कीच मदत पाठवली असती आणि बुर्हाडी घाटातच दत्ताजीने अब्दाली व नजिबास पिटाळून लावले असते आणि परिणामी पुढील पानिपत घडलेच नसते.
१४ जानेवारी १७६१ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत पानिपतचे युद्ध चालले.त्यातील दुपारी २ वाजेपर्यंत मराठे विजयी होत होते. पण पुढे दाक्षिणायन आणि विश्वासरावांना गोळी लागणे यामुळे युद्धाचे पारडेच फिरले. अनेक कारणांमुळे हाती असलेला विजय मराठ्यांना गमवावा लागला.
पण शिवाजी महाराज असते तर आपल्या दैदीप्यमान कर्तृत्वाच्या जोरावर हे पानिपतचे युद्ध त्यांनी नक्कीच जिंकले असते व पुढे अटक आणि पेशावरही ओलांडून शिवरायांनी काबूल,कंदाहार पर्यंत मजल मारत परकीय आक्रमकांना कायमचा धडा शिकवला असता.
पण प्रत्यक्ष युद्धातही सदाशिवराव भाऊ,मल्हारराव होळकर,महादजी,जणकोजी शिंदे,मानाजी पायगुडे,यशवंतराव पवार,इब्राहिम, गायकवाड यांनी प्रचंड पराक्रम गाजवला. स्वतः अब्दालीने मराठ्यांच्या पानिपतावरील पराक्रमाबाबत गौरवोद्गार काढले आहेत.अब्दाली म्हणाला की" जर आमच्या पुराणातील रुस्तुम आणि इस्फिंदार (जसे आपल्या पुराणातील भिम व अर्जुन) हे युद्ध पाहण्यास उपस्थित असते तर त्यांनी त्या दक्षिण्यांचा(मराठ्यांचा) पराक्रम पाहून तोंडात बोटे घातली असती व कराकरा चावली असती". आणि नानासाहेबांकडे मैत्रीसाठी दुतही पाठवला.
अनेक कारण असुनही लक्षावधी मराठे अतुलनीय पराक्रम गाजवत दिल्ली व आपल्या देशासाठी पानिपतावर धारातिर्थी पडले. पुढे युद्धानंतर अवघ्या ९—१० वर्षातच महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी फौजांनी उत्तरेत आक्रमण करून दिल्ली जिंकून त्या नजीब खान रोहिल्याची कबर फोडली आणि पानिपतचे अपयश धुवून टाकले.
या आपल्या गौरवशाली इतिहासातून सदैव आपण प्रेरणा घेतली पाहिजे.

No comments:
Post a Comment