विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 August 2019

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतरसुद्धा, औरंगजेब मराठ्यांना का पराभूत करु शकला नाही?

शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतरसुद्धा, औरंगजेब मराठ्यांना का पराभूत करु शकला नाही?


हेरंब पायगुडे (Heramb Paygude), व्याख्याते व शिवशाहिर

छत्रपती शिवरायांनंतर औरंगजेब मुगल साम्राज्य हिंद महासागरापर्यंत पोहोचवण्यासाठी दक्षिणेत उतरला.छत्रपती संभाजी महाराजांनी त्यास सडेतोड उत्तर दिले.२०० वर्षांची परंपरा असलेली अदिलशाही जवळपास सहा महिन्यात औरंगजेबाने संपवली.गोवळकोंड्याची कुतुबशाही जवळपास एका महिन्यात संपवली.पण काही केल्या मराठ्यांसमोर त्याचा निभाव लागेना. कपटाने संभाजी महाराजांना पकडून हाल हाल करून मारल्यानंतर औरंगजेबास वाटले की आता मराठ्यांचे राज्य संपण्यातच जमा आहे.
याच वेळी प्राप्त परिस्थिती लक्षात घेता येसुबाईंनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला.स्वतःचे पुत्र शाहु महाराज असतानाही राजाराम महाराजांना छत्रपती केले व त्यांना गुप्त मार्गाने दक्षिणेत जाण्यास सांगितले.कारण संपुर्ण राजपरिवार एकत्र ,एकाच ठिकाणी रायगडावर राहणे त्यावेळच्या परिस्थितीनुसार घातक होते.येसुबाईंनी प्रसंगावधान साधून घेतलेला हा निर्णय फार महत्त्वाचा व पुढे उपयुक्त ठरला.
कालांतराने रायगड झुल्फिकारखानाने काबिज केला.राजाराम महाराज दक्षिणेत जिंजीवरून कारभार पाहू लागले.स्वराज्याची राजधानी जिंजी घोषित करून सात वर्ष जिंजीचा किल्ला लढवला गेला.आणि याच काळात संताजी,धनाजी यांनी पराक्रमाचा कळस चढवत, गनिमी काव्याचा वापर करत मुगलांना सळो की पळो करून सोडले.मुगलांचा लाखोंचा लवजामा,अलिशान डेरे,भरणारे बाजार,झडणार्‍या मेजवाण्या अशा विलासी लटांबराचे मराठ्यांच्या धावत्या चपळ घोडदळासमोर काहीच चालले नाही.
याच वेळी राजाराम महाराजांनी वेळकाळ लक्षात घेता एक निर्णायक निर्णय घेतला.शिवरायांनी बंद केलेली वतनवारी पद्धत पुन्हा चालू करत, 'जो जेवढा मुलूख मारेल तेवढा त्याचा' अशीही घोषणा केली.परिणामी मराठी सरदार आपल्या पराक्रमाने मुगलांना हैराण करू लागले.अक्षरशः मराठ्यांनी नर्मदा ओलांडून माळव्यात हैदोस घालण्यास सुरवात केली.
राजाराम महाराजांनी आपल्या राजकारणाने झुल्फिकार खानाला झुलवत ठेवले आणि जवळपास ११ वर्षे औरंगजेबाला टक्कर दिली.
पुढे जिंजी पडली आणि राजाराम महाराज महाराष्ट्रात आले.इ.स.१७०० मध्ये त्यांचे निधन झाले.मराठ्यांचे राज्य बुडवण्यासाठी वेडापिसा झालेला औरंगजेबास त्याचे स्वप्न सत्यात उतरतय असे वाटते न वाटते तोच राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराराणी पर्वताप्रमाणे औरंग्यासमोर उभ्या राहील्या.इ.स.१७०० ते १७०७ मध्ये ताराराणींनी मुगलांशी कडवा संघर्ष केला.त्यांच्या त्यावेळच्या युद्धतंत्रास 'सेफ डिपाॅजिट लाॅकर सिस्टम' असे इतिहासकार ग्रँट डफने म्हण्टले आहे.औरंगजेबास बंगालवरून येणारी रसद मराठे मधल्यामधेच मारू लागले.
तब्बल २७ वर्ष औरंगजेब व त्याचे सैन्य या महाराष्ट्रात मराठ्यांच्या हाहाकाराचा सामना करत होते.आता औरंगजेबाचे सैन्य व सरदार त्याला पार वैतागले.त्याच्या मुलांमध्येही सत्तेसाठी लोभ वाढून अंतर्गत संघर्ष वाढण्यास सुरवात झाली.उभा हिंदुस्थान जिंकण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या औरंगजेबास काही केल्या महाराष्ट्र व मराठी माणूस जिंकता आले नाही.अखेर इ.स.१७०७ ला त्याचा मृत्यू झाला आणि इथल्याच मातीत त्याला गाडले गेले.तब्बल २७ वर्षांचा हा रणसंग्राम मराठ्यांनी जिंकला आणि स्वराज्य अबाधित राखले व पुढेतर या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर झाले.
शिवराय व संभाजी राजेंनंतर हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी राजाराम महाराज,येसूबाई,संताजी ,धनाजी,ताराराणी यांनी त्या त्या वेळेस घेतलेले निर्णय व गाजवलेला दैदीप्यमान पराक्रम उपयुक्त ठरला.
छत्रपती शिवरायांनी प्रत्येक मावळ्याच्या मनामनात आणि येथील मातीतील कणाकणात पेरलेले 'अहद तंजावर तहद पेशावर' राज्य करण्याचे स्वप्न प्रत्येकाच्या डोळ्यासमोर होते.हे राज्य रयतेचे आहे,हे राज्य लोककल्याणकारी आहे अशी शिवरायांनी दिलेली शिकवण लक्षात ठेउन आपली वज्रमुठ बुलंद करत या सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील मर्द मावळ्यांनी हे स्वराज्य अबाधित राखले आणि पुढे वाढवलेही.
शिवरायांचे तेच तेजस्वी विचार आजही आपल्यात जिवंत आहेत.त्या विचारांचे पाईक बनत आपण सदैव कार्यरत राहीले पाहिजे.Image may contain: 5 people

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...