विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 23 February 2020

शंभुपत्नी, महाराणी येसुबाईंच्या नामकरणाचा वास्तव इतिहास नक्की वाचा..!

शंभुपत्नी, महाराणी येसुबाईंच्या नामकरणाचा वास्तव इतिहास नक्की वाचा..! 

 

आँनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
प्राचीन काळासह शिवकाळातही पुरुषप्रधान संस्कृती म्हणजेच पुरूष सत्ता परंपरा असल्याने पूर्वीच्या काळी वंशावळी दर्शिवताना महिलांचा जास्त करुन उल्लेख आढळत नसला तरी, देखील महिलांना आदर- सन्मान दिला जात होता.त्यात अनेक रणरागिनी महिलांची यादी पहायला मिळते, त्याप्रमाणे स्वराज्य निष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांच्या जीवानातील एका घटनेवरुन एक ऐतिहासिक बाबीचा उलगडा होतो की, पिलाजीराजेंनी आपल्या कन्येचे नाव स्वताःच्या आईच्या नावाची म्हणजेच पिलाजीराजेंच्या मातोश्रींच्या "जिऊसाहेब शिर्के" यांच्या आठवणीच्या स्मरणार्थ आपल्या लेकिचे नामकरण “जिऊ” असे केले होते. म्हणूनच महाराणी येसुबाईंचे माहेर कडील नाव “जिऊबाई” असे परिचित झाले होते. परंतु जिऊंचा शंभुराजांशी विवाह झाल्यानंतर राजमाता जिजाऊ साहेब (अज्जस सासु ) यांचे जिऊबाई आशीर्वाद घेत असतानाच राजमाता जिजाऊंनी आपल्या नात सुनेचे नाव बदलत, शंभुराजांची पत्नी अर्थात नातसुनेचा लक्ष्मी रुपात स्वराज्यरूपी घरात मंगलमय प्रवेश झाला या सकारात्मक दृष्टीने रयतेच्या स्वराज्याला आता कायम सुख शांती व यश लाभणार या श्रद्धेतुन जिऊचे "येसु" असे नामकरण केले होते. नाव बदलण्यामागे राजमाता जिजाऊंचा आणखी एक स्पष्ट उद्देशही होता तो म्हणजे स्वताःचे असलेले "जिजाऊ" हे नाव आणि नातसुनेचे असलेले "जिऊ" हे नाव या दोन नावातील असलेला सारखेपणा किंवा साधर्म्य ओळखत राजमातांनी वेळेचा विलंब न लावता लग्नानंतर लगेच नातसुनेचे यशवती या अर्थाने “येसूबाई” असे नामकरण केले होते, ही एक महत्वाची ऐतिहासिक बाब म्हणावी लागेल, असा रंजक इतिहास महाराणी येसूबाई यांच्या नामकरणाचा आहे..ही घटना शिव-शंभुभक्तांना, इतिहासप्रेमींना समजावी या उद्देशाने हा छोटासा लेख..
*शंभुपत्नी महाराणी येसुबाईंवर माहेरकडील शिर्के घराण्यातील वंशज म्हणून एक काव्य करावेसे वाटते.*
शिर्के घराण्याची लेक ती,
शोभे सुन भोसल्यांची..
पिलाजीराजेंची कन्या ती,
अर्धांगिनी शंभुराजांची..
गणोजीराजेंची बहिण ती,
सावली जणू सईबाईची..
नाव-लौकिक हो वाढवती,
धाडसी लेक स्वराज्याची..
शाहूमहाराजांची माता ती,
राजारामांच्या वात्सल्याची..
स्वराज्य राखिले एकहाती, 
छत्रपतींच्या हो विश्वासाची..
रयतेशीच हो जोडली नाती,
स्वप्ने साकारली जिजाऊंची..
होत्या सखी राज्ञी जयती,
प्रेरणा कायम शंभुभक्तांची.. 
लक्ष्मीकांत शिर्के लिहिती,
गाथा महाराणी येसुबाईची..
लेखक :- लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के
( शिर्के घराणे वंशज )
मार्गदर्शक, शंभुसेना संघटना
मौजे पेडगाव,
किल्ले बहादुरगड (धर्मवीरगड)

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...