महाराष्ट्रातील शिलाहार घराणे
भाग 2
उत्तर कोकण आणि कोल्हापूर-सातारा या जिल्ह्यांतील प्रदेशांवर राज्य करणारे शिलाहार आपले वर्णन ‘तगरपुरवराधीश्वर’ असे करतात. तेव्हा ते मूळचे तगरनगराहून आले होते, हे उघड आहे. हे तगर मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर होय, हे आता निश्चित झाले आहे. ह्याचा उल्लेख महत्त्वाची बाजारपेठ म्हणून टॉलेमी याच्या ग्रंथात आणि पेरिप्लस ऑफ द एरीथ्रीअन सी या प्राचीन ग्रीक ग्रंथात येतो. शिलाहार कानडी-भाषी होते असे दिसते कारण त्यांच्या ताम्रपटात राजांनी धारण केलेली ‘मलगलण्ड’, ‘गण्डरगण्ड’, ‘विल्लविडेङ्ग’ यांसारखी कानडी बिरुदे आढळतात.
उत्तर कोकणच्या शिलाहार घराण्याचा मूळ पुरुष पहिला कपर्दी (कार. सु. ८००–८२५) याने राष्ट्रकूट सम्राट तिसरा गोविंद याला उत्तर कोकणात राष्ट्रकुटांची सत्ता पसरविण्यास मदत केली असावी म्हणून गोविंदाने तो प्रदेश जिंकल्यावर येथे मांडलिक म्हणून कपर्दीची नेमणूक केली. उत्तर कोकणाला त्याच्या नावावरून ‘कपर्दिद्वीप’ किंवा ‘कवडीद्वीप’ म्हणत. हे घराणे उत्तर कोकणात सु. ८०० पासून १२६५ पर्यंत म्हणजे सु. साडेचारशे वर्षे राज्य करीत होते. तेथे यांच्या सोळा पिढ्या झाल्या.
कपर्दीनंतर तिसऱ्या पिढीतल्या वप्पुवन्न राजाच्या (कार. सु. ८८०–९१०) काळात राष्ट्रकूट सम्राट द्वितीय कृष्ण याने ठाणे जिल्ह्याचा उत्तर भाग मधुमती (मुहम्मद) या मुसलमान सामंताच्या ताब्यात दिला. तेथे त्याच्या तीन पिढ्या राज्य करीत होत्या. त्यांची राजधानी संयान (डहाणू तालुक्यातील संजान) येथे होती. ही दोन्ही घराणी राष्ट्रकूट सम्राटांचीच मांडलिक होती पण त्यांच्यात वारंवार खटके उडत, असे दिसते. इ. स. ९७४ मध्ये झालेल्या राष्ट्रकुटांच्या पतनानंतर शिलाहार अपराजिताने त्यांचा उच्छेद करून त्यांचा प्रदेश खालसा केला.
हे घराणे शेवटपर्यंत राष्ट्रकूट सम्राटांशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या पतनानंतर अपराजिताने (कार. सु. ९७५–१०१०) उत्तरकालीन चालुक्य सम्राट तैलपापुढे मान न वाकवता आपल्या स्वातंत्र्याच्या निदर्शक अशा ‘पश्चिमसमुद्राधिपति’ आणि ‘मांडलिकत्रिनेत्र’ अशा पदव्या धारण केल्या. पुणक (पुणे), संगमेश्वर व चिपळूण जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याची सीमा दक्षिण कोकणात व घाटावर नेली. त्याच्या ताम्रपटात त्याच्या राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत : उत्तरेस लाट (दक्षिण व मध्य गुजरात), दक्षिणेस चंद्रपूर (गोव्यातील चांदोर), पश्चिमेस समुद्र व पूर्वेस यादव भिल्लमाच्या खानदेशातील राज्यापर्यंत. त्याने माळव्याचा परमार नृपती सिंधुराज याच्या च्छत्तीसगडातील स्वारीत आपला पुत्र पाठवून त्यास साहाय्य केले होते, असे पद्मगुप्ताच्या नवसाहसांकचरित काव्यावरून दिसते.

No comments:
Post a Comment