महाराष्ट्रातील शिलाहार घराणे
भाग 3
चालुक्यांना अपराजिताचे सामर्थ्य सहन होणे शक्य नव्हते. तैलपाचा पुत्र सत्याश्रय ह्याने त्याच्या प्रदेशावर स्वारी करून त्याला त्याच्या पुरी राजधानीत कोंडले. कर्नाटक कवी रन्न म्हणतो, ‘एका बाजूस सत्याश्रयाची सेना व दुसऱ्या बाजूस समुद्र यांच्या कैचीत सापडल्यामुळे अपराजिताची अवस्था जिची दोन्ही टोके जळत आहेत, अशा काठीवरील किड्यासारखी झाली’. नंतर शिलाहारांना चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले पण ते परमार भोजाला सहन न होऊन त्याने उत्तर कोकणावर स्वारी करून शिलाहार अरिकेसरी ऊर्फ केशिदेव याचा पराभव केला. त्यानिमित्त त्याने इ. स. १०२० मध्ये दिलेले दोन ताम्रपट सापडले आहेत.
अपराजितानंतर त्याचे छित्तराज, नागार्जुन व मुम्मुणिराज असे तीन पुत्र एकामागून एक गादीवर आले. छित्तराजाच्या कारकिर्दीत कदंब नृपती षष्ठदेव याने कवडीद्वीप जिंकले. तसेच कोल्हापूरच्या गोंक राजानेही अपराजिताचा पराभव करून ‘कोंकणाधिपति’ अशी पदवी धारण केली. छित्तराजाने अंबरनाथ येथील शिवालय बांधण्यास प्रारंभ केला. ते मुम्मुणीने पूर्ण केले. तेथे त्याचा सन १०६० चा शिलालेख सापडला आहे.
मुम्मुणीच्या कारकिर्दीत शिलाहार आणि कदंब यांचा वैवाहिक संबंध जळून आला. मुम्मुणीने (कार. सु. १०४५–७०) कदंब द्वितीय षष्ठदेव याचे स्वागत करून त्याला आपली कन्या अर्पण केली. मुम्मुणीच्या नंतर गूहल्लाने उत्तर कोकणावर स्वारी केली. यात त्याला कोणा एका मुसलमान अधिपतीचे साहाय्य झालेले दिसते. त्याने देश उद्ध्वस्त करून देवब्राह्मणांचा छळ केला पण पुढे नागार्जुनाचा मुलगा अनंतदेव याने यवन आक्रमकांना हाकून लावले.
अम्रेश्वर मंदिराच्या भिंतीवरील शिलाहारकालीन शिल्पे, अंबरनाथ, जि. ठाणे.
अनंतदेव (सु. १०७०–१११०) ह्याच्या कारकिर्दीत अखेरीस कदंब दुसरा जयकेशी याने पुन्हा उत्तर कोकणावर स्वारी करून तेथील राजाला ठार केले आणि तो प्रदेश आपल्या राज्यात सामील केला. इ. स. ११२५–२६ च्या नरेंद्र येथील शिलालेखात जयकेशीचा ‘कवडीद्वीपाधिपति’ म्हणून उल्लेख आहे पण पहिल्या अपरादित्याने लवकरच आपल्या देशाला कदंबांच्या मगरमिठीतून सोडविले.
अपरादित्याने दूरच्या काश्मिरातही तेजःकंठ यास आपला वकील नेमले. तेथे त्याने याज्ञवल्क्यस्मृतीवरील अपरादित्याच्या अपरार्कानामक टीकेचा प्रचार केला.
यानंतरचा उल्लेखनीय शिलाहार नृपती मल्लिकार्जुन (कार. सु. ११५५–७०) हा होय. याच्या कारकिर्दीत गुजरातच्या चालुक्य कुमारपालाने कोकणावर स्वारी करून मल्लिकार्जुनाला ठार मारले आणि कोकण प्रदेश आपल्या राज्यास जोडला पण दुसऱ्या अपरादित्याने (कार. सु. ११७०–९५) तो परत मिळवून ‘महाराजाधिराज’ व ‘कोंकणचक्रवर्ती’ अशा स्वातंत्र्यनिदर्शक पदव्या धारण केल्या.



No comments:
Post a Comment