विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

दत्ताजी शिंदे :— भाग 3

दत्ताजी शिंदे :—
भाग 3क्यूं पाटील और लढोगे....' 'क्यूं नही ...
यावेळीं दत्ताजी मागें अबदाली व पुढें रोहिले अशा कैचींत सांपडला होता. जर मागें सरुन तो जयपूरकडे वळता तर प्रसंग टळता; परंतु मागें सरणे त्या शूर पुरुषास आवडेना. त्यानें जनकोजी व कबिले यांनी दिल्लीस पाठवून, शुक्रताल सोडून कुंजपुर्‍यास यमुना उतरुन अबदालीची गांठ घेतली, व त्या दिवशीं त्याचा पराभव केला (२४ डिसेंबर). परंतु लागलीच अबदाली कुंजपुर्‍यास यमुनापार होऊन नजीब, सुजा व अहंमद बंगश यांस मिळाला. याप्रमाणें एकंदर सर्व मुसुलमान एक झाले व दत्ताजी एकटा पडला. हें समजल्यावर मल्हाररावास त्याच्या मदतीस जाण्याबद्दल पेशव्यांनी अनेकदां हुकूम पाठविले, परंतु तो मुद्दामच जयपूरकडे रेंगाळत राहिला. तसेच पेशव्यांकडून मदत मिळेना परंतु माघार घ्यावयाचीच नाहीं या वाण्याने दत्ताजीनें लढायचे ठरवले . शेवटी दत्ताजी दिल्लीस येऊन (जाने. १७६०) जनकोजीस मिळाला. तेव्हांहि जनकोजीनें व पदरच्या सर्व मंडळीनें त्याला परत फिरण्याचा सल्ला दिला पण अपेश घेऊन श्रीमंतांस काय तोंड दाखविणें, असें म्हणून त्यानें तो नाकारला. नंतर युद्धाचा मुकाबला निश्चित करुन, पार होण्यासाठीं यमुनेचा ठाव पहातां तो लागेना व गिलच्यांचे लोक तर उलट नदी उतरुन अलीकडे येऊन हल्ले करुं लागले हें पाहून दत्ताजी चिडला. शेवटी संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वाटून, तयारी करुन हत्ती यमुनेंत घालून व त्यांच्या पायांत अंदू घालून, तीन घटका दिवसास दत्ताजीने गिलच्यांशी युद्ध सुरु केलें (१० जानेवारी १७६०). गिलच्यानें आपल्या तोंडावर असलेल्या जानराव वाबळे, बयाजी शिंदे व गोविंदपंत बुंलेदे या सर्वांनां मागे रेटून यमुना उतरुन व पांच घटकांत पांचशें मराठे ठार मारुन थेट जरीपटक्यावरच चाल केली. तेव्हां सर्वत्र धुंद झाली. गिलच्यांच्या तोफांचा व बंदुकांचा मारा फार होऊ लागला. तेव्हां जिवाची तमा सोडून उभयतां पाटीलबावा निशान बचावण्यासाठी झोंबू लागले. जागा फार अडचणीची, नदीतीर, शेरणीची बेटे; त्यांत मराठे अडकले. हत्तीवरील आठवी घटका वाजली. तो जनकोजीच्या दंडास गोळी लागून तो बेशुद्ध झाला. तें पहातांच दत्ताजीने जोरानें गिलच्यांवर घोडे घातले. इतक्यांत यशवंत जगदळे पडला. त्याचें प्रेत काढण्यास दत्ताजी गेला, तों उजव्या बरगडींत गोळी लागून तो घोड्याखाली आला. त्यावेळीं अबदालीकडील शहानें त्याला विचारिलें कीं, 'पटेल, हमारे साथ लढेंगे?' त्यास त्या शूर पुरुषाने उत्तर दिलें कीं, " बचेंगे तो औरभी लढेंगे". परंतु याच वेळी त्याचा प्राण निघून गेला. ही बदाऊंघाटाची लढाई होय.
मराठ्यांच्या इतिहासांत जे हृदयद्रावक व शौर्याचे प्रसंग घडले, त्यांपैकीं दत्ताजीचा हा प्रसंग होय. शिंदे घराण्यांत दत्ताजी, जनकोजी, जयाप्पा, महादजींसारखे एक एक पुरुष मराठी साम्राज्याचे अभिमानी होऊन गेले.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...