विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 5 April 2020

नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती भाग 5





नागपुरच्या रघुजी महाराज भोसले यांचेबाबत माहिती
भाग 5
नागपूरची भरभराट १७५० साली झाली. याच काळात तेलंगखेडीची विस्तीर्ण बाग श्रीमंतांनी विश्रांतीसाठी बांधली. तेथे एक पुष्करणी असून मागे एक छोटे विश्रांती स्थान आहे. पलीकडे पाळ बांधून तलाव तयार केला आहे. श्रीमंतांनी बांधलेली दगडी भिंत, प्रवेशद्वार, ओवऱ्या, बगिच्यातील चौकोनी ओटे (काळ्या पाषाणाचे व सुशोभित) आजही शाबूत आहेत. १८११ साली पेंढाऱ्यांनी या बागेची नासधूस केल्याचा उल्लेख सापडतात. अंबाझरी ते तेलंगखेडी हे नागपूरचे सौंदर्यच आहे. याच बागेच्या उत्तरेस (महालात) श्रीमंत द्वितीय रघुजी महाराजांच्या मातोश्री राणी चिमाबाईसाहेब यांनी कल्याणेश्वर देऊळ १७९४ साली बांधले. मंदिरास असलेली त्यावेळची तटबंदी अजूनही शाबूत असून प्रवेशद्वार प्रशस्त आहे. श्रावणी सोमवारी व महाशिवरात्रीस येथे शिवभक्तांची गर्दी असते. उत्तरेस एका टेकडीवर हनुमंताचे प्रेक्षणीय मंदिर असून त्यास तेलंगखेडीचा मारोती म्हणतात. जेथे शाळा आहे तो मुळात श्रीमंत महाराणीसाहेब बाकाबाईचा वाडा होय.
नागपुरात जी टेकडी दिसते तो सीताबर्डीचा किल्ला होय. शितलाप्रसाद व बद्रीप्रसाद नावाचे दोन गवळी राजे येथे गोंडांच्या आधी राज्य करत. त्याच राजांच्या आद्याक्षरावरून या टेकडीस सितला बद्री-सीताबदरी व पुढे सीताबर्डी, असे नाव पडले असावे. गोंडाच्या वेळी ही टेकडी दुर्लक्षितच होती. भोसले नृपतींनीही येथे किल्ला का बांधला नाही, ते कळतच नाही. जागा मोक्याची होती पण, द्वितीय रघुजी यांनी बाणाचे म्हणजे अग्निबाणाचे कोठार म्हणून एक कौलारू वास्तू येथे उभी केली होती. त्यास बाणाचे परेल म्हणतात. टेकडीच्या पायथ्याशी शुक्रवार तलाव होता म्हणजेच आज जेथे रेल्वे स्टेशन, कॉटन मार्केट, संत्रा मार्केट आहे या जागी तलावाचा व्याप असला पाहिजे. २५ जानेवारी १८२२ साली कर्नल अडम्सने टेकडीचे रूपांतर किल्ल्यात केले. पूर्व व दक्षिण खडक तासून संरक्षक कडे करण्यात आले. १८१७ साली येथे प्रसिद्ध लढाई झाली. त्यास सीताबर्डीची लढाई म्हणतात. १८०३ साली पहिला ब्रिटिश रेसिडन्ट एलफिन्स्टन येथे मुक्कामास होता. राजे नेहमीच शुक्रवार तलावातून नावेने (गायक, वादकांसह) टेकडीवरील गणेश दर्शनास जात असत. राज घराण्यातील मंडळी येथे हवापालट करण्यास येत असत. रेल्वे स्टेशनच्या बाजूने (पूर्व) जो एक पांढरा स्तंभ दिसतो, तेथे उभे राहून १९११ साली इंग्लंडचे राजे पाचवे जॉर्ज यांनी नागपूरकर जनतेला उद्देशून भाषण केले होते. हा किल्ला आज प्रादेशिक सेनेच्या ताब्यात आहे. पायथ्याशी टेकडी गणेश मंदिर व फौजी कचेरीजवळ फौजी मंदिर, अशी दोन मंदिर येथे आहेत. तळ्याच्या पाळीवरील गणपतीचे मंदिर १७८८ सालचे. भोसले राजे गणेशभक्त असल्याने या मंदिरास ग्राम मंदिर म्हणून विशेष महत्त्व आहे. येथील मूर्ती उत्तराभिमुख आहे. जुने देवालय काळाच्या ओघात नष्ट झाले तरी १९४७ साली हरिभाऊ ताम्हणकरांनी देवालयाचा जीर्णोद्वार केला. सेनाधुरंदरांनी श्री सिद्धी विनायकाची मूर्ती नवीन तयार केली. आज हे देऊळ म्हणजे हजारो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असून सभामंडप उत्तम आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात, चतुर्थीस विशेषत: तीळ चतुर्थीस मोठी गर्दी असते. राजाचा गणपतीचे याच तलावात विसर्जन केले जात असे. आजचे हे मंदिर नागपूरची प्राचीन शान आहे, हे मात्र खरे.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...