विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 9 April 2020

महाराष्ट्रातील शिलाहार घराणे भाग 7

महाराष्ट्रातील शिलाहार घराणे
भाग 7Image may contain: sky, outdoor, nature and waterImage may contain: mountain, sky, outdoor and nature

शिलाहार राजा भोज दुसरा आणि त्याने बांधलेले किल्ले

-महावीर सांगलीकर
उत्तर कोकण, दक्षिण कोकण, कोल्हापूर, गोवा, कारवार या भागावर शिलाहार घराण्यातील विविध शाखांनी अनेक शतके राज्य केले. या शिलाहारांचे मूळ स्थान आजच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे होते. हे शिलाहार नागवंशी, कन्नड-मराठी असे द्विभाषिक आणि धर्माने मुख्यत्वे जैन व शैव होते. मराठ्यांच्या आजच्या कुळ्यापैकी शेलार आणि सावंत या शिलाहार घराण्याशी संबंधीत आहेत, त्यामुळे शिलाहार हे मराठाही होते. या राजांची कुळदेवी कोल्हापूरची अंबाबाई, जी त्या काळात पद्मावती देवी म्हणून ओळखली जात असे, होती.

शिलाहारांच्या विविध शाखांपैकी कोल्हापूरचे शिलाहार घराणे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्वाचे मानले पाहिजे. या घराण्याने इसवी सन ९४० ते १२१२ एवढ्या काळात राज्य केले. या घराण्यात एकूण १६ राजे सिंहासनावर बसले. त्यातील शेवटचा राजा भोज दुसरा हा होता.

त्याने ११७५ ते १२१२ या काळात राज्य केले. तो महापराक्रमी आणि धार्मिक होता. त्याने आपल्या हयातीत एकूण १५ किल्ले बांधले. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे असलेले अनेक किल्ले राजा भोज २रा याने बांधलेले आहेत. पुढे या किल्ल्यांचा उपयोग यादव राजांना, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांना झाला.

राजा भोज दुसरा याने डोंगरावरील किल्ल्याबरोबरच एक सागरी किल्लाही बांधला. राष्ट्रकुटांसारखेच शिलाहार राजांकडेही त्यांचे स्वत:चे आरमार होते.

येथे मी या राजाने बांधलेल्या कांही महत्वाच्या किल्ल्यांची ओझरती ओळख करून देत आहे.

पन्हाळा किल्ला: राजा भोज दुसरा याने बांधलेल्या किल्ल्यांमध्ये पन्हाळा हा किल्ला सगळ्यात महत्वाचा आहे. हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येला २० किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला इसवी सन ११७८ ते १२०९ या कालावधीत बांधण्यात आला. सामरिक दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी असलेला हा किल्ला ११९१ पासून राजा भोज दुसरा याची राजधानी बनला. समुद्रसपाटी पासून सुमारे ८५० मीटर उंच असणारा हा किल्ला दक्खनवरील सगळ्यात मोठा किल्ला आहे. इसवी सन १२१० मध्ये देवगिरीचा बलाढ्य यादव राजा सिंघण याने राजा भोज दुसरा याचा पराभव करून हा किल्ला ताब्यात घेतला.

अजिंक्यतारा: साता-याचा अजिंक्यतारा हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे एक हजार मीटर उंच आहे. हा किल्ला शिलाहार राजा दुसरा भोज याने इसवी सन ११९० मध्ये बांधला. पुढे या किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना फारच उपयोग झाला.


कल्याणगड उर्फ नांदगिरी:
हा किल्ला साता-यापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर आहे. हा समुद्रसपाटी पासून सुमारे १०५० मीटर उंच आहे. राजा भोज दुसरा याने बांधलेल्या १५ किल्ल्यांपैकी हा एक आहे. या किल्ल्यावर एक जैन गुफा असून गुफेत पाण्याचे तळे आणि एक शिलाहारकालीन जैन मूर्ती आहे.

विजयदुर्ग: विजयदुर्ग हा शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधलेला समुद्री किल्ला आहे. हा किल्ला देवगड तालुक्याच्या किना-यावर आहे. या किल्ल्यापासून पुढील समुद्रात दहा मीटर खोलीवर १२२ मीटर लांब, सात मीटर जाड व तीन मीटर उंचीची दगडी भिंत आहे. शत्रूची जहाजे या भिंतीला थडकून फुटावीत यासाठी ही भिंत बांधण्यात आली होती.

याशिवाय या राजाने बांधलेले आणखी कांही किल्ले म्हणजे सज्जनगड, विशालगड, रांगणा, भुदरगड, पांडवगड, चंदन-वंदन, वासोटा वगैरे.

पूर्वी राजा भोज दुसरा याचा फारसा उल्लेख होत नसे, पण विजय दुर्ग या किल्ल्याला इ.स. २००६ मध्ये ८०० वर्षे पूर्ण झाल्यापासून या राजाची कांही प्रमाणात दखल घेतली जावू लागली आहे.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...