महाराष्ट्रातील शिलाहार घराणे
भाग 6
इतर प्राचीन भारतीय राजांप्रमाणे शिलाहारांनी धर्म, विद्या व कला यांना आश्रय दिला होता. दक्षिण कोकणच्या रट्टराजाने मध्य भारतातून आलेल्या मत्तमयूर पंथाच्या शैव आचार्यास ग्रामदान दिले होते. इतर शाखेच्या राजांचाही हिंदू व जैन धर्मास आश्रय होता. त्यांनी अनेक देवळे बांधली होती. त्यांतील काही अंबरनाथ, पेल्हार, कोल्हापूर व वाळकेश्वर येथे अद्यापि विद्यमान आहेत. कोल्हापूरच्या शिलाहारांनी महालक्ष्मीच्या पूजेअर्चेकरिता काही दाने दिली होती. तसेच जैन तीर्थंकरांच्या बस्तीकरिताही आणि जैन मुनींच्या योगक्षेमाकरिताही काही भूमी दिली होती.
शिलाहारांचा विद्येसही आश्रय होता. शिलाहार नृपती पहिल्या अपरादित्याने याज्ञवल्क्यस्मृतीवर अपरार्का टीका लिहिली होती. तिचा दूरच्या काश्मिरातही प्रसार झाला. छित्तराजाच्या व त्याच्या भावांच्या आश्रयास असलेल्या सोड्ढलाने उदयसुन्दरीकथा लिहिली होती. तीत शिलाहारांच्या दरबारी असलेल्या जैन व इतर अनेक कवींची नावे उदा., चंदनाचार्य, विजयसिंहाचार्य, महाकीर्ती, इंद्र इ. आली आहेत. जैनेंद्र व्याकरणातील शब्दार्णवचन्द्रिका ग्रंथाचा कर्ता सोमदेव हा कोल्हापूरच्या भोजाच्या आश्रयास होता.
कोल्हापूरच्या शिलाहारांनी बांधलेल्या अनेक मंदिरांपैकी खिद्रापूर (कोप्पेश्वर व ऋषभनाथ) आणि अंबरनाथ (शिव-अम्रेश्वर) येथील मंदिरे वास्तुशिल्पदृष्ट्या प्रसिद्ध आहेत. अंबरनाथ येथील शिवमंदिर हे तारकाकृती विधानाचे असून नागरशैलीतील भूमिज उपशैलीत बांधले आहे. गर्भगृह, अंतराल व सभागृह हे मंदिराचे तीन भाग असून शिखर पडले आहे. कीर्तिमुखे, गजरथ व नरथर हे अधिष्ठानात प्रतीकात्मक दर्शविले आहेत. सभामंडप व अंतराल यांची विताने (छत) समताल व करोटक पद्धतीची कलाकुसरयुक्त असून मधोमध कमळाकृती रचनाबंध आहे. बाहेरील भिंतीवर पूर्वेकडील कोनाड्यात उभी त्रिमूर्ती, उत्तरेकडे महाकाली, दक्षिणेकडे अष्टभुजानृत्या चंडिकादेवी या प्रमुख मूर्ती असून इतरत्र ब्रह्मा, तांडवनृत्यातील शिव, शिवपार्वती, गरुडारूढ विष्णू यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय येथील विलोभनीय शालभंजिका, यक्षी व सुरसुंदरी यांची संभ्रमविभ्रम अवस्थांतील शिल्पे रेखीव, प्रमाणबद्ध आणि कमनीय आहेत.
भिंतीवरील (पश्चिम बाजू) स्त्री-शिल्पे, कोप्पेश्वर मंदिर, खिद्रापूर, जि. कोल्हापूर.
कोल्हापूरच्या आग्नेयीकडील खिद्रापूर गावात असलेले कोप्पेश्वर मंदिर बाराव्या शतकातील असून चालुक्य वास्तुशैलीत बांधले असून त्याचे विधान तारकाकृती आहे. शिखराचे बांधकाम अपुरेच आहे. याच्या अधिष्ठानावर देवतारूढ अशा ९५ हत्तींच्या मूर्ती खोदलेल्या आहेत. बाहेरच्या भिंतींवर शिल्पपट्टांत व तीरशिल्पांत अनेक मूर्ती आढळतात. त्यांत शैवमूर्तींचे प्रमाण जास्त आहे. मूर्ती रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. अष्टदिक्पालांच्या दांपत्य-मूर्ती स्वर्गमंडपात आढळतात. मंदिराच्या भिंतीवरील विविध आकर्षक अवस्थांतील मदनिकांच्या रेखीव शिल्पांतून तत्कालीन केश-वेषभूषा आणि अलंकार यांचे मनोज्ञ दर्शन घडते. या मूर्तिसंभारात आलिंगन-चुंबनापासून संभोगापर्यंतची काही दृश्ये आहेत. त्यामुळे दक्षिणेचे ‘छोटे खजुराहो’ असा त्याचा उल्लेख करतात. दुसऱ्या ऋषभनाथ मंदिरातील श्रुतदेवता लक्षवेधक आहे.
संदर्भ : १. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, पुणे, २००५.
२. मिराशी, वा. वि. शिलाहार राजवंशाचा इतिहास आणि कोरीव लेख, नागपूर, १९७४.

देशपांडे, सु. र.

No comments:
Post a Comment