postsaambhar :ओंकार ताम्हनकर, इतिहास अभ्यासक
बहिर्जी नाईक आणि त्यांचे हेरखाते याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. आणि हाच स्वराज्याच्या हेरखात्याचा विजय आहे.
कोणत्याही राज्याच्या सैन्याची मुख्य फळी म्हणजे त्यांचे गुप्तहेर खाते असते. शिवाजी महाराजांचे हेरखाते इतके गुप्त होते की त्यात नेमकी किती माणसे कामाला होती, त्यांचे दैनंदिन काम काय होते हे आजही न उकललेले गूढ आहे. आज समकालीन कागदपत्रांद्वारे काही मोजक्याचं नावांचा उल्लेख येतो. त्यात विश्वासराव मोसेखोरे,बहिर्जी नाईक-जाधव, सुंदरजी प्रभुजी, वल्लभदास गुजराथी, महादेव माळी इत्यादी नावे आढळतात.
अफजलखान वध, शाहिस्तेखान छापा या महत्त्वाच्या घटनांवेळी विश्वासराव मोसेखोरे हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि मग महाराजांनी बहिर्जी नाईकांना प्रमुख केले.
महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे २ विभाग होते.
१. अधिकृत गुप्तहेर खात्यातील हेर
उदा. - विश्वासराव मोसेखोरे,बहिर्जी नाईक-जाधव,
सुंदरजी प्रभुजी, वल्लभदास गुजराथी, महादेव माळी इत्यादी.
२. परराज्यात जाणारी वकील मंडळी
उदा. सोनोपंत डबीर, त्रंबक सोनोपंत डबीर, रघुनाथ बल्लाळ कोरडे, रघुनाथ बल्लाळ अत्रे, पंताजी गोपीनाथ बोकील, मुल्ला हैदर उर्फ काझी हैदर इत्यादी. परराज्यात बोलणी करायला जाणारी ही मंडळी अगदी उत्तमप्रकारे अतिशय अचूक बातम्या आणत असत.
हेर अत्यंत चाणाक्ष, बुद्धिमान ,हरहुन्नरी असत. महाराजांची लाशजरी व्यवस्था आणि हेर खाते इतके अचूक होते की मोगलांना 'या शिवाजी ला चेटूकच अवगत असले पाहिजे, त्याशिवाय तो असा अचानक, अचूक हल्ले करणार नाही..' असे वाटे. यावरूनच आपल्याला कळून येईल की महाराजांचे हेरखाते किती जबरदस्त होते.
स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून आपले काम चोख बजावणाऱ्या या निधड्या छातीच्या गुप्तहेरांना मानाचा मुजरा!!
धन्यवाद।

No comments:
Post a Comment