विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 26 April 2020

''हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे,असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.''

२७ एप्रिल १६४५
( तारखेमद्धे संभ्रम )

पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते,पण यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सगळ्यांना ते कळकळीने म्हणाले,
''गड्यानो,मी आज तुमहाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यानो,मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का. दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का. आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मारतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते. आणि इतके सोसुनही आपल्या पदरी काय. तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे. दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे. सांगा, तुमीच सांगा वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे का. शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहेरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले.

त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला,"बोला बाळराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत."हो राजे,तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ.मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले,''गड्यानो आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे,सर्वांनी खपायचे,सर्वांनी प्राण अर्पन करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्य' तुमचे ,माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे.परक्यांची गुलामी आता नको. उठा,या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले.


''हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे,असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.'' शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले,ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्यधन्य वाटले. आपण मणी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा,असा विस्वास त्यांना वाटू लागला. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी,डोंगरातील आडमार्ग शोधावे,खिंडी,घाट,चोरवाटा निरखाव्या,आसा त्यांचा नित्यक्रम सुरु झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरने जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे, असे ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले,समुद्राला भरती यावी तसे.शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट,किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारी नजरेने न्याहाळले.चोरवाटा,भुयारे,तळघरे,दारुगोळा,हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली.

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...