विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 26 April 2020

साल्हेरचा_वेढा

🛑#साल्हेरचा_वेढा
इ.स. १६७० मध्ये बागलाण भागात मराठे मोगल संघर्षाने उग्र स्वरूप धारण केले होते. औरंगजेबाने मराठ्यांचा नि:पात करण्यासाठी महाबतखान या महापराक्रमी आणि मातब्बर सरदाराला मुद्दाम दक्षिणेच्या स्वारीवर पाठविले होते. परंतु ऐषारामाची चटक असलेल्या महाबतखानाकडून कसलीही भरीव कामगिरी होण्याचे चिन्ह दिसेना. अहिवंतचा दुर्गम किल्ला जिंकताना महाबतखानाने आपले सारे शौर्य पणास लावले. परंतु किल्ला सर करण्याचे श्रेय शेवटी खानदेशचा सुभेदार दाऊदखान यास मिळाले. त्यानंतर तरी मराठ्यांचा मोड करण्याचे काम महाबतखानाने निष्ठापूर्वक करायला हवे होते. परंतु राजश्रीनी पारनेर (जि. अमहदनगर) येथे तळ ठोकला आणि प्रत्येक दिवस ख्यालीखुशालीत घालविण्यास सुरवात केली. अमीर लोकांकडून जबरदस्तीने त्याने मेजवान्या उपटण्यास कमी केले नाही. औरंगजेबाच्या कानावर ही वार्ता गेली. कोणीतरी तिखटमीठ लावून कळविले की, ’महाबतखान आतून शिवाजीला सामील आहे.’ त्यामुळे बादशाह संतप्त झाला आणि त्याने महाबतखानाला परत बोलविले. त्याच्या जागी आपला "दूधभाऊ" बहादूर कोका? (बहादूर कोकलताश) याला दक्षिणेत पाठविण्याचे ठरविले. बहादूरखानाने बादशहाचे समाधान करताना, ’तुम्ही दिल्लीची पातशाही खुशाल करणे आपण शिवाजीवर जातो त्यास हालखुद ठेवितो, त्याचे लष्कर पातशाही मुलखात न येईल असे करितो. पातशाहांनी फ़िकीर न करावी.’ अशा आशयाचे उदगार काढले अशी नोंद सभासदाने आपल्या बखरीत केलेली आहे.
बहादूरखानाने दक्षिणेत आल्याबरोबर साल्हेरच्या किल्ल्याकडे कूच केले कारण मोगल सेनेने अगोदरच किल्ल्याला वेढा घातलेला होता. परंतू मराठ्यांनी मोगलांची दाणादाण उडविण्यास सुरवात केलीली होती. मोगलांच्या तर्फ़े इखलासखान मियाना मोठ्या शर्थीने मराठ्यांना तोंड देत होता. शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे प्रतापराव गुजर सरसेनापती वरघाटाकडून आणि मोरोपंत पिंगळे कोकणातून साल्हेरकडे आलेले होते. त्यामूळे मोगलांच्या दोन्हीं बाजूच्या फ़ळीवर मराठ्यांना अचानकपणे हल्ला करणे शक्य झाले.साल्हेरला झालेली लढाई घनघोर स्वरूपाची होती. मराठ्यांनी नेहमीच्या गनिमीकाव्या ऎवजी उघडउघड "सुलतान ढवा" करून मोगलांना घेरले होते. या लढाईचे वर्णन करताना सभासद लिहतो, ’चार प्रहर दिवस युद्ध जाहले. मोगल, पठाण, रजपूत रोहीले, तोफ़ाची, हत्ती, उंटे, आरावा घालून युद्ध जहाले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोस औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.’
इतर कोणत्याही लढाईपेक्षा साल्हेरच्या लढाईचा तपशील सभासदाने ब-याच बारकाव्याने दिला आहे. साल्हेरची लढाई मराठ्यांना अभिमानाची आणि प्रतिष्ठेची वाटली असावी कारण मैदानावर समोरासमोर लढाई करून मोगलांचा पराभव करण्यात मराठे या लढाईत यशस्वी झाले. गनिमी कावा हा तर मराठ्यांच्या युद्धशैलीचा खास प्रकार होता. परंतू सामन्याची लढाई देऊन आपण त्यातही मोगलांपेक्षा कमी नाही असे साल्हेरला मराठ्यांनी सिद्ध केले म्हणून "साल्हेरची लढाई" मराठ्यांच्या इतिहात महत्वपूर्ण मानणे आवश्यक आहे.
या लढाईत मोगलातर्फे इखलासखान मियाना, बहलोलखान (बहादूरखान ?), अमरसिंग, त्याचा मुलगा मुहकमसिंग हे मोठ्या त्वेषाने लढत होते. मराठ्यांच्या बाजूचे सेनापती प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव मोहीते, व्यंकाजी दत्ता, रुपाजी भोसले, सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप व गोदोजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ इत्यादी अनेक बिनीचे सरदार लढत होते. सभासदाला या लढाईचा बराच तपशील स्मरणात असावा. त्याने सर्व मराठे वीरांची नावे आठवून यादी दिली आहे.
प्रत्यक्ष युध्दात प्रचंड रक्तपात झाला. रक्ताचे पूर वाहीले. रक्ताचा चिखल झाला. त्यामध्ये हत्ती, घोडे आणि उंट फसू लागले. दोन्ही बाजूची मिळून दहा हजार माणसे मारली गेली. जनावरे किती मारली याची गणनाच करणे शक्य नव्हते.
मोगलांची हानी बरीच झाली. राव अमरसिंग आणि त्याचे काही सहकारी लढाईत ठार झाले. मुहकमसिंग आणि स्वत: इखलासखान जबर जखमी झाला. मराठ्यांची हानीही झाली. सूर्यराव काकड्यासाऱखा तेजस्वी हिरा तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पतन पावला. सभासद लिहीतो, 'सूर्यराव म्हणजे सामन्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याच प्रतिमेचा, असा शूर पडला, परंतू युद्धात अखेर मराठ्यांचा जय झाला, मोगलांचा सारा सरंजाम त्यांच्या हाती आला. १२५ हत्ती व सहा हजार घोडे आणि तितकेच उंट मराठ्याना मिळाले. अलंकार, नाणी, कापडचोपड यांची तर गणतीच नव्हती.
शिवाजीमहाराजांना हे आनंदाचे वृत्त समजल्यावर खबर आणणार्‍या जासूदाना त्यांनी सोन्याची कडी घातली. जे मर्द मराठे जिवाची बाजी लावून लढले त्यांना महाराजांनी अपार द्रव्य दिले आणि त्यांची संभावना केली. दिलेरखान हे युद्ध झाले तेव्हां साल्हेरपासून काही अंतरावर होता. त्याला पराजयाची वार्ता कळताच तो मागच्या मागे पळला.
सक्सेना लिहीतो, 'या युद्धाची वार्ता कळताच बहादूरखान मोठ्या तातडीने बागलाणाकडे रवाना झाला. परंतु तो तेथे जाण्याच्या अगोदर साल्हेरवर जय मिळवून मराठे कोकणात उतरले होते.' बहादूरखान मराठ्यांच्या पाठलागावर निघाला. त्याची हिंमत कुठपर्यंत आहे हे महाराज जाणून होते.त्याच्या विषयी त्यांनी उद्गगार काढले 'बहादूरखान पेंडीचे गुरू आहे त्याचा गुमान काय आहे?

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...