विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 22 April 2020

सखी राज्ञी जयती

री
सखी राज्ञी जयती संभाजी राजांचा इतिहास वाचताना किंवा ऐकताना आपल्या अंगावर रोमांच उभा राहतात.त्यांचा पराक्रम ,त्यांचा प्रखर असा स्वाभिमान ,राष्ट्रभक्ती हे सगळे पाहिले की उर कसा भरून येतो.पण या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्या मागे असलेली मानसिक ताकद कोणाची होती याचा विचार केला की नावे प्रकर्षाने समोर येतात.ते म्हणजे छत्रपतीशिवाजीमहाराज ,जिजाऊ साहेब आणि महाराणी येसूबाई.
खरे तर येसूबाई बद्दल फारसे इतिहासात लिहिले गेले नाही पण अगदी जिजाऊ साहेब आणि ताराबाई यांच्या इतकेच त्यांचेही खूप मोठे कार्य आहे.अनेक परस्पर विरोधी घटना ,प्रचंड असा संघर्ष अशा अनेक अद्भुत घटनांनी येसूबाई चे आयुष्य भरलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजानी श्रुंगारपूर वर स्वारी करून सूर्यराव सुर्व्यांचा पराभव केला. अनेक वेळी स्वराज्य विरोधी भुमिका घेणाऱ्या सुर्व्यांची मसनद उडवून लावली आणि त्याच स्वारीत सुर्व्यांचे कारभारी पिलाजीराव शिर्के महाराजांच्या सेवेत आले.याच पिलाजीरावांची कन्या म्हणजे येसूबाई. त्यांचे माहेरचे नाव होते जीउबाई. पिलाजी रावांची अतिशय लाडकी असलेली ही चुणचुणीत जिऊ शिवरायांच्या मनात भरली आणि त्यांनी आपले पुत्र संभाजी राजे यांच्यासाठी पिलाजी राजाकडे मागणी घातली.आपली एक मुलगी पिलाजीरावांच्या गणोजी नामक मुलाला देऊन महाराजानी हा विवाह घडवून आणला.शीर्क्या ची जिऊ छत्रपतींची सुन म्हणून येसूबाई नावाने रायगडावर आली.हा विवाह साधारण 1665-66 साली झाला.त्यावेळी येसूबाई चे वय पाच किंवा सहा वर्षाचे असावे.
खरे तर येसूबाई चे नशीब खूप मोठे होते. प्रचंड पराक्रमी असे सासरे,ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य घडले अशा आजे सासु आणि हेवा वाटावा असा संभाजी सारखा नवरा.पण हे सर्व असतानाही त्यांना आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना तोंड द्यावे लागले.
यातील पहिला प्रसंग तर अगदी लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्षातच घडला.औरंगजेबाने छत्रपती आणि संभाजी महाराजांना आग्ऱ्यामध्ये नजरकैदेत टाकले.महाराजानी आपल्या हुशारीने त्या कैदेतून सुटका करून घेतली आणि वापस येताना संभाजी महाराजांना मथुरेत ठेवून महाराज एकटेच परतले.शत्रूचे लक्ष विचलित करण्यासाठी महाराजानी संभाजी महाराज वारल्याची अफवा उठवून दिली आणि ती खरी वाटावी म्हणून अगदी त्यांचे दिवसही घातले .त्यावेळी सात आठ वर्ष वय असणाऱ्या येसूबाई वर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पनाही करवत नाही. पुढे शंभुराजे सुखरूप परत आले हे सगळे खरे पण अशा सगळ्या प्रसंगातून ,जिजाबाई आणि छत्रपतींच्या मार्गदर्शनातुन येसूबाई चे एक कणखर व्यक्तिमत्व तयार होत होते हे माय्र खरे. कदाचित पुढे आयुष्यात येणाऱ्या अनेक कठीण प्रसंगांना तोंड देता यावे म्हणून नियतीची अशी योजना असावी.त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा प्रसंग आला.तो म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक.अवघ्या महाराष्ट्राचे भवितव्य बदलणारा हा प्रसंग. महाराज छत्रपती झाले ,शंभुराजे युवराज झाले आणि येसूबाई या अधिक्रुत पहिल्या युवराज्ञी झाल्या.
हा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राचे भविष्य बदलणारा प्रसंग होता आणि येसूबाईंच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा प्रसंग होता.या नंतर मात्र त्यांचे खरे राजकीय शिक्षण सुरू झाले. कारण राज्यभिषेका नंतर काही दिवसानी लगेच जिजाऊंसाहेबांचे निधन झाले आणि साहजिकच फडावरचा कारभार जो मातोश्री जिजाऊपाहत होत्या ही जबाबदारी युवराज्ञी म्हणून येसूबाई कडे आली.
प्रत्यक्ष छत्रपतींच्या सोबत राहून कारभार कसा करायचा हे भाग्य येसूबाईना लाभले आणि मग त्यातून त्यांचे व्यक्तिमत्व , खंबीर पणे निर्णय घेण्याची शक्ती ,निरीक्षण करून गोष्टी आकलन करण्याची कला ,माणसे ओळखण्याची क्षमता ,प्रजेची काळजी, दुरद्रुष्टीपणा ,संकटात ही धीर न सोडण्याची व्रुत्ती हे सगळे गुण विकसीत झाले. छत्रपतींनी त्यांना स्वतःचा 'श्री सखी राज्ञी जयती ' असा शिक्का कारभार करण्यासाठी त्यांना करून दिला होता. कदाचीत पुढील आयुष्यात त्यांच्यावर जे अतिशय भयानक प्रसंग येणार होते त्यासाठी त्यांना तयार करण्याची ही नियतीची योजना असावी.अशा कठीण प्रसंगाची सुरुवातही लगेच झाली.
राज्यभिषेकानंतर 1676 साली महाराज दक्षिण दिग्विजयाकरिता निघाले.जाताना महाराजांनी संभाजीराजांना कोकणचा कारभार सांगितला.त्यासाठी संभाजी महाराज आणि येसूबाई श्रुंगारपूर येथे राहिले.त्यावेळी शंभुराजे आणि मंत्री मंडळ यांच्या मध्ये काही निर्णयावरुन वाद झाले आणि त्यांच्या कडे झालेली दुर्लक्ष , मंत्र्यांची मनमानी याला कंटाळून संभाजी महाराजानी दिलेरखाना कडे जाण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला.त्यावेळी येसूबाई गरोदर होत्या. काय अवस्था झाली असेल त्यांच्या मनाची .अवघडलेली अवस्था ,संभाजी राजांच्या जीवाची चिंता जवळ दुसरे विश्वासाचे कोणी नाही पण हाही प्रसंग त्यांनी आपल्या कणखर शांततेने निभावून नेला.त्याच वेळी त्यांना भवानी नावाची मुलगीही झाली. महाराष्ट्राचे नशीब थोर की संभाजी राजेही सुखरूप महाराष्य्रात परत आले. येसूबाई ही भवानीसह रायगडी आल्या परंतु संभाजी राजे अद्याप पन्हाळा किल्ल्यावरच होते. त्यातच महाराज आजारी पडले.काही दिवसातच महाराजांचे निधन झाले. गडावरील वातावरण बदलले होते. अणाजीपंत ,मोरोपंत संभाजी महाराजांच्या विरुध्द झाले होते संभाजीराजांना छत्रपतींच्या निधनाची खबरही कळवण्यात आली नव्हती उलट त्यांना अटक करण्याची तयारी चालू होती. कसे तोंड दिले असेल येसूबाईनी या सगळ्या प्रसंगाला?. पुढे नशिबाने संभाजी राजे आपल्या हुशारीने बंड मोडून काढून रायगडावर आले आणि त्यांनी राज्यभिषेक करून घेतला आणि येसूबाई स्वराज्याच्या अधिक्रुत महाराणी झाल्या. पण आता कारभार सोपा नव्हता. औरंगजेब पाच लाख सेना घेऊन महाराष्ट्रावर चाल करून येत होता, संभाजी राजे नुकतेच राजे झाले होते, अजून राज्य स्थिर होत नव्हते. फंदफितुरी आणि अविश्वास यमुळे संभाजी राजे संतप्त होत होते आणि हा जळता निखारा त्यातील पराक्रमाचा दाह विझु न देता सईबाईना आपल्या पदरात सांभाळायचा होता. प्रचंड अवघड काम आता सुरू झाले होते.औरंगजेबाला तोंड देण्यासाठी संभाजी राजे कायम मोहिमा मध्ये गुंतले होते. राजधानीच्या कारभार येसूबाई पाहत होत्या. सततच्या लढाया, शत्रू पक्षाकडून सतत झालेल्या नुकसाना मुळे कमी झालेला महसूल, येणारे जाणारे व्यापारी, निरनिराळे दूत या सगळ्या गोष्टीना संभाजी महाराज नसताना येसूबाई ना तोंड द्यावे लागत होते आणि हे सर्व त्या समर्थपणे सांभाळत होत्या. यातच 1682 मध्ये त्यांना पुत्र रत्न झाले. या मुलाचे नाव त्यांनी शाहू असे ठेवले. यावेळी त्यांच्या सोबत गडावर जवळची व्यक्ती म्हटली तर फक्त राजाराम होते. त्यांना मात्र येसूबाई नी आपल्या सोबत घेतले आणि मूळचे नाजूक तब्येतीचे राजाराम महाराज राजकारणात तयार होऊ लागले. यातच येसूबाचे भावविश्व उधळून टाकणारी घटना घडली.दगा करून औरंगजेबाने संभाजी राजांना पकडले आणि त्यांची निर्घुन हत्या केली. त्यातच या सगळ्या प्रसंगामध्ये गणोजी शिर्के दोषी आहेत हे कळाल्यावर येसूबाई ची काय मानसिक अवस्था झाली असेल. कुठल्याही स्त्रीला आपले माहेर प्राणप्रिय असते पण इथे तर सगळे उलटे झाले होते. पण येसूबाईना दुःख करायलाही वेळ नव्हता. शत्रू ने रायगडाला वेढा घातला होता. संपूर्ण राजमंडळ पर्यायाने स्वराज्य धोक्यात आले होते आणि यावेळी त्यांना छत्रपती बरोबर झालेल्या शिक्षणाचा फायदा झाला. स्वतः पेक्षा राज्य महत्वाचे हे लक्षात घेऊन त्यांनी योजना आखली.प्रसंगी दोन पाऊल मागे घ्यायचे हे त्या महाराजांकडे शिकल्या होत्या.झुल्फीकार खानाने गडाला वेढा घातला होता. सर्व राज कुटुंब एकत्र राहणे धोक्याचे होते. येसूबाईनी राजाराम महाराजांशी चर्चा करून त्यांना गडावरून सुटून जिंजी कडे जाण्यास सांगितले व तेथून लढा चालू ठेवण्यास सांगितले कारण लढाई साठी राजा शिल्लक राहणे गरजेचे होते आणि त्या स्वतः मुघलांच्या स्वाधीन झाल्या. राजाराम महाराज, ताराबाई ,राजसबाई काही मुत्सद्दी जिंजी कडे सुटून गेले आणि येसूबाई, छत्रपतींच्या एक पत्नी सकवार बाई , येसूबाई ची मुलगी भवानी पुत्र शाहू हे सगळे मुघलांच्या ताब्यात गेले. येसूबाई चे खरे मोठेपण येथे दिसून येते. स्वतः शत्रूच्या ताब्यात जाऊन दिराला राजा घोषित करून त्यांना सुटका करून पाठवून द्यायला खरी हिंमत लागते.खरे तर त्यांच्या या खेळीने औरंगजेबाचा सगळा डावच उधळून लावला.
बघता बघता महाराष्ट्र जिंकू असे स्वप्न बघणाऱ्या औरंगजेबाला ही जबरदस्त चपराक होती ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नव्हती आणि या खेळीने त्याचे नुसते स्वप्नच उधळले नाही तर पुढे अजून 18 वर्ष त्याला इथेच वणवण फिरावे लागले आणि शेवटी निराश मनाने त्याला याच मातीत स्वतः ला गाडून घ्यावे लागले.
पण आता येसूबाई चे जीवन अवघड होते. अत्यंत हिंसक आणि घाणेरड्या व्रुत्तीण्च्या मुघलांपासून त्यांना स्वतः चा, शाहू, भवानी सकवार बाई या सर्वाना सुरक्षित राखायचे होते. इथे आवश्यक होता तो संयम आणि कणखर व्रुत्ती. अतिशय हुशारीने येसूबाईंनी औरंगजेबाची मुलगी झीनत यांच्याशी संबध वाढवले कारण झीनत बेगमचा औरंगजेबवर बराच प्रभाव होता. ही कैद किती काळ चालल माहीत नव्हते.औरंगजेबाने या सर्वांची व्यवस्था आपल्या गूलालबार नावाच्या तंबू शेजारीच केली होती. 1689ते 1707 अशी अठरा वर्ष औरंगजेबाच्या फौजे बरोबर येसूबाईना फरफटत काढावी लागली.जिकडे मोहीम तिकडे त्यांना जावे लागे .अगदी वेड लागायची पाळी होती. शत्रूच्या गराड्यात त्या एकट्या होत्या तरीही ही रणरागीणी घाबरली नव्हती. याही काळात त्यांनी शाहूराजे आणि भवानी वर खुप चांगले संस्कार केले. भवानी चे लग्न याच काळात त्यांनी तराळे येथील महाडीक यांच्या घराण्यात लावून दिले. 1703 साली तर एक कठीण प्रसंग उभा राहिला .औरंगजेबाने शाहू महाराजांना मुस्लिम करण्याचा घाट घातला. अत्यंत निग्रहाने येसूबाई आणि शाहू महाराजानी यास विरोध करून हा प्रयत्न हाणून पाडला.काय काय डावपेच लढवले असतील येसूबाईनी नुसता विचार केला तरी अंगावर काटा येतो कारण समोर राजकारण निपुण, कूटनीती तद्न्य असा औरंगजेब होता पण येसूबाई त्यालाही पुरून उरल्या. सततच्या मोहिमेने आणि प्रवासाने मात्र त्यांचे खुप हाल झाले. राजाराम महाराज, धनाजी जाधव संताजी घोरपडे यांनी त्यांच्या सुटकेसाठी केलेले प्रयत्न ही अयशस्वी ठरले. तरीही येसूबाई निराश झाल्या नाहीत.1707 साली औरंगजेब वारला आणि येसूबाई च्या सूटकेची शक्यता निर्माण झाली. पण औरंगजेबाचा मुलगा
मुअज्जम याने फक्त शाहू राजांची सुटका केली आणि शाहू राजांनी विरोधात जाऊ नये म्हणून येसूबाई ना ओलीस म्हणून तो दिल्लीला घेऊन गेला. आज पर्यंत निदान येसूबाई निदान महाराष्ट्रात तरी होत्या पण आत्ता दिल्ली म्हणजे अवघडच होते. परका प्रदेश, परकी माणसे, गादी साठी चाललेली रोजची रक्तरंजीत लढाई यातून आपला जीव वाचवणे भयंकर अवघड होते.अशा या अस्थिर अशा वातावरणात पुढील बारा वर्ष येसूबाई नी दिल्लीत लाल किल्ल्यात काढली.कसे काढले असतील ते दिवस? कसे सांभाळले असेल आपले मानसिक संतुलन.विचार करायचा म्हटला तरी अंगाचा थरकाप उडतो. त्यातच त्यांचे सुटकेचे प्रयत्न ही चालू होते.बादशहा फारुखसीअर आणि सय्यद बंधू यांचा सत्ता संघर्ष दिल्लीत चालू होता. याच संघर्षात अत्यंत हुशारीने येसूबाई नी 1719 साली आपली सुटका करून घेतली. तब्बल 30वर्ष मुघलांच्या कैदेत राहून यशस्वी पणे येसूबाई महाराष्ट्रात परतल्या. दुःखात सुख एव्हडेच की त्यांचे पुत्र शाहू सातारा येथे छत्रपती झाले होते.संकटांची अनेक डोंगर झेलून सतत संघर्ष करून येसूबाई आता सातारा येथे आल्या होत्या. केवळ त्यांच्या संयमी ,खंबीर अशा राजकारणामुळे कुठलाही डाग न लागता त्यांची व शाहू राजांची नुसती सुटका झाली नव्हती तर मराठी राज्य ही अबाधित राहिले होते. अर्थात या सर्वा साठी त्यांच्या आयुष्याची मात्र होळी झाली होती. अर्थात त्याला पर्याय नव्हता. पुढे शाहू महाराजांच्या कारभारात त्यांनी यथायोग्य सहभाग नोंदवला. जीवनभर संघर्ष करून थकलेली ही 'श्री सखी राज्ञी जयती' साधारण 1730 साली हे जग सोडून गेली. स्वतः चे आयुष्य पणाला लावून महाराष्ट्र वाचवनार्या या महाराणी ला त्रिवार मुजरा.
डॉ. आर. आर. देशमुख

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...