विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

दत्ताजी शिंदे :— भाग १

दत्ताजी शिंदे :—
भाग १
दत्ताजी शिंदे हा राणोजी शिंद्याचा दुसरा मुलगा, जयाप्पाचा सख्खा व महादजीचा सावत्र बंधु. जयाप्पा मेल्यानंतर (१७५५) शिंदे घराण्याची सरदारी जयाप्पाचा पुत्र जनकोजी यास मिळाली. परंतु तो लहान होता म्हणून दत्ताजीच कारभार पाही. ...या चुलत्यापुतण्यांनी अनेक पराक्रम केले व उत्तर हिंदुस्थानांतील पुष्कळ प्रांतहि मराठी साम्राज्यांत समाविष्ट केले. कुकडीच्या लढाईत ज्या अकरा शूर अप्तामीनी थेट निजामाच्या हत्तीवर चाल करुन त्याची डोलाची अंबारी खालीं पाडिली. त्यांपैकीं दत्ताजी हा एक होता (१७५१). त्यानंतर पुन्हा निजामानें उपसर्ग दिल्याने पेशव्यांनी दत्ताजीस मुख्य सेनापति करुन व बरोबर विश्वासरावास देऊन निजामावर पाठविलें. त्यानें शिंदखेड येथें निजामाला गांठून पूर्ण मोड केला व पंचवीस लक्षांचा प्रांत व नळदुर्ग किल्ला मिळविला (१७५७). जयाप्पाचा ज्या बिजसिंगाच्या (मारवाडावरील) मोहिमेंत खून झाला, तींतहि दत्ताजी होता; खून झाल्यावर दत्ताजीने तें दुःख एकीकडे ठेऊन बिजेसिंगाचा मोड केला व (जून १७५५). पुढें दत्ताजीने सर्व मारवाडचें राज्य घेऊन त्याचा तिसरा हिस्सा मराठी साम्राज्यांत दाखल करुन पांच कोट रु खंडणी मिळविली (१७५६). नंतर बुंदीच्या राणीस मदत करुन व तिचा मुलगा गादीवर बसवून, दत्ताजीनें ४० लाख रुपये मिळविले व सरकारचें बरेंच कर्ज फेडले (१७५६). पुढील सालीं दादासाहेब अबदालीवर गेला असतां व मल्हारराव होळकर, हिंगणे, राजेबहाद्दर वगैरे मंडळी त्याला मदत करण्यांत कुचराई करीत असतां, त्यानें दत्ताजीसच धाडण्याबद्दल पेशव्यांस अनेक पत्र लिहिली आहेत. यावेळीं दत्ताजीने आपलें लग्न उरकून घेतले (१७५८). त्याच्या स्त्रीचें नांव भागीरथीबाई. लग्न उरकून दत्ताजी उज्जयिनीस आला. तेथें मल्हाररावानें त्याचा भोळा स्वभाव पाहून त्यास दादासाहेबानें सांगितलेल्य नजीबखानाचें पारिपत्य करण्याच्या कामगिरीपासून परावृत्त केलें. याचवेळी मल्हाररावानें "नजीब खळी राखावा, न राखल्यास पेशवे तुम्हां आम्हांस धोत्रे बडविण्यास लावितील" असे उद्‍गार काढिले. जनकोजी लहान पण मुत्सद्दी असल्याने, त्याने हा सल्ला फेटाळला, पण भोळ्या दत्ताजीनें तो स्वीकारुन नजीबास राखलें, मात्र त्याच नजीबानें दत्ताजीचा विश्वासघातानें प्राण घेतला.

No comments:

Post a Comment

छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई

  छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली सर्वात मोठी लढाई संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर मध्ये हल्ला करून अशी दहशत निर्माण केली की बुऱ्हाणपूरच्या मौ...