विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

रावरंभा निंबाळकर भाग १




रावरंभा निंबाळकर
भाग १
मराठ्यांचा इतिहास हा पराक्रमासोबतच अंतर्गत कलह आणि उच्च-नीचतेचा भेदभाव यानेच जास्त गाजलेला आहे. मनगटाच्या जोरावर गाजविलेल्या तलवारीपेक्षा जन्माने मिळालेले श्रेष्ठत्व मोठे होते. म्हणूनच रानावनात लपवून ठेवलेली माणसं छत्रपती झाली तर केवळ कुळाचा दोष काढत सरदार महादजी शिंदे किंवा रावरंभा निंबाळकर यांसारख्या कर्तृत्ववान लोकांना मराठ्यांनी पाहिजे तो सन्मान कधी दिलाच नाही. नेहमी निजामशहा किंवा आदिलशहाकडे चाकरी करणा-या निंबाळकर घराण्याने रावरंभाला आपलं कधी मानलं नाही. मराठेशाही तोलून धरणा-या महादजी शिंदे व त्यांच्या पुढील पिढीला जे वैभव लाभलं ते हैदराबादची निजामशाही एकखांबी तंबूवर तोलून धरणा-या रावरंभाला पुढे मिळालं नाही. परंतु त्याने रावरंभाची योग्यता कमी होत नाही. इतिहासाची विनंती एकच आहे, माणसाच्या जन्माचा नाही तर कर्माचा विचार करा.
फलटणचे निंबाळकर घराणे म्हणजे शहाजीराजे ते संभाजीराजांचे मातृकूळ. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे सासर असूनही स्वराज्याच्या उभारणीप्रसंगी निंबाळकरांनी मुस्लिम सत्ताधीशांच्या चाकरीत धन्यता मानली. तरीपण स्वतंत्रपणे तलवार मारणा-या रावरंभाकडे नेहमी वेगळ्या चष्म्यातून पाहिले. शिवरायांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकरांचे पुत्र महादजीला संभाजीराजांच्या बहीण सखूबाई दिल्या होत्या. याच महादजीचा नातू बाजी निंबाळकरांपासून रंभाजीचा जन्म झाला. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली. १७०७ ला औरंगजेबाच्या निधनानंतर मराठ्यांची गादी ही
सातारा आणि कोल्हापूर अशी विभागल्याने अंतर्गत कलह वाढल्याने चंद्रसेन जाधव, हिंमतबहाद्दुर उदाजी चव्हाण, नेताजी शिंदे, मानाजी फाकडे व रंभाजीसारखे सरदार निजामाला जाऊन मिळाले. त्यामुळे निजामाचे आसन स्थिर झाले व त्याने रंभाजीला रावरंभा ही पदवी आणि ५२ लाखांची जहागिर दिली. रावरंभा घराण्यात रंभाजी, जानोजी, आनंदराव, बाजीराव, खंडेराव यांच्यासारख्यांनी शेवटपर्यंत निजामशाही तोलून धरली. प्रत्येकाला रावरंभा पदवी असल्याने या घराण्याच्या अभ्यासात बराच गोंधळ उडतो.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...