विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 April 2020

रावरंभा निंबाळकर भाग 2


रावरंभा निंबाळकर
भाग 2
रावरंभाकडे पुणे, बारामती, श्रीगोंदा, तुळजापूर,
माढा, करमाळा आणि भूमची जहागिरी होती. निजामाच्या १२ मुख्य जहागिरदारांत रावरंभाचे स्थान वरचे असल्याने हैदराबादमध्ये रावरंभाची स्वतंत्र देवडी (कचेरी) होती तर औरंगाबादमधील जुन्या हायकोर्टालगतच्या आजच्या कोटला कॉलनीत रावरंभा बाजीरावाची हवेली होती.
रावरंभा घराण्यातील प्रत्येक पुरुष हा तलवार, कला, साहित्य, स्थापत्य यात रुची ठेवणारा होता. त्यापुढेच तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वारासह, आतील ओव-या, माढा आणि करमाळ्यातील देवीची मंदिरे आदी त्यांच्या निर्मितीचे साक्षीदार आहेत. साखरखेर्डा, भालकी, फत्तेखेर्डा, राक्षसभुवन आणि उदगीर या लढाईतील रावरंभाचे योगदान विसरता येणार नाही. आज परंड्याच्या किल्ल्यावर दिसणारी तोफ जानोजी जसवंतराव रावरंभानेच पेडगावहून आणून बसविलेली आहे. महादजी शिंदे, बडोद्याचे फत्तेसिंग गायकवाड, सेनापती धनाजी जाधवांचे घराणे, कोल्हापूरचे छत्रपती, सरदार थोरात घराण्याशी रावरंभाचे वैवाहिक संबंध होते.
रावरंभा निजामाकडे असले तरी त्यांचे पेशव्यांबरोबर चांगले संबंध होते. किंबहुना त्यांच्यासारख्या सरदारामुळेच निजामाला मराठ्यांविरोधात एकाही लढाईत विजय मिळाला नाही. मराठ्यांबरोबरच रावरंभाचे इंग्रज, फ्रेंच यांच्यासोबतही चांगले संबंध होते. एकदा तर रावरंभाने निजामाला सोडून जाण्याची भाषा करताच राजा असूनही डोळ्यात पाणी आणून निजामाला रावरंभाकडे विनंती करावी लागली. यावरून त्यांची योग्यता स्पष्ट होते. एकही लढाई न करता निजामाने मराठ्यांशी केवळ तह करून २०० वर्षे राज्यकारभार केला; परंतु प्रत्येक लढाईने रावरंभाची जहागिर कमी होत गेली.तरीपण तुळजापूर, माढा, करमाळा, रोपळे, शेंद्री, भूम येथील विविध इमारती रावरंभाच्या वैभवाची साक्ष देऊन उभ्या आहेत.
पहिले रावरंभाचे वास्तव्य करमाळ्यात तर शेवटचे रावरंभा भूम (जि. उस्मानाबाद) या ठिकाणी राहिले. त्यांना गोजराबाई व ताराबाई या दोन मुली असून ताराबाई पुढे विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सध्या रावरंभा घराण्याचे वंशज म्हणजे विजयसिंह थोरात हे असून ते भूमला राहतात. तर रावरंभाच्या भावाचे वंशज शेंद्री (ता. बार्शी) व रोपळे (ता. माढा, जि. उस्मानाबाद) येथे राहतात.

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...