विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 15 April 2020

#शिवजन्मोत्सव

#शिवजन्मोत्सव

किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्ये कडाडू लागली. संबळ झांजा झनाणू लागल्या. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झडू लागला. नौबत सहस्रश: दणाणू लागली. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा ! तो दिवस रत्नांचा ! तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचा !
छे: हो, छे: छे: छे: त्या दिवसालाच उपमाच नाही !
शुभ ग्रह, शुभ नक्षत्रे, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळे, शुभ निमिषे - तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेली तीनशे वर्षे शिवनेरीच्या भवती घिरट्या घालीत होती ! आज त्यांना नेमकी चाहूल लागली ! आज ती सर्वजण जिजाऊ आऊसाहेब यांच्या सूतिकागृहाच्या दाराशी थबकली, थांबली, खोळंबली, अधीरली आणि पकडलाच त्यांनी तो शुभ क्षण ! तीनशे वर्षानंतर ! तीनशे वर्षानंतर !!!
कोणत्या शब्दात त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगू ? अहो ते अशक्य ! केवळ शतका-शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल ! शालिवाहन शकाच्या १५५१ व्या वर्षी, शुक्लनाम संवत्सरांत, उत्तरायनांत, फाल्गुन महिन्यात, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणी, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाऊ आऊसाहेब यांच्या उदरी किल्ले शिवनेरीवर पुत्र जन्माला आला. !!

!! गडाचे तोंड गोड झाले. आईसाहेबांच्या महालापुढे पखालीतून आणि घागरीतून धो-धो धबधबलेले पाणी बारा वाटा वाहत निघाले. खळाळणारा ओघ वेशीला आला !!

पुत्र कोणाला झाला ?
पुत्र जिजाऊ आऊसाहेब यांना झाला !!
पुत्र महाराजा शहाजीराजे यांना झाला !!
पुत्र सह्याद्रीला झाला !!
पुत्र महाराष्ट्राला झाला !!
पुत्र भारतवर्षाला झाला !!

!! प्रत्येक जलौघ वळसे घेत घेत दिल्लीच्या, विजापूरच्या, गोव्याच्या, मुरुड जंजिऱ्याच्या आणि गोवळकोंड्याच्या वेशीकडे धावत होता. तेथल्या मग्रूर सुलतानांना बातमी सांगायला कि, आला आला !! सुलतानानो, तुमचा काळ जन्माला आला !!

!! तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफळ्या उडविण्याकरिता आमचा राजा जन्माला आला. !!

!! होय !! होय !! शिवसुर्याचा जन्म झाला !!

🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

No comments:

Post a Comment

#द ग्रेट मराठा #श्रीमंत महादजी बाबा शिंदे

  पानिपतच्या लढाईत पठाण घोडेस्वाराने केलेल्या तलवारीच्या तडाख्याने महादजींचा एक पाय कायमचा अधू झाला ; परंतु तशाही जायबंदी अवस्थेत महादजी सुख...